हातपाय बांधून तो पोहला पाच किलोमीटर!
By admin | Published: March 3, 2017 08:13 PM2017-03-03T20:13:53+5:302017-03-03T20:13:53+5:30
गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नावाची नोंद व्हावी हा एकच ध्यास घेत त्याने लोखंडी साखळ्यांनी स्वत:चे हातपाय बांधून घेत पाच किमी पोहण्याचा प्रयत्न केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागापट्टणम, दि. 03 - गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नावाची नोंद व्हावी हा एकच ध्यास घेत त्याने लोखंडी साखळ्यांनी स्वत:चे हातपाय बांधून घेत पाच किमी पोहण्याचा प्रयत्न केला. बंगालच्या खाडीत दोन तास २० मिनिटे ४८ सेकंद पोहलेल्या या १९ वर्षांच्या विद्यार्थ्याचे नाव आहे एस. सबरीनाथ!
स्थानिक जिल्हा क्रीडा अधिकारी बी. शिवा यांनी दिलेल्या माहितीनुसार हातपाय बांधून पोहण्याचा रेकॉर्ड कर्नाटकच्या उडीपी येथील गोपाल खार्वी याच्या नावावर आहे. ३७ वर्षांच्या गोपालने २०१३ मध्ये उडीपीतील माल्पे बीचवर हातपाय बांधून दोन तास ४३ मिनिटे ३.०७ सेकंदांत पाच किमी अंतर पूर्ण केले होते.
सबरीनाथने गिनीज समितीच्या निर्देशानुसार गिनीज रेकॉर्डसाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्याने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची देखील परवानगी घेतली होती. सबरीनाथ याच्या प्रयत्नाचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले असून ते गिनीज समितीकडे पाठविण्यात आले आहे.