हार्दिक, जयंत सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज

By admin | Published: February 5, 2017 04:02 AM2017-02-05T04:02:41+5:302017-02-05T04:02:41+5:30

हार्दिक पंड्या व दुखापतीतून सावरलेला जयंत यादव आज, रविवारपासून बांगलादेश आणि भारत ‘अ’ संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या दोन दिवसीय सराव सामन्यात भारतीय

Hearty, Jayant is ready for the best performance | हार्दिक, जयंत सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज

हार्दिक, जयंत सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज

Next

हैदराबाद : हार्दिक पंड्या व दुखापतीतून सावरलेला जयंत यादव आज, रविवारपासून बांगलादेश आणि भारत ‘अ’ संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या दोन दिवसीय सराव सामन्यात भारतीय संघव्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्नशील असतील.
इंग्लंडविरुद्ध मोहाली कसोटी सामन्यापूर्वी हार्दिकच्या खांद्याला दुखापत झाली होती. दुखापतीतून सावरल्यानंतर तो अलीकडेच संपलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळला होता. जयंत यादवने अलीकडेच मुश्ताक अली चषक स्पर्धेत उत्तर विभागाच्या लीग सामन्यांत हरियाणा संघाचे प्रतिनिधित्व केले.
मुशफिकर रहीमच्या संघाविरुद्ध सराव सामन्यात या दोन खेळाडूंव्यतिरिक्त राखीव सलामीवीर फलंदाज अभिनव मुकुंदच्या कामगिरीवर नजर राहील. या तिन्ही खेळाडूंचा कसोटी संघात समावेश आहे. या लढतीला मात्र अधिकृत प्रथम श्रेणी लढतीचा दर्जा मिळणार नाही.
लोकेश राहुल किंवा मुरली यांच्यापैकी एक खेळाडू अनफिट ठरला तरच मुकुंदला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळेल. हार्दिक व जयंत यांच्यासाठी ही लढत महत्त्वाची ठरणार आहे. कारण कोहली आणि कुंबळे यांच्यापैकी एकाची अष्टपैलू खेळाडूच्या स्थानासाठी निवड करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून पांढऱ्या चेंडूने क्रिकेट खेळल्यानंतर हे दोन्ही गोलंदाज प्रदीर्घ काळ गोलंदाजी करण्यास उत्सुक असतील.
मुकुंदसाठी रणजी मोसम समाधानकारक ठरला. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी तिसरा सलामीवीर म्हणून दावा मजबूत करण्यासाठी मुकुंद सावधगिरी बाळगत फलंदाजी करण्याची शक्यता आहे. रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावणारा प्रियांक पांचाल आंतरराष्ट्रीय माऱ्याला प्रथमच सामोरे जाणार आहे. पांचालला तसकीन अहमद व शकिबुल हसन यांच्यासारख्या गोलंदाजांचा मारा खेळण्याची संधी मिळणार आहे.
युवा खेळाडू ईशान किशन व ऋषभ पंत यांच्याबाबत बरीच चर्चा होत आहे. हे खेळाडूही या लढतीत खेळणार आहेत. डावखुरा फिरकीपटू नदीमला रहीम, तमिम इक्बाल
आणि मोमिनुल हक यांच्याविरुद्ध कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेत चौधरी आणि चमा मिलिंद कशी कामगिरी करतात, याबाबत उत्सुकता आहे. झहीर खानने निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारत क्रिकेटच्या सर्वच प्रकारासाठी डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध घेत आहे. अनुभवी आशिष नेहरा टी-२० क्रिकेटमध्ये खेळत असून, पाच दिवसीय क्रिकेटमध्ये भारताला विविधता
हवी आहे. (वृत्तसंस्था)

प्रतिस्पर्धी संघ
भारत ‘अ’ :- अभिनव मुकुंद (कर्णधार), प्रियांक पांचाल, श्रेयस अय्यर, ईशांक जग्गी, ऋषभ पंत, ईशान किशन (यष्टिरक्षक), विजय शंकर, हार्दिक पंड्या, शाहबाज नदीम, जयंत यादव, कुलदीप यादव, अनिकेत चौधरी, चमा मिलिंद, नितीन सैनी (यष्टिरक्षक).
बांगलादेश :- मुशफिकर रहीम (कर्णधार व यष्टिरक्षक), इमरुल कायेस, तमिम इक्बाल, मोमिनुल हक, महमुदुल्लाह रियाध, सब्बीर रहमान, शकिबुल हसन, लियोन कुमार दास, तास्किन अहमद, सुभाशिष रॉय, कामरुल इस्लाम रब्बी, सौम्य सरकार, ताईजुल इस्लाम, शफियुल इस्लाम, मेहदी हसन मिराज.

Web Title: Hearty, Jayant is ready for the best performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.