हरीश, कोमलने जिंकली नाशिक महामॅरेथॉन; पुन्हा ‘बॅक ऑन ट्रॅक’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 08:43 AM2022-02-28T08:43:17+5:302022-02-28T08:44:18+5:30
नाशिक महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंनी शहर पुन्हा बॅक ऑन ट्रॅक आल्याचे दाखवून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ढोलताशांचा दणदणाट, विविधरंगी आतषबाजीने संचारलेला उत्साह आणि गीतसंगीताने नवचैतन्य निर्माण करणाऱ्या वातावरणात नाशिक महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंनी शहर पुन्हा बॅक ऑन ट्रॅक आल्याचे दाखवून दिले. पहाटे मंद गारव्याची झुळूक अंगावर घेत धावपटूंमध्ये अमाप ऊर्जा संचारली आणि भव्यदिव्य आयोजनाचा लौकिक असलेल्या स्पर्धेचा अनुभव दोन वर्षांच्या विरामानंतर पुन्हा नाशिककरांना आला. लोकमत समूहातर्फे गोल्फ क्लब मैदानावर आयोजित नाशिक महामॅरेथॉन स्पर्धेच्या २१ किलोमीटर खुल्या गटात नाशिकच्या हरीश शेरोन आणि कोमल जगदाळे यांनी विजेतेपद पटकाविले, तर दहा किलोमीटरमध्ये नाशिकचेच दिनेश सिंग आणि रिश्यू सिंग यांनी बाजी मारली.
मुख्य प्रायोजक आयकाॅन स्टील प्रस्तुत, पॉवर्ड बाय दीपक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील धावपटूंची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये अपूर्व उत्साह संचारला होता. वॉर्मअप सेशन आणि वाद्याच्या दणदणाटाने चैतन्याला बहर आला होता. पहाटे ५.४५ वाजता २१ किमी अंतराच्या स्पर्धेला सुरुवात झाली. नाशिकमधील धावपटू आणि कर्नाटक, नागपूरच्या धावपटूंमध्ये चुरस होती. स्पर्धेच्या अखेरच्या चरणात नाशिकच्या हरीश शेरोन याने ०१:०७:५७ वेळेची नाेंद करीत प्रथम क्रमांक पटकाविला, तर कर्नाटकच्या अनिला कुमारा याने ०१:०८:०५ वेळेत अंतर पूर्ण करीत दुसरा क्रमांक मिळविला. विजेतेपदाचा दावा सांगणारा रोहित यादव ०१:०९:०४ वेळेची नोंद करीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
२१ किमी महिला गटात कोमल जगदाळे हिने अपेक्षेप्रमाणेच प्रथम क्रमांक पटकावित नाशिककडे पदक राखण्यात यश मिळविले. तिने ०१:१९:३२ इतक्या वेळेची नाेंद केली. अर्चना के.एम., कर्नाटक हिने ०१:२०:३६ वेळ घेत द्वितीय, तर नाशिकच्याच ज्योती कुमारी हिने ०१:२२:४१ वेळेची नोंद करीत तिसरा क्रमांक मिळविला.
२१ किमी डिफेन्स पुरुष गटातून परसप्पा हलजोल, कर्नाटक, द्वितीय अविनाश पटेल, वाराणसी, अंबुज तिवारी, आर्टिलरी सेंटर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. महिला गटात नागपूरची यामिनी ठाकरे विजेती ठरली, तर औरंगाबाद महामॅरेथॉन विजेती योगीता वाघला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नागपूर पोलीस दलातील रोशन भुरे हिला धक्का बसला.
तिला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
२१ किमी व्हेटरन्स पुरुष गटात ई. जे. जोस, केरळ, भास्कर कांबळे, वाशिम, सुरेशकुमार, हरियाणा यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला, तर महिला गटातून वैशाली गर्ग प्रथम, पल्लवी मूग द्वितीय, तर नीता नारंग या तिसऱ्या स्थानी राहिल्या.
१० किमी खुला गट पुरुष गटात दिनेशसिंग याने ००:३१:३७ वेळेची नोंद करीत प्रथम क्रमांकाने स्पर्धा पूर्ण केली, तर अत्यंत अटीतटीत शेवटच्या क्षणी अजय राठी याने ३१.५६ मिनिटांत स्पर्धा पूर्ण करीत दुसरा क्रमांक मिळविला. विकास यादवने ३२:०५ मिनिटांत स्पर्धा पूर्ण केल्याने त्यास तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
महिला गटात अव्वल धावपटू रिश्यू सिंग हिने ००:३७.५५ मिनिटांत स्पर्धा पूर्ण करीत पहिला क्रमांक पटकाविला, तर पल्लवी जगदाळे (००:३८:३७) आणि पुष्पा चौधरी (००:४०:०८) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला. या तिघींनीही नाशिकची शान राखली.
