हार्दिक का करुण पेच कायम
By admin | Published: November 7, 2016 12:13 AM2016-11-07T00:13:20+5:302016-11-07T00:17:40+5:30
भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या लढतीपूर्वी संघनिवडीबाबत द्विधा मनस्थितीत आहेत.
राजकोट : भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या लढतीपूर्वी संघनिवडीबाबत द्विधा मनस्थितीत आहेत. संघात पाचवा गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्याची निवड करायची की, सहावा फलंदाज म्हणून करुण नायरला संधी द्यायची, असा पेच त्यांना पडला आहे. कुंबळे यांनी दोन्ही खेळाडूंची प्रशंसा करताना कुणाला प्राधान्य देणार, याबाबत मात्र स्पष्ट केले नाही.
कुंबळे म्हणाले, ‘भारतीय संघ हार्दिकला अष्टपैलूत्व सिद्ध करण्याची संधी देण्यास उत्सुक आहे. त्याच्यात पाचव्या गोलंदाजाची उणीव भरून काढण्याची क्षमता आहे. जर करुण नायरला संधी मिळाली, तर संघ व्यवस्थापन त्याचेही समर्थन करेल.’
हार्दिकबाबत विचारले असता कुंबळे यांनी सकारात्मक उत्तर दिले. कुंबळे म्हणाले, ‘हार्दिक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्येही आपली क्षमता सिद्ध केली आहे. टी-२० क्रिकेट वेगळे असले, तरी आम्हाला त्याच्या क्षमतेची कल्पना आहे. धरमशालामध्ये तीन बळी आणि दिल्लीमध्ये ३० पेक्षा अधिक धावांची खेळी यावरुन त्याच्या क्षमतेची कल्पना येते. त्यामुळे त्याला कसोटी संघात स्थान देण्याचे आम्ही समर्थन केले.’
कुंबळे पुढे म्हणाले, ‘आम्ही सर्व पाचव्या गोलंदाजाचे महत्त्व ओळखतो. जर १४० पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आणि तळाच्या क्रमामध्ये फलंदाजीमध्ये पर्याय उपलब्ध करून देणारा खेळाडू म्हणून हार्दिक स्वत:ला कसा सिद्ध करतो, याबाबत उत्सुकता आहे. संघात एक अष्टपैलू असणे चांगली बाब आहे.’
करुण नायरबाबत बोलताना कुंबळे म्हणाले, ‘करुणने स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करताना आॅस्ट्रेलियात धावा फटकावल्या आहेत. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात स्थान देण्यात आले होते. रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे करुण नायरसाठी संधी उपलब्ध झाली आहे.’
दुखापतग्रस्त खेळाडूंनी स्थानिक
क्रिकेटमध्ये फिटनेस सिद्ध करावा : कुंबळे
दुखापतीतून सावरल्यानंतर, खेळाडूंनी राष्ट्रीय संघात पुनरागमनाबाबत विचार होण्यासाठी स्थानिक क्रिकेटमध्ये फिटनेस सिद्ध करावा, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले. यापूर्वी गंभीर दुखापतीनंतर झपाट्याने पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात खेळाडू दुखापतग्रस्त झाले असल्याचा अनुभव असल्यामुळे कुंबळे यांनी असा नियमच केला आहे.
रोहित शर्मा, के. एल. राहुल, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांचा दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. कुंबळे यांच्या मते ‘खेळाडूंसोबत चर्चा करणे महत्त्वाचे आहे. कारण पुनरागमनाबाबत खेळाडूंची उत्सुकता समजण्यासारखी आहे. खेळाडूंची कामगिरी कशी आहे हे बघण्यापेक्षा त्यांच्यासोबत चर्चा करणे अधिक गरजेचे आहे. अन्य खेळाडू त्यांच्या स्थानी खेळत असताना खेळाडूंच्या मनात काय घोळत असते याची मला कल्पना आहे.’
राहुल व रोहित हे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे कुंबळे निराश झाले. कुंबळे म्हणाले, ‘चमकदार कामगिरी करणारा के. एल. राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो आता संघात नाही. त्याचप्रमाणे भुवी, शिखर हेसुद्धा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. रोहितची दुखापत संघासाठी मोठा धक्का आहे. कारण, कसोटी क्रिकेटमध्ये तो चांगली कामगिरी करीत होता. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित महत्त्वाचा खेळाडू आहे.’