हरयाणवी 'दंगल'.. लडकियोंकी कुश्ती !
By Admin | Published: August 18, 2016 06:07 PM2016-08-18T18:07:51+5:302016-08-18T18:19:19+5:30
रिओ आॅलिम्पिकमध्ये रोहतकच्याच साक्षी मलिकने कुस्तीत पहिले पदक देशाला मिळवून दिले आहे. त्यानिमित्त रोहतकमधील महिला कुस्तीपटूंची ही वेगळी माहिती.... फोटोग्राफरसह दिल्लीवारीला निघालो.
- सचिन जवळकोटे/ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 18 - लोकमतच्या दीपोत्सवासाठी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू गीता फोगट अन् तिच्या कुटुंबीयांची स्पेशल स्टोरी करण्यासाठी लोकमतचे सचिन जवळकोटे हे गेल्या वर्षी हरियाणात गेले होते. त्यावेळी रोहतक परिसरातील महिला कुस्तीपटूंची जिंदगानी त्यांनी थेट आखाड्यात शिरून अत्यंत जवळून पाहिली होती. आज रिओ आॅलिम्पिकमध्ये रोहतकच्याच साक्षी मलिकने कुस्तीत पहिले पदक देशाला मिळवून दिले आहे. त्यानिमित्त रोहतकमधील महिला कुस्तीपटूंची ही वेगळी माहिती....
फोटोग्राफरसह दिल्लीवारीला निघालो.
नवी दिल्ली स्टेशनवर उतरल्यानंतर हरियाणाचं बस स्टॅन्ड गाठलं. निडानीला जाणारी बस हुडकली. हरियाणाची परिवहन यंत्रणा जवळपास आपल्या एसटी सारखीच; परंतु अजूनही मागासलेलीच. कुणी प्रवासी मोबाईलवर हरयाणवी गाणं जोरात लावून ऐकत (अख्ख्या बसला ऐकवत) बसलेला; तर एक खेडूत चक्क पाठीमागं सिगारेट फुंकू लागलेला. भसाड्या आवाजातल्या गाण्याशी कुणाला ना देणं-घेणं की बसभर पसरलेल्या धुराशी कुणाला सोयरसुतक़.
रोहतक पार केल्यानंतर निडानी गाव आलं.
पानिपत अन् सोनपत लगत असलेल्या जिन्द जिल्ह्यात तसं पाणी भरपूर. बोअरमधून रानात गुडघाभर पाणी पसरवून दोन-दोन एकरांमध्ये भातशेती करणारी माणसं भाग्यवानच. आलं मनात की उपस पाणी. रानात झालं तळं की लाव रोपं. कोकणी माणसाप्रमाणं भातशेतीसाठी पावसाची वाट बघत बसायची बिलकूल नाही गरज !
बस थांबली. गावालगतच असलेल्या मुलींच्या शाळेत गेलो. खेळासाठी सुप्रसिद्ध असलेल्या निडानी गावानं आजपर्यंत शेकडो यशस्वी खेळाडू देशाला दिलेले. कुस्ती अन् कबड्डीमध्ये इथल्या मुलांनी थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेलं. गेल्या वर्षी आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणारी पहिलवान कविता सिवाच इथलीच. वर्ल्ड ज्युनिअरमध्ये कांस्यपदक पटकाविण्या-या ममता सिहागचाही बोर्ड शाळेत लागलेला.
केवळ खेळासाठी चालविणा-या या भरतसिंह शाळेत अलीकडे वेगळाच ट्रेंड आलाय. मुलांपेक्षा मुलींची संख्या वरचेवर वाढत चाललीय. प्राचार्यांच्या केबिनकडे जात असताना सहज मैदानावर नजर टाकली. दहा वर्षांपासून ते वीस-बावीस वर्षांपर्यंतच्या असंख्य मुली मन लावून खेळात रममाण झालेल्या. पण, आम्हाला जास्त उत्सुकता कुस्तीची होती.
