प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी ठरल्याने आत्मविश्वास वाढला
By Admin | Published: February 22, 2016 01:12 AM2016-02-22T01:12:48+5:302016-02-22T01:12:48+5:30
नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) भारतीय संघात समावेश असल्याने कर्णधार अनुप कुमार, विशाल माने, मोहित चिल्लर आणि सुरेंद्र नाडा या अव्वल चार खेळाडूंना
- रोहित नाईक, जयपूर
नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) भारतीय संघात समावेश असल्याने कर्णधार अनुप कुमार, विशाल माने, मोहित चिल्लर आणि सुरेंद्र नाडा या अव्वल चार खेळाडूंना काही वेळ प्रो कबड्डीपासून दूर राहावे लागले होते. यामुळे गतविजेता यू मुंबा संघ एकाकी दुबळा वाटू लागला. या संधीचा फायदा घेण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ आसुसलेले होते. मात्र झाले भलतेच. यू मुंबाच्या खेळाडूंनी कोणतेही दडपण न घेता सलग तीन सामने जिंकताना आपली मजबूत राखीव फळी सिद्ध केली.
विशेष म्हणजे यू मुंबाचा आघाडीचा खेळाडू रिशांक देवाडिगाने या तिन्ही सामन्यांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना संघासाठी निर्णायक कामगिरी केली. यानिमित्ताने त्याने ‘लोकमत’शी बातचीत करताना यामुळे सध्या वेगळाच आत्मविश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
चार प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचे दडपण होतेच. मात्र नवोदितांवर विश्वासही होता. त्यांना कुठे आणि कसे खेळवायचे याची रणनीती सुरू असताना आपण स्वत:हून जबाबदारी घ्यावी अशी जाणीव झाली. मी संघासाठी स्वत:ला झोकून दिले. यामध्ये यशस्वी झाल्याचा खूप आनंद आहे आणि आता चारही स्टार खेळाडूंचे पुनरागमन झाल्याने संघ जबरदस्त मजबूत झाला आहे. शिवाय संघाची जबाबदारी स्वत:हून घ्यायची असल्याने केवळ माझा नैसर्गिक खेळ केला आणि यामुळे जी लय मिळाली तीच लय आता पुढे कायम ठेवायची आहे, असे रिशांकने या वेळी सांगितले. बोनसचा बादशाह अनुप कुमारच्या अनुपस्थितीत रिशांकने यू मुंबासाठी बोनस गुणांची कमाई केली.
स्पर्धेच्या सुरुवातीला पटनाविरुद्ध पराभव झालेला असल्याने या वेळी त्या चुका टाळण्याचे लक्ष्य होते आणि तेच आम्ही केले. पटनाच्या आक्रमकांना तिसऱ्या रेडमध्ये पकडण्याची आमची रणनीती होती आणि ते त्यामध्ये सहज अडकले. यापुढेही प्रत्येक संघाविरुद्धची रणनीती तयार असून, मुंबईकरांनी असाच पाठिंबा आम्हाला कायम द्यावा आणि त्या जोरावर आम्ही नक्कीच यशस्वी होऊ
- रिशांक देवाडिगा, यू मुंबा