सकारात्मक विचाराने प्रेरित झाले
By admin | Published: September 8, 2016 04:28 AM2016-09-08T04:28:25+5:302016-09-08T04:28:25+5:30
रिओ आॅलिंपिक माझे पहिलेच आॅलिंपिक असल्याने प्रशिक्षक गोपीचंद यांनी मला कोणत्याही दडपणाशिवाय खेळण्याचा सल्ला दिला
मुंबई : रिओ आॅलिंपिक माझे पहिलेच आॅलिंपिक असल्याने प्रशिक्षक गोपीचंद यांनी मला कोणत्याही दडपणाशिवाय खेळण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच प्रत्येक वेळी कोर्टवर उतरल्यानंतर ‘होय, मी हे करू शकते’ असा सकारात्मक विचार करून स्वत:ला प्रेरित करीत होते. किंबहुना हाच माझ्या रिओ यशाचा मंत्र आहे, असे रिओ पदकविजेती पी. व्ही. सिंधूने सांगितले.
मुंबईत झालेल्या एका सत्कार समारंभादरम्यान सिंधूने आपली प्रतिक्रिया दिली. ‘जम्प स्मॅश’बाबत सिंधू म्हणाली, ‘‘रिओच्या काही दिवसांआधी मी जम्प स्मॅशचा कसून सराव केला. माझ्या वडिलांना जम्प स्मॅश खूप आवडत असे. त्यामुळे मी जम्प स्मॅश शिकण्याची इच्छा प्रशिक्षकांपुढे मांडली. त्यांनी तत्काळ त्या पद्धतीने सराव घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला उंचीचा अंदाज न आल्याने खूप वेळा शटल नेटमध्येच राहिले. मात्र सातत्याने सराव केल्यानंतर जम्प स्मॅश शिकले. रिओ आॅलिंपिकमध्ये माझ्या उंचीचा फायदा घेत जम्प स्मॅशचा प्रभावी वापर खूप फायदेशीर ठरला. अंतिम सामन्यात दडपण नव्हते; मात्र संपूर्ण भारतीयांच्या अपेक्षा माझ्यावर आहेत, याची जाणीव होती. आॅलिंपिकमध्ये पदक मिळवणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. निर्णायक सामन्यात मी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. मरिन कॅरोलिनाने दर्जेदार खेळ केला. पराभवामुळे निराश झाली खरी; मात्र ती वेळ माझ्या पराभवाचे चिंतन करण्याची नव्हती तर एक खेळाडू म्हणून कॅरोलिनाच्या विजयाचे अभिनंदन करण्याची होती,’’ अशा शब्दांत भावना सिंधूने व्यक्त केल्या. गत आॅलिंपिकच्या तुलनेत यंदो चिनी बॅडमिंटनपटूंचे वर्चस्व कमी होते. एकंदरीत आॅलिंपिक यशाकडे पाहता आता जबाबदारी वाढली आहे. ‘‘आगामी वर्ल्ड सुपर सिरिजमध्ये सुवर्णपदकाच्या निर्धाराने मी तयारी करत आहे. आॅलिंपिकमध्ये पदक मिळवल्याने आता माझ्यावर अधिक जबाबदारी आलेली आहे.’’ असे ती शेवटी म्हणाली.(क्रीडा प्रतिनिधी)