'हिमा पदकासाठी धावली नव्हती, तिची स्पर्धा होती घड्याळाशी!'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 12:53 PM2018-07-17T12:53:47+5:302018-07-17T12:54:40+5:30
जागतिक अजिंक्यपद (20 वर्षांखालील ) स्पर्धेत भारताला ट्रॅक प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकून देणा-या हिमा दासने कधी पदकासाठी सराव केला नाही, तिने नेहमी घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा केली आहे. तिच्या यशामागचे हे गुपित तिचे प्रशिक्षक निपुण दास यांनी उलगडले आहे.
गुवाहाटी - जागतिक अजिंक्यपद (20 वर्षांखालील ) स्पर्धेत भारताला ट्रॅक प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकून देणा-या हिमा दासने कधी पदकासाठी सराव केला नाही, तिने नेहमी घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा केली आहे. तिच्या यशामागचे हे गुपित तिचे प्रशिक्षक निपुण दास यांनी उलगडले आहे.
तिला सरावासाठी उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी येथील इंदिरा गांधी अॅथलेटिक्स स्टेडियमवर जानेवारी 2017 मध्ये दास घेऊन आले. हिमाच्या यशामागे निपूण यांचाही मोलाचा वाटा आहे. ते म्हणाले, 'ती इतरांपेक्षा वेगळीच आहे. शिस्तबद्ध आणि मजबूत निर्धाराची. कामगिरी उंचावण्यासाठी ती मुलांबरोबर सराव करायची. सर्वोत्तम वेळ नोंदवण्यासाठी कितीही परिश्रम घेण्याची तिची तयारी असते. तिला देवाने वरदानच दिले आहे, परंतु त्याच वेळी तिने अथक परिश्रमही केले आहेत. त्यामुळे ती इतरांपेक्षा निराळी ठरत आहे. 400 मीटर धावण्याच्या पहिल्याच प्रयत्नात तिने 57 सेकंदाची वेळ नोंदवली. त्यावेळीच आपण भविष्यातील चॅम्पियन्ससोबत काम करत असल्याचे मला जाणवले.'
हिमाला सरावासाठी गुवाहाटी येथे पाठवण्यासाठी वडील रंजीत यांचे मन वळवल्यानंतर निपुण यांनी इंदिरा गांधी अॅथलेटिक्स स्टेडियमच्या बाजूलाच हिमाच्या राहण्याची सोय केली. 'अॅथलेटिक्सची सुरूवात करण्यापूर्वी हिमाचा कल फुटबॉलकडे होता. ती मला नेहमी सांगायची की ती पदकासाठी नाही, तर घड्याळ्याच्या काट्याशी शर्यत करते,' असे निपुण यांनी सांगितले.
ऑगस्टमध्ये होणा-या आशियाई स्पर्धेतील हिमाच्या कामगिरीबद्दल निपुण म्हणाले, हिमाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत आणि ती अपेक्षांची पुर्तता करेल, अशी मला खात्री आहे.