हरलो असलो, तरी आशा संपल्या नाहीत...
By Admin | Published: November 6, 2016 11:56 PM2016-11-06T23:56:15+5:302016-11-06T23:56:15+5:30
एएफसी कप स्पर्धेचा अंतिम सामना माझ्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाचा सामना होता. जरी या सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले असले
दोहा : एएफसी कप स्पर्धेचा अंतिम सामना माझ्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाचा सामना होता. जरी या सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले असले, तरी आमच्या आशा संपल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया भारताचा स्टार खेळाडू आणि बंगळुरू एफसीचा कर्णधार सुनील छेत्री याने दिली.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ९१ सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या छेत्रीच्या नेतृत्वाखालील बंगळुरू एफसी संघाला शनिवारी एएफसी कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इराकच्या एअर फोर्स संघाविरुद्ध ०-१ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, बंगळुरू एफसी संघाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारणारा पहिला भारतीय क्लब म्हणून इतिहास नोंदवला.
या सामन्यानंतर छेत्री म्हणाला, ‘आम्ही भलेही सामना गमावला असू, मात्र आमच्या आशा संपुष्टात आल्या नाहीत. आम्ही काय करू शकतो हे आम्ही दाखवून दिले आहे. यानंतर प्रत्येक भारतीय क्लब आपल्या कमजोरी सुधारण्याचा प्रयत्न करेल. आम्ही केलेल्या प्रयत्नानंतर देशात आशेचा किरण दिसला आहे. आपला देश १.३ अब्ज लोकसंख्येचा असून, त्यांच्या आमच्याविषयी अपेक्षा वाढल्या आहेत.’
बंगळुरू एफसीच्या कामगिरीनंतर भारतातील इतर क्लब्सचाही आत्मविश्वास उंचावला असेल, असे सांगत छेत्री म्हणाला, ‘देशातील इतर क्लबचे मनोबल बंगळुरू एफसीने वाढविले आहे आणि आता तेदेखील आपल्या अडचणी दूर करून पुढे जाण्याच्या प्रयत्न करतील. कदाचित आपण पुढच्या वर्षी अन्य एका भारतीय क्लबला या स्तरावर खेळताना पाहू.’
एएफसी कपच्या अंतिम सामन्याविषयी छेत्रीने सांगितले की, ‘मी माझ्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वाचे सामने खेळलो आहे. परंतु, हा सामना यातील सर्वोच्च ठरला. हा सामना केवळ माझ्या क्लबसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरला. संघातील प्रत्येक खेळाडूने शानदार खेळ केला. संघासोबत जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपले योगदान दिले. आम्ही एका परिवाराप्रमाणे खेळलो.’ (वृत्तसंस्था)
...आणि भारतीयांचे स्वप्न धुळीस मिळाले
एएफसी कपच्या अंतिम सामन्यावर नजर ठेवून असलेल्या करोडो भारतीयांचे स्वप्न धुळीस मिळवताना इराकच्या एअर फोर्स क्लब संघाने भारताच्या बंगळुरू एफसी संघाचा १-० असा पराभव केला. कतार स्पोटर््स क्लब मैदानावर झालेल्या या सामन्यात बंगळुरू - एअर फोर्स यांच्यात अटीतटीची लढत झाली.
पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर, दुसऱ्या सत्रात एअर फोर्सचा स्टार खेळाडू हमादी अहमद याने ७०व्या मिनिटाला गोल करुन संघाला आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी अखेरपर्यंत टिकवताना एअर फोर्सने विजेतेपद निश्चित केले.
अंतिम सामन्यात नक्कीच आम्ही काही बाबतीत मागे पडलो. प्रतिस्पर्धी संघाने खूप चांगला खेळ केला. परंतु, माझ्या संघातील खेळाडूंनीही स्वत:ला सिद्ध करत चांगली झुंज दिली. भारतीय फुटबॉलमधील नव्या युगाची ही सुरुवात आहे. आम्ही याआधी इतक्या मजबूत संघाविरुद्ध कधीही खेळलो नव्हतो. त्यामुळे या सामन्यातून खूप शिकायला मिळाले. यामुळे भविष्यात तयारी करण्यास आम्हाला खूप मदत मिळेल आणि पुढील सत्रात आम्ही नक्कीच जोमाने पुनरागमन करू.
- एलबर्ट रोका, प्रशिक्षक - बंगळुरू एफसी
काही लोक तीन वर्षांत आम्ही केलेल्या प्रगतीकडे पाहून आश्चर्य व्यक्त करतील. पण, विश्वास ठेवा की, आम्ही दोन शानदार प्रशिक्षकांसह खेळून स्वत:ला नशीबवान मानतो. त्यांच्या मेहनतीचाच हा परिणाम आहे. आम्ही भविष्याचा विचार करू शकत नाही. पण मला विश्वास आहे की, भारतीय फुटबॉलमध्ये नवा अध्याय लिहिला गेला आहे.
- सुनील छेत्री