आमच्या नजरेतले भाव सुखबीरसिंग नामक पदाधिका-याने टिपले. चलो.. मैं आपको हमरा बड़ा आखाडा दिखाता हूँ, बोलत-बोलत आम्ही पलीकडच्या नव्या इमारतीत शिरलो. आत गेल्यानंतर पाहतो तर काय.. एक भला-मोठा हॉल; ज्यावर जवळपास पाच-सहा हजार स्क्वेअर फुटांचा मॅट टाकलेला. याच मॅटवर मुली कुस्ती खेळू लागलेल्या. आमचा भ्रमनिरास झाला. कुस्ती म्हणजे लाल मातीतलाच खेळ, ही आमची परंपरागत धारणाही दूर झाली. जवळपास पस्तीस मुली इथं कुस्तीची प्रॅक्टिस करत होत्या. कुणी एकमेकींची ताकद आजमावत होत्या, तर कुणी शक्तीला युक्तीतून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत होत्या. ज्या वयात झिम्मा-फुगडी खेळायला पाहिजे, त्या वयात या मुली वेगवेगळा डाव टाकत होत्या.
सलग दोन तास सराव केल्यामुळं पुरती घामाजलेली ममता सिहाग आमच्याजवळ आली. श्वास पुरता फुलला होता; पण सरावाचा आनंद चेह-यावरून ओथंबून वाहत होता. एशियन चॅम्पियनशिप ममताचे वडीलही पहिलवानच. हिसारच्या सिसाई गावातले मास्टर चंकिराम हे तिचे वडील. त्यांना वयाच्या विसाव्या वर्षी कुस्ती खेळताना अपंगत्व आलं. त्यानंतर ममता, गीता अन् कविता या तिघी जन्मल्या. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी या तिघीही कुस्तीमध्ये उतरल्या. तिच्या दोन्ही बहिणींनीही सब ज्युनिअर एशियनमध्ये चमक दाखविलेली.
मेरे दोनों बहनों की शादी हो गयी हैं. अब मेरे साथ मेरा छोटा भाई भी कुश्ती में आ गया हैं. बस एकही ख्वाब हैं.. पापा का सपना पूरा करना. अॅक्सिडेंट के बाद जो वो ना कर सके, वो हमें पूरा करना हैं.
बोलताना ममताच्या डोळ्यात स्वप्नाळू भाव दाटले होते. पंचवीस वर्षांपूर्वी दुर्दैवानं हतबल बनलेल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याची जिद्द तरळत होती.
बोलता-बोलता पुढच्या कुस्तीपटूकडं सरकलो. एकमेकांच्या मानेत हात टाकून चाचपडणाऱ्या दोन बॉयकटवाल्या या मुली आहेत असं अगोदरच सांगितलं गेलं असल्यामुळं ओळख पटलेली; नाही तर दोन तरुण पोरंच कुस्ती खेळताहेत, असंच कोणत्याही नवोगताला नक्कीच वाटलं असतं. या दोघींतली एक होती किरण माथूर. सोनपतची. एशियन ज्युनिअरमध्ये सिल्व्हर मेडल घेऊन आलेली. वय वर्षे अवघे सतरा.
मेरा जुडवाँ भाई सूरज भी कुश्ती खेलता हैं. हम दोनों भी रेसलर चॅम्पियन बनना चाहिये, ये हमारे माता-पिता की ख्वाईश. इसीलिए पांच साल से हम तन-मन और लगनसे इस मॅटपे हैं, किरणच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. नजरेत चमक होती.
इथं गेल्या पाच-दहा वर्षांतच कुस्तीमध्ये मुलींची संख्या अकस्मातपणे वाढली. ह्यहरियाणा-पंजाबह्णची संस्कृती तशी खाओ-पिओवाली. कधीकाळी पंजाब केसरीचा बहुमान कुस्तीवीरांसाठी सर्वोच्च होता. काळाच्या ओघात पंजाबची परंपरा हरियाणाकडं चालत आली. सुखबीरसिंगच्या बोलण्यातून बरीच माहिती उलगडत चालली होती, वहॉँ के नौजवानों में आजकल नशा बहुत बढता चला जा रहा हैं. इसीलिए वहॉँ कुश्ती का माहौल भी कम होता गया; लेकिन हमारे हरयाणा में लड़कियोंकी कुश्ती फेमस होती जा रही हैं. लगन और डिसिप्लिन की वजह से यहॉँकी लड़कियाँ मर्दो से जादा जल्द ये खेल सीख जाती हैं.