१० किमी व्हेटरन्स (पुरुष) गटात समीरकुमार कोलया (००:३८:०५), रणजित कनबानकर (००:३८:३५), रमेश चिवलकर (००:४०:३७), तर महिला गटात डॉ. इंदू टंडन, मुंबई (००:४९:०९), पूनम वाणी (००:५०;५७), शीतल संघवी, नाशिक (००:५१:३०) यांनीही आपल्या गटात विजेतेपद मिळविले. या स्पर्धेला नाशिक शहरासह अन्य ठिकाणांहूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.
क्षणचित्रे
- नाशिकची कोमल जगदाळे आणि पल्लवी जगदाळे या दोन्ही धावपटू सहभागी झाल्या होत्या. कोमल ही २१ किलोमीटरची विजेती ठरली, तर पल्लवी ही १० किलोमीटरमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
- औरंगाबाद मॅरेथॉनमध्ये डिफेन्समध्ये पहिली आलेली नाशिकची योगीता वाघ नाशिकच्या स्पर्धेत मात्र दुसऱ्या क्रमांकावर राहिली. नागपूर पोलीस दलातील यामिनी ठाकरे हिने मात केली.
- मॅरेथॉन स्पर्धेत राज्यभर दबदबा निर्माण करणाऱ्या नाशिकमधील मॅरेथॉनपटूंचा सहभाग लक्षणीय ठरला.
- पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील सुमारे ७० मुले-मुली मॅरेथॉनमध्ये धावल्या. यातील काही मुली अनवाणी पायाने धावत होत्या.
- २१ आणि १० या स्पर्धात्मक गटामध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठांनी ही स्पर्धा पूर्ण केली.
- नाशिकच्या शिवताल ढोल पथकाच्या वाद्यचमूने वातावरणनिर्मितीत मोलाची भूमिका बजावली.
- विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी फ्लॅग ऑफ केल्यानंतर स्वत: स्पर्धा मार्गावर धाव घेतली.
- नवी मुंबईतील सतीश श्यामराव वळीव यांची विदूषकाची वेशभूषा लक्षणीय ठरली.
निकाल
- २१ कि.मी. खुला गट (पुरुष) : प्रथम : हरीश शेरॉन, नाशिक, द्वितीय : अनिला कुमारा, कर्नाटक, तृतीय : रोहित यादव
- २१ कि.मी. खुला गट (महिला) : प्रथम : कोमल जगदाळे, नाशिक, द्वितीय : अर्चना के. एम. कर्नाटक, तृतीय : ज्योतीकुमारी, नाशिक
- २१ कि.मी. डिफेन्स गट (पुरुष) : प्रथम : परसप्पा हलजोल, कर्नाटक, द्वितीय : अविनाश पटेल, वाराणसी, तृतीय : अंबूज तिवारी, आर्टिलरी सेंटर
- २१ कि.मी. डिफेन्स गट (महिला) : प्रथम : यामिनी ठाकरे, नागपूर पोलीस, द्वितीय : योगीता वाघ, नाशिक पोलीस, तृतीय : रोशनी भुरे, नागपूर पोलीस
- २१ कि.मी. व्हेटरन्स गट (पुरुष) : प्रथम : ई. जे. जोस, केरळ, द्वितीय : भास्कर कांबळे, वाशिम, तृतीय : सुरेश कुमार, हरियाणा
- २१ कि.मी. व्हेटरन्स गट (महिला) : प्रथम : वैशाली गर्ग, द्वितीय : पल्लवी मूग, तृतीय : तमाली बसू
- १० कि.मी. खुला गट (पुरुष) : , प्रथम : दिनेशसिंग, द्वितीय : अजय राठी, तृतीय : विकास यादव
- १० कि.मी. खुलागट (महिला) : प्रथम : रिश्यू सिंग, नाशिक, द्वितीय : पल्लवी जगदाळे, नाशिक, तृतीय : पुष्पा चौधरी, नाशिक
- १० कि.मी. व्हेटरन्स (पुरुष) : प्रथम : समीरकुमार कोलया, द्वितीय : रणजित कनबानकर, तृतीय : रमेश चिवलकर
- १० कि.मी. व्हेटरन्स (महिला) : , प्रथम : डॉ. इंदू टंडन, मुंबई, द्वितीय : पूनम वाणी, तृतीय : शीतल संघवी, नाशिक