हॅरिसनेही मिसळला जॉन्सनच्या सुरात सूर
By Admin | Published: January 4, 2015 01:25 AM2015-01-04T01:25:54+5:302015-01-04T01:25:54+5:30
मिशेल जॉन्सननंतर आॅस्ट्रेलियन संघातील त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज रॅन हॅरिसनेही भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांबाबत टीका केली आहे.
सिडनी : मिशेल जॉन्सननंतर आॅस्ट्रेलियन संघातील त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज रॅन हॅरिसनेही भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांबाबत टीका केली आहे. या मालिकेत संथ व चेंडूला विशेष उसळी न मिळणाऱ्या खेळपट्ट्यांचा वापर करण्यात आल्याचे हॅरिस म्हणाला. गेल्या अॅशेस मालिकेच्या तुलनेत या वेळी बळी घेण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली, असेही हॅरिस म्हणाला. चार सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतल्यानंतरही हॅरिसने फलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यांबाबत निराशा व्यक्त केली.
मंगळवारी सिडनीमध्ये प्रारंभ होणाऱ्या चौथ्या व अंतिम कसोटी सामन्यापूर्वी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना हॅरिस म्हणाला, ‘येथील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल असल्याचे भासत नाही. दोन कसोटी सामने निकाली ठरले असले, तरी गोलंदाज म्हणून आम्हाला खेळपट्टीवर अधिक हिरवळ अपेक्षित आहे.’ फॉर्मात असलेल्या हॅरिसला अॅशेस मालिकेच्या तुलनेत येथील खेळपट्ट्या संथ असल्याचे वाटत आहे. आॅस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेत इंग्लंडचा ५-० ने सफाया केला होता. हॅरिस पुढे म्हणाला, ‘दोन सामने निकाली ठरले. मेलबोर्नमध्येही जवळजवळ निकाल शक्य होता. खेळपट्ट्यांबाबत टीका करणे अडचणीचे आहे. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल नाही, हे मात्र खरे. कसोटी क्रिकेट नेहमी कठीण असते. आम्हाला असमान उसळी असलेल्या खेळपट्ट्या अपेक्षित आहे, असे माझे मत नाही. पण ज्यावेळी आम्ही भारतात गेलो होतो त्या वेळी आम्हाला अडचणीत आणणाऱ्या खेळपट्ट्या होत्या. त्यामुळे येथे आम्हाला हिरवळ असलेल्या खेळपट्ट्या मिळाल्या असत्या तर चांगले झाले असते.’ (वृत्तसंस्था)
गेल्या वर्षी खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल होत्या. त्या वेळी मिशेलसह माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. गेल्या वर्षी जॉन्स, सिडल व माझी कामगिरी चांगली झाली. पण, त्यात खेळपट्ट्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली; पण या वेळी मात्र तसे घडत नाही,त्यामुळे निराश झालो.
- रॅन हॅरिस, गोलंदाज
ह्युजच्या स्मृती पुन्हा ताज्या होतील : वॉटसन
फिलिप ह्युजचा मृत्यू झालेल्या मैदानावर पुन्हा खेळण्यास शेन वॉटसनमध्ये विशेष उत्साह नाही. भारताविरुद्ध येथे चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी ज्यावेळी मैदानात दाखल होईल त्या वेळी दिवंगत ह्युजच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतील, असे मत आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसनने व्यक्त केले.
सिडनी क्रिकेट मैदानावर स्थानिक सामन्यादरम्यान सीन एबटचा बाउन्सर डोक्यावर आदळल्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ह्युजचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे आॅस्ट्रेलियन संघाला धक्का बसला होता. त्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेच्या कार्यक्रमामध्ये बदल करावा लागला. आत ६ जानेवारीपासून प्रारंभ होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा या आठवणी ताज्या होणाऱ्या आहेत.
वॉटसन म्हणाला, की फिलच्या अंत्यसंस्कारापूर्वी येथे आलो होतो. त्यानंतर प्रथमच या मैदानावर पाय ठेवणार आहे. मला या मैदानावर खेळण्याबाबत विशेष उत्सुकता नाही. अखेर फिलसोबत जे काही घडले त्यातून सावरण्यासाठी बराच वेळ मिळालेला आहे. पण या मैदानावर दाखल झाल्यानंतर पुन्हा त्या आठवणी ताज्या होतील.
सिडनी कसोटीमध्ये जॉन्सनच्या खेळण्याबाबत साशंकता
आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे शनिवारी सराव सत्रात सहभागी झाला नाही. त्यामुळे सिडनी कसोटीमध्ये जॉन्सनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. आॅस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत यापूर्वीच २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. जॉन्सन संघाचा प्रमुख गोलंदाज असून, दुखापतीमुळे तो सराव सत्रात सहभागी झाला नाही. यंदा आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित आयसीसी विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगताना जॉन्सन सिडनी कसोटीतून माघार घेण्याची शक्यता आहे.
या मालिकेत १३ बळी घेणाऱ्या ३३ वर्षीय जॉन्सनने शुक्रवारी स्नायूच्या दुखापतीबाबत सांगितले. त्यामुळे सिडनी कसोटीपूर्वी आयोजित सराव सत्रातून त्याने माघार
घेतली.