विनेश फोगाट राजकारणात येणार; बहिणीविरूद्धच शड्डू ठोकणार? हरियाणा निवडणुकीत चुरस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 05:30 PM2024-08-20T17:30:29+5:302024-08-20T17:31:00+5:30
विनेश फोगाट राजकारणात येण्याची शक्यता आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये गोल्डन कामगिरी करण्याचे स्वप्न हुकताच विनेश फोगाटने कुस्तीला रामराम केले. या स्टार महिला कुस्तीपटूचे भारतात परतल्यावर जंगी स्वागत करण्यात आले. हरियाणाचे प्रमुख काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा विनेशच्या स्वागतासाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. त्यांच्या येण्याने विनेशच्या राजकारणात प्रवेश झाल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. आता ती लवकरच याबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचे कळते. माहितीनुसार, विनेश तिची चुलत बहीण आणि माजी कुस्तीपटू बबिता फोगाट विरुद्ध हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवू शकते.
नवभारत टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तनुसार, अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगाट हरियाणा विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विनेशने यापूर्वी ती सक्रिय राजकारणात येणार नसल्याचे सांगितले असले तरी काही राजकीय पक्ष तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विनेशची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या फ्रीस्टाइल ५० किलो गटात सुवर्ण पदक जिंकण्याची संधी हुकली कारण तिला १०० ग्रॅम जास्त वजनामुळे अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आले.
विनेशची नवी इनिंग?
काँग्रेस खासदार दीपेंद्र हुडा आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी विनेशला दिल्ली विमानतळावर पुष्पहार अर्पण केला. मात्र, विनेश कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. विनेशच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारले असता, फोगाट कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी IANS शी बोलताना सूचक विधान केले. त्यांनी सांगितले की, होय, का नाही? हरियाणा विधानसभेत तुम्हाला विनेश फोगाट विरुद्ध बबिता फोगाट आणि बजरंग पुनिया विरुद्ध योगेश्वर दत्त अशी लढत दिसण्याची शक्यता आहे. काही राजकीय पक्ष विनेशची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
विशेष म्हणजे विनेश फोगाटसह अनेक पैलवानांनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध आंदोलन केले होते. या विरोधानंतर बजरंग पुनियाने कुस्ती संघटनेच्या विरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. त्याचे गुरू योगेश्वर दत्त यांच्या विरोधात तो लढला तर ही स्पर्धा रंजक असेल. दोघेही ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. दुसरीकडे, बजरंग पुनिया हा भाजप नेत्या बबिता फोगाटचा मेहुणा आहे. बबिताची धाकटी बहीण संगीता हिच्याशी त्याचे लग्न झाले आहे.