हार्दिक पंड्या, गौतम गंभीरची निवड
By admin | Published: November 3, 2016 04:25 AM2016-11-03T04:25:19+5:302016-11-03T04:25:19+5:30
न्यूझीलंडला ३-० असा क्लीन स्विप देऊन आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलेल्या टीम इंडियाने आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली.
मुंबई : नुकत्याच मायदेशात झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला ३-० असा क्लीन स्विप देऊन आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलेल्या टीम इंडियाने आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडलेल्या या संघात अनुभवी व दिग्गज सलामीवीर गौतम गंभीरला कायम ठेवले असून, प्रमुख वेगवान गोलंदाज ईशांत शर्मालाही स्थान दिले आहे. त्याच वेळी दुखापतीमुळे आक्रमक फलंदाज रोहित शर्मा संघाबाहेर गेला आहे. संघात एकमेव नवीन चेहरा असून, युवा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची निवड आश्चर्यकारक ठरली.
९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीने १५ सदस्यीय संघाची घोषणा करताना रोहित शर्मासह शिखर धवन आणि लोकेश राहुल या सलामीच्या फलंदाजांनाही संघाबाहेर ठेवले. धवन आणि राहुल अजूनही न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत झालेल्या दुखापतीतून सावरलेले नाहीत.
दुसरीकडे, तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन केलेल्या गंभीरवर निवड समितीने विश्वास ठेवला आहे. तसेच, चिकुनगुनियातून सावरलेल्या ईशांत शर्मालाही संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी हार्दिक पंड्याने सर्वांचे लक्ष वेधले. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना लक्षवेधी कामगिरी केलेल्या हार्दिकला आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सलामीवीर लोकेश राहुल जखमी झाल्यानंतर ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी गौतम गंभीरची त्याच्या जागी निवड झाली. मात्र, त्याला इंदूरला झालेल्या अखेरच्या सामन्यात संधी मिळाली. या सामन्यात त्याने अनुक्रमे २९ व ५० धावांची खेळी केली. नुकतेच रणजी ट्रॉफीमध्ये गंभीरने दिल्लीचे नेतृत्व करताना ओडिशाविरुद्ध शानदार १४७ धावांची खेळी केली.
तसेच, सध्या संघात सलामीवीर म्हणून मोठी स्पर्धा सुरू आहे. मात्र, धवन आणि राहुल दोघेही दुखापतग्रस्त असल्याने निवडकर्त्यांना मुरली विजय आणि गंभीरची निवड करण्यात कोणतीही अडचण आली नाही. तसेच, रोहित शर्माच्या निवडीवरही मोठा प्रश्न होता. यावर, तो मांडीच्या दुखापतीमुळे बाहेर असून त्याच्यावर शस्त्रक्रियाही होऊ शकते, असे निवड समितीने स्पष्ट केले.
गोलंदाजांमध्ये आजारपणामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संघाबाहेर राहिलेल्या ईशांतचे पुनरागमन झाले असून, भुवनेश्वर कुमारही आपल्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला आहे. मात्र, भुवीची या वेळी संघात निवड झालेली नाही. (क्रीडा प्रतिनिधी)
>पंड्याच्या गोलंदाजीमध्ये खूप वेग आला असून,
त्याची फलंदाजीही सुधारली आहे. तो चांगला अष्टपैलू असून, त्याचे क्षेत्ररक्षणही जबरदस्त आहे. कपिल देव यांच्यानंतर आपण सर्वच उत्कृष्ट अष्टपैलूच्या शोधात आहोत. जर आम्ही तीन फिरकी गोलंदाजांसह खेळलो, तर पंड्या दुसरा वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावू शकतो. शिवाय, तो फलंदाजीही करू शकतो. तो अत्यंत आक्रमक असल्याचे सर्वांना ठाऊक आहे. मात्र, त्याने यावर राहुल द्रविड आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासह काम केले आहे. एक-दोन वर्षांपासून आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून होतो. - एम. एस. के. प्रसाद, निवड समिती अध्यक्ष
>मधल्या फळीचा विचार करता चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि यष्टिरक्षक वृद्धिमान साहा यांच्यावर जबाबदारी असेल. तर, फिरकी गोलंदाजीची धुरा पुन्हा एकदा रविचंद्रन आश्विनकडे असेल. त्याच्यासोबत डावखुरा आॅफस्पिनर रवींद्र जडेजा आणि लेगस्पिनर अमित मिश्रा यांचाही समावेश आहे. तसेच, वेगवान गोलंदाजीची धुरा मोहंमद शमी, उमेश यादव आणि ईशांत यांच्यावर असेल. युवा गोलंदाज शार्दूल ठाकूरची न्यूझीलंडविरुद्ध अतिरिक्त गोलंदाज म्हणून निवड झाली होती.
>दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या रोहित शर्माला पूर्णपणे सावरण्यासाठी किमान ६-८ आठवड्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेला मुकणार असल्याचे जवळजवळ स्पष्टच आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याच्या मांडीला दुखापत झाली होती.
>आतापर्यंत १६ प्रथमश्रेणी सामने खेळलेल्या हार्दिक पंड्याला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट पदार्पणाची संधी मिळाली आहे. त्याने बडोद्याकडून खेळताना ३३च्या सरासरीने २२ बळी घेतले आहेत. आतापर्यंत भारताकडून ४ एकदिवसीय आणि १६ टी-२० सामन्यांत त्याने चमक दाखवली आहे.
>भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, मोहंमद शमी, गौतम गंभीर, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, हार्दिक पंड्या, उमेश यादव, करुण नायर, अमित मिश्रा, वृद्धिमान साहा आणि चेतेश्वर पुजारा.