हरमनने मन जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:55 AM2017-07-21T03:55:06+5:302017-07-21T03:55:06+5:30

काही दिवस, क्षण इतिहासाचं कोंदणच स्वतः सोबत घेऊन येत असतात. तो दिवस, क्षण ज्यांच्या नशिबात येतो ते कायमस्वरूपी इतिहास बनून जातात.

Harman won the mind | हरमनने मन जिंकले

हरमनने मन जिंकले

Next
>- बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
 
काही दिवस, क्षण इतिहासाचं कोंदणच स्वतः सोबत घेऊन येत असतात. तो दिवस, क्षण ज्यांच्या नशिबात येतो ते कायमस्वरूपी इतिहास बनून जातात. भारतीय महिला क्रिकेटसाठी कालची रात्र तशीच ऐतिहासिक ठरली. अशक्य ते शक्य झालं, कल्पनेतलं स्वप्न सत्यात उतरलं. चर्चा, प्रसिद्धी, कौतुक आणि विश्वचषकाचं तिकीट सारं काही पदरात पडलं. ही सगळी किमया घडली ती एका ऐतिहासिक खेळीमुळे आणि या खेळीची शिल्पकार असलेल्या हरमनप्रीत कौरमुळे. नियतीने कालचा दिवस जणू तिलाच बहाल केला होता.   
महिला विश्वचषकातील सहा वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धची खराब कामगिरी यामुळे भारतीय महिला संघासाठी उपांत्य सामना म्हणजे जणू अग्निपरीक्षाच होती. पण भारतीय संघ या परीक्षेत तावून सुलाखून पास झाला. यंदाच्या महिला विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी चांगली होत आहे. उपांत्य सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध असल्याने धाकधूक वाटत होती. मन भारतच जिंकेल म्हणत होते, पण आकडे, वास्तव यांचे गणित मांडणारा मेंदू त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. पण हरमनप्रीतने सगळी समिकरणेच बदलून टाकली. 
पावसाळी वातावरण आणि दहाव्या षटकापूर्वीच दोन विकेट गमावल्याने भारतीय संघ अडचणीत होता. पण त्यावेळी मैदानात उतरलेल्या हरमनप्रीतने बघता बघता  डावाचे चित्र पालटवले. याआधी बिग बॅशमध्ये खेळल्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची तिला चांगली परख आहे. या गोष्टीचा तिने पुरेपूर फायदा उठवला. मैदानावर  चौकार, षटकारांची बरसात होऊ लागली. त्याबरोबरच इंग्लंडपासून हजारो मैल दूर भारतात ऑफीस, रस्ते, घर, लोकल आणि सोशल मीडिया सगळीकडे हरमनप्रीतचीच चर्चा सुरू झाली. महिला क्रिकेट प्राइम टाइममध्ये आले. 
बड्या संघाला लोळवण्यासाठी तितक्याच जबरदस्त खेळीची गरज असते. काल भारतीय महिला संघासाठी ती कामगिरी हरमनप्रीतने बजावली. धावफलक शेअर बाजाराप्रमाणे उसळी घेऊ लागला. अर्थातच भारतीय संघाचा शेअर वधारलेला होता. तर विश्वविजेत्यांनी आपटी खाल्ली. अवघ्या 115 चेंडूत नाबाद 171 धावा त्यात 20 चौकार आणि 7 षटकार वीरेंद्र सेहवागची आठवण करून गेले. या खेळीदरम्यान मिताली राज, दीप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमूर्ती यांच्यासोबत घणाघाती भागीदाऱ्या करत 42 षटकात उभारलेल्या 281धावा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेशा ठरल्या.
हरमनप्रीतने दिलेल्या धक्क्यातून सावरण्यापूर्वी त्यांच्या तीन फलंदाज माघारी परतल्या होत्या. पुढे एलिस पेरी, व्हिलानी आणि ब्लॅकवेल यांनी झुंज देत सामना शेवटपर्यंत नेला. पण भारताच्या विजयाची गाथा 
हरमनप्रीतने पहिल्या डावातच लिहून पूर्ण केली होती. उत्तरार्धात झुलन गोस्वामी, शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा यांनी त्याची औपचारिकता पार पाडली. 
स्वप्नवत ठरलेल्या या विश्वचषकात आता रविवारी ऐतिहासिक लॉर्डसवर होणाऱ्या अंतिम लढतीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असेल. याच मैदानावर 34 वर्षांपूर्वी आपण पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषकाला गवसणी घातली होती. आता दुसऱ्यांदा महिला विश्वचषकाची अंतिम फेरी खेळत असलेल्या भारताच्या मर्दानींसमोर त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी आणि आव्हान असेल.

Web Title: Harman won the mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.