हॅरि केनचा चेल्सीला तडाखा
By admin | Published: January 3, 2015 02:28 AM2015-01-03T02:28:11+5:302015-01-03T02:28:11+5:30
चेल्सीला गुरुवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत टोटेन्हॅम हॉटस्पूर संघाकडून ५-३ असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.
लंडन : इंग्लिश प्रीमिअर लीगच्या (ईपीएल) गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या चेल्सीला गुरुवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत टोटेन्हॅम हॉटस्पूर संघाकडून ५-३ असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे चेल्सी मॅनेजर जोस मॉरिन्हो यांची वर्षाची सुरुवात निराशाजनक झाली. या पराभवामुळे चेल्सीला ४६ गुणांसह मॅन्चेस्टर सिटीसह अव्वल स्थानावर संयुक्तरीत्या समाधान मानावे लागले. हॉटस्पूरने ३४ गुणांसह सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. या विजयाचा स्टार ठरला तो दोन गोल करणारा २१वर्षीय हॅरी केन.
मॉरिन्हो यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या चेल्सीला पहिल्यांदाच ५ गोल्स खावे लागले. १८व्या मिनिटाला डिएगो कोस्टाने चेल्सीचे खाते उघडले, परंतु ३०व्या मिनिटाला हॅरि केन याच्या गोलने सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर डॅनी रोझ (४४ मि.) व
अॅड्रॉस टाऊनसेंड (४५ मि.) यांनी गोल करून हॉटस्पूरला मध्यांतरापर्यंत ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरानंतर केन याने गोल करून ही आघाडी आणखी मजबूत केली. (वृत्तसंस्था)
च्केन, रोझ आणि टाऊनसेंड यांनी सात मिनिटांच्या कालावधीत तीन गोल करून चेल्सीला हतबल केले. याला एडन हजार्ड याने चोख पत्युत्तर दिले, परंतु नेसर चॅडली याने गोल करून त्याच्या उत्तराची हवा काढली. जॉन टेरीने ८७व्या मिनिटाला गोल केला.
च्मात्र, हॉटस्पूरने ५-३ने विजय निश्चित केला. या पराभवानंतर चेल्सीचे मॅनेजर जोस मॉरिन्हो म्हणाले, बचावात आमच्याकडून चुका झाल्या. त्यात काही वैयक्तिक खेळाडूंच्याही चुकांचा समावेश आहे. नेसर चॅडली आणि हॅरि केन यांचे आक्रमण परतवणे सोपे नव्हते.
1991 मध्ये चेल्सीला ०-७ अशा फरकाने नॉटींगहॅम फॉरेस्टने पराभूत केले होते. त्यानंतर कोणत्याही संघाला त्यांच्याविरुद्ध पाचहून अधिक गोल करता आले नाहीत.
2013मध्ये साऊथअॅम्पटनने चेल्सीला पहिल्या हाफमध्ये १-०ने पिछाडीवर टाकले होते. त्यानंतर गुरुवारी हॉटस्पूरने चेल्सीला ३-१ने पिछाडीवर टाकले.
03 वेळा ईपीएलमध्ये चेल्सीविरुद्ध संघाला पाच गोल करण्यात यश आले आहे. याआधी १९९६मध्ये लिव्हरपूलने ५-१ने, तर २०११मध्ये आर्सेनलने ५-३ने चेल्सीला नमवले होते.