सचिनमुळे हरमनप्रीतला मिळाली रेल्वेत नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:35 PM2017-07-23T12:35:38+5:302017-07-23T12:35:38+5:30
नवी दिल्ली, दि.२३ - सचिन तेंडुलकर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हरमनप्रीतला पश्चिम रेल्वेत नौकरीची संधी मिळाली असे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांनी स्पष्ट केले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - भारतीय महिला क्रिकेट संघाची मधल्या फळीतील फलंदाज हरमनप्रीत कौरने उपांत्य सामन्यात नाबाद शतकी (११५ चेंडूत १७१ धावा) खेळी केली. बाद फेरीच्या सामन्यात मधल्या फळीत येऊन सर्वाधिक धावा करण्याचा करिष्मा हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला. कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळीने क्रिकेट जगतात बोलबाला सुरु आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांनी हरमनप्रीतमध्ये असणारी प्रतिभा सर्वप्रथम हेरली. हरमनप्रीत एक चांगली अष्टपैलू खेळाडू असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला पश्चिम रेल्वेकडून खेळवण्यासाठी एडलजी यांनी खास प्रयत्न केले.
एडुलजी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या की, दक्षिण रेल्वेकडून २४ वर्षीय हरमनप्रीतला ऑफर मिळाली होती. पण तिला चांगले पद देऊन पश्चिम रेल्वेकडून खेळण्याचा पर्याय उपलब्ध होता. ती दक्षिण रेल्वेमध्ये कनिष्ठ पदावर कार्यरत होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून खेळण्यासाठी मी तिला चांगले पद ऑफर केले. तिला अधिकारी पदाची ऑफर मी दिली. दिल्लीला यांसदर्भात पत्र पाठवण्यात आले. पण याला राष्ट्रपतींकडून मान्यता मिळाली नाही. यासंदर्भात त्यानंतर सचिन तेंडूलकरची मदत घेतली.
एडुलजी म्हणाल्या की, राज्यसभा सदस्य आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी हरमनप्रीतच्या नियुक्तीसाठी हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली. याप्रकरणी त्यांनी रेल्वेमंत्री आणि प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला. त्यानंतर हरमनप्रीतला पश्चिम रल्वेमध्ये नोकरीत समाविष्ट करुन घेण्यात आले.