कुस्तीसाठी नुसतीच ताकद असून चालत नाही तर चतुरता अन् चपळताही अंगी असावी लागते. सतत सराव करण्याची सवयही अंगी भिनावी लागते... अन् हेच गुण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात असल्याचा दावा इथली कोच मंडळी करत होती.
आजपर्यंत निडानीच्या आखाड्यात तयार झालेल्या तब्बल अकरा मुलींनी राष्ट्रीय पातळीवर तर तिघींनी आशियाई स्पर्धेत मेडल पटकाविलंय. महिला पहिलवानांचं गाव म्हणून निडानीनं जशी आपली वेगळी ओळख निर्माण केलीय, तसंच बेटियों की कुश्तीह्णसाठी अवघ्या हरियाणाचंही नाव जगाच्या नकाशावर आणलंय. ह्यसंस्कृती-प्रधानह्ण हिंदी चित्रपटांचं हरियाणातल्या लोकांना तसं भलतंच आकर्षण. मेरे हाथों में नौ-नौ चुड़ीयाँ रे.. सारख्या गाण्याची रेलचेल गावोगावच्या टप-यांवर दिसून आलेली. मात्र इथलेच हे ह्यनाजूक हात आता चक्क ह्यआखाड्यात शड्डू ठोकण्यासाठी आसुसलेत. या सा-या मुलींची ह्यमर्दानगीह्ण अर्थात ह्यपहिलवानकीह्ण बघताना एक अवघड प्रश्न मात्र कळत-नकळत मनात घोळत राहिलेला.
या मुलींच्या घोळक्यातील कविता सिवाच हिच्याशी बोलताना मात्र राहवलंच नाही. तिला हळूच हा नाजूक प्रश्न विचारला. कुस्तीतल्या रांगड्या झटापटीमुळं लग्नानंतर बाळंतपणात काही त्रास होऊ शकतो का? हे तिला विचारलं तेव्हा ती खुदकन गालातल्या गालात हसली... अन् नंतर तिनं जणू आमच्या अंगावर बॉम्बच टाकला. आपको लगता हैं, मुझे अब एक बच्ची हैं?
कविता मूळची कुस्तीपटूच. लहानपणापासून मॅटवर डाव मारत आलेली. मात्र, नंतर कबड्डीकडं वळाली. घरच्यांनी एका व्यापारी मुलासोबत तिचं लग्नही लावून दिलेलं,जब मैं एशियन गेम्स में गोल्ड मेडल जीती थी, तब तीन महिनोंकी प्रेग्नंट थी. मेडल लेने के बाद मैंने ये गुड न्यूज घर में सब को बतायी. सब बहुत गुस्से में आ चुके थे, लेकिन उन्होंने मुझे समझने की कोशीश भी की; क्योंकी अगर मैं ये बात घरवालों को पहले ही बताती, तो मुझे वहाँ खेलने की इजाजतही नहीं मिलती.ह्ण
सध्या मुलींच्या कबड्डीची कोच असलेली कविता आजही कुस्ती खेळते. तिला आता साडेतीन महिन्यांची मुलगीही आहे. गीताक्षी तिचं नाव. ह्यआता या क्षणी मुलगी कुठाय?ह्ण असा सवाल करताच कवितानं झटकन् हॉलच्या कोपऱ्यात बोट दाखविलं. तिथं एक तरुण एका इवल्याशा बाळाला घेऊन निवांत उभा होता. वो मेरे हजबंड हैं! मुझे आज लेने आये हैं,सांगताना कविताच्या चेहऱ्यावर नव-याबद्दलचं कौतुक होतं. आपलीच काहीतरी चर्चा चालू आहे, हे लक्षात आल्यामुळं तोही आमच्याकडंच येऊ लागला. येताना कुशीतल्या बाळाला आजूबाजूला सराव करणा-या मुली दाखवू लागला. ती गोड छोकरीही डोळे मोठमोठाले करून या मुलींच्या शड्डूचा आवाज कानात साठवू पाहत होती... कारण कदाचित भविष्यात तीही याच तालमीत तयार होणार असावी.
असो...हरयाणवी मुलींची दंगलह्ण आठवणींच्या कोनाड्यात ठेवत आम्ही बाहेर पडलो. एवढ्यात तिथल्या एका प्रशिक्षकानं सांगितलं,आज हमारे गाव के मुखिया के घर में शादी हैं. उन्होंने आपको भी बुलाया हैं. वो इस स्पोर्टस् स्कूल के डायरेक्टर भी हैं!ह्ण हरियाणाच्या संस्कृतीची झलक अनुभवण्याची एवढी नामी संधी अजून दुसरीकडं मिळणार होती? मीही लगेच होकार दिला. आम्ही चालत लग्नघरी निघालो.
गावात सारी बसकी घरं. जुन्या काळातल्या घटनांची साक्ष देत उभारलेली. समोरून एक गाडा आला. आता त्याला ह्यरेडागाडीह्ण म्हणावी की ह्यबैलगाडीह्ण हेच समजेना.. कारण आपल्याकडं असलेल्या बैलगाडीसारख्या गाड्याला चक्क रेडा जुंपलेला. या गाडीला झोटा बुगीह्ण म्हणतात, हेही नंतर कळालं. मागं गवताचा भारा टाकून एक बाई हा गाडा हाकत निघालेली. आमच्यासमोर येताच पटकन तिच्या डोक्यावरची ओढणी खाली मानेपर्यंत घरंगळत गेली. थोडसं आश्चर्य वाटलं; पण चर्चा टाळली.
लग्नघरी आल्यानंतर हरयाणवी स्टाईलनं मांडलेल्या भोजनाचा पाहुणचार घेतला. छोले-पराठ्याचा मुख्य जेवणापेक्षा बाकीचे चटपटीत अॅटम्सच जास्त. गरमागरम गुलाबजाम, रसगुल्ले अन् मालपुव्यासह मलई की लच्छेदार लस्सी अन् रबडी. बाप रे बाप... प्रत्येक पदार्थ दुधा-तुपातला. याचं कारणही तसंच. घरटी किमान दोन-चार म्हशी तर निवांत रवंथ करत उभारलेल्या. त्यापण साध्यासुध्या नव्हे... चक्क मुऱ्हा जातीच्या. या म्हशींचं उगमस्थानच म्हणे मुळात हरियाणातलं. त्यामुळं इथल्या शेकडो पिढ्या दुधावरच वाढलेल्या. दुधावरच पोसलेल्या. त्यातूनच आलेली ताकद जिरविण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या.
...परंतु इथंही एक गोष्ट खटकलीच. या लग्न मंडपात बहुतांश बायका ह्यघुंगटह्ण घेऊनच वावरत होत्या. राजस्थान किंवा गुजरातमध्ये बायका अर्धाच चेहरा झाकायच्या; पण इथं तर अख्खा चेहरा कपड्याखालीच. ज्या राज्यातल्या मुली जगातल्या तमाम कुस्तीपटूंना चितपट करण्यासाठी शड्डू ठोकून पुढं सरसावत होत्या, तिथं त्यांच्याच प्रांतात जुन्या पिढीतल्या महिला चक्क चेहरा झाकून फिरत होत्या. आमच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव ओळखून एकजण हळूच कानात पुटपुटला, ये जो देख रहे है वो हमारी परंपरा ... और आखाडे में देखा था वो हमारा भविष्य!ह्ण
- (लेखक लोकमतच्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)