हेराथमुळे टीम इंडियाचे ‘हे राम’

By admin | Published: August 16, 2015 10:46 PM2015-08-16T22:46:36+5:302015-08-16T22:46:36+5:30

पहिल्या तीन दिवसांमध्ये वर्चस्व राखून सामना आपल्या बाजूने झुकविल्यानंतरही फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारताला श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात

Herath, Team India's 'Hey Ram' | हेराथमुळे टीम इंडियाचे ‘हे राम’

हेराथमुळे टीम इंडियाचे ‘हे राम’

Next

गॉल : पहिल्या तीन दिवसांमध्ये वर्चस्व राखून सामना आपल्या बाजूने झुकविल्यानंतरही फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारताला श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ६३ धावांनी निराशाजनक हार पत्करावी लागली. श्रीलंकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात निर्णायक नाबाद दीडशतक झळकावून संघाला विजयी करणाऱ्या दिनेश चंडीमलला सामनावीर म्हणून घोषित केले. लंकेच्या रंगाना हेराथने ७ गडी बाद करताना भारतीयांचे कंबरडे मोडले. १७६ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव ११२ धावांत ढेपाळला.
स्वातंत्र्यदिनी भारतीय खेळाडू विजयी भेट देणार, अशी आशा लावलेल्या क्रिकेटप्रेमींच्या पदरी अखेर निराशाच आली. पराभवापेक्षा तीन दिवस वर्चस्व राखूनदेखील हार पत्करावी लागले, याचे दु:ख अधिक होते. १७६ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या भारताने तिसऱ्या दिवशी १ बाद २३ अशी मजल मारली होती. चौथ्या दिवशी या धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
नाइट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेल्या इशांत शर्माच्या रूपाने हेराथने भारताला चौथ्या दिवशी पहिला झटका दिला. २ बाद ३० अशा अवस्थेतून सावरत असतानाच हेराथने फॉर्मशी झगडत असलेल्या रोहित शर्माचा त्रिफळा उडवताना भारताला मोठा धक्का दिला. रोहितने २३ चेंडंूचा सामना करताना केवळ १० धावा काढल्या. यानंतर लगेच थरिंदू कