हर्षदा निठवेला सांघिक गोल्ड
By admin | Published: September 20, 2016 05:29 AM2016-09-20T05:29:50+5:302016-09-20T05:29:50+5:30
ज्युनिअर नेमबाजांनी अझरबैजान येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषक नेमबाजीत पदकांची लूट सुरू ठेवली
नवी दिल्ली : ज्युनिअर नेमबाजांनी अझरबैजान येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषक नेमबाजीत पदकांची लूट सुरू ठेवली आहे. भारताने दुसऱ्या दिवशी सोमवारी एका सुवर्णपदकासह सहा पदके जिंकली. यात महाराष्ट्राची हर्षदा निठवे हिने भारताला सांघिक सुवर्णपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. या स्पर्धेत आता भारताची एकूण पदकांची संख्या १३वर पोहोचली आहे. त्यात भारताने पहिल्याच दिवशी सात पदके जिंकली होती. त्यात तीन सुवर्णपदकांचा समावेश होता. त्यांपैकी दोन सुवर्णपदके जिंकून देण्यात महाराष्ट्राचा प्रतिभावान नेमबाज संभाजी पाटील याचा सिंहाचा वाटा होता.
भारताला आज एकमेव सुवर्णपदक ज्युनिअर मुलींच्या १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत औरंगाबादच्या हर्षदा निठवे हिच्यासह यशस्विनी सिंह देशवाल, मलाइका गोयल यांच्या संघाने जिंकून दिले. भारतीय संघाने एकूण १,१२२ गुणांची नोंद केली. तुर्कीने रौप्य आणि उझबेकिस्तानने कांस्यपदक जिंकले. वैयक्तिक गटात हर्षदा निठवेचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यात रशियाच्या लोमोव्हा मार्गारिटा हिने सुवर्णपदक जिंकले. झेक प्रजासत्ताकाच्या डेडोव्हा अॅनाने रौप्यपदक मिळविले. कस्यिंपदक इजिप्तच्या खेळाडूने जिंकले.
गौरव राणा, हेमेंद्र कुशवाहा आणि सौरभ यांनी १० मीटर एअर पिस्टलमध्ये देशाला सांघिक रौप्यपदक जिंकून दिले. अनमोलने या स्पर्धेत वैयक्तिक गटात रौप्यपदक जिंकले. अनमोलने १९७.५ गुण नोंदवले. रशियन नेमबाजाने सुवर्ण जिंकले.
गायत्री नित्यानंदमने सोनिका, अदितीसिंह यांच्या साथीने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. वैयक्तिक गटातही गायत्रीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताला दुसऱ्या दिवसातील अखेरचे पदक अनंतजितसिंह नरुका, सुखबीरसिंह आणि हम्हजा शेख या मुलांच्या स्कीट संघाने ३३७ गुणांसह कांस्यपदक जिंकले.
>हर्षदाने खांद्याच्या दुखापतीनंतरही जिंकले सुवर्ण
स्पर्धेत उतरण्याआधी हर्षदा निठवे हिचा स्ट्रेचिंगदरम्यान खांदा दुखावला होता. त्यामुळे ती पदक जिंकू शकेल, अशी परिस्थितीच नव्हती; परंतु दुखापतीनंतरही हर्षदाने भारताला विश्वचषक ज्युनिअर नेमबाजीत सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले. त्याचप्रमाणे वैयक्तिक गटातही तिचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. ती पूर्णपणे तंदुरुस्त असती, तर तिने वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले असते. कारण तिचा सरावातही स्कोअर चांगला होता, अशी प्रतिक्रिया हर्षदा निठवे हिचे प्रशिक्षक संग्राम देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
>हर्षदाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी
२०१५ : नवी दिल्ली येथील आठवी एअर आशियाई स्पर्धेत वैयक्तिक कांस्य व सांघिक सुवर्ण२०१५ :
कुवैत येथील १३व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत सांघिक सुवर्ण२०१६ :
झेकोस्लाव्हिकिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग२०१६ :
अझरबैजान येथील विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सांघिक सुवर्ण