आयपीएलविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी बंद
By admin | Published: July 13, 2015 12:36 AM2015-07-13T00:36:30+5:302015-07-13T00:36:30+5:30
इंडियन प्रीमियर लीगमधील कथित भ्रष्टाचाराला आळा बसेपर्यंत या आयोजनावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी बंद करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमधील कथित भ्रष्टाचाराला आळा बसेपर्यंत या आयोजनावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी बंद करण्यात आली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. जी. रोहिणी आणि न्या. जयंत नाथ यांच्या पीठाने आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगसह अनेक त्रुटी असल्याप्रकरणी आयपीएलचे नियंत्रण सरकारने स्वत:कडे घेण्याविषयी केंद्राला आदेश देण्याविषयीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे स्पष्ट केले. याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने समितीदेखील नेमली आहे. त्यामुळे या न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे न्यायपीठाने स्पष्ट केले.
असोसिएशन फॉर सोशल अॅन्ड ह्युमॅनिटेरियन अफेअर्स या संघटनेच्या जनहित याचिकेवर न्यायालयाने हे मत मांडले. बीसीसीआयला भारतात क्रिकेटच्या संचालनासाठी बेकायदेशीर आणि अनधिकृत घोषित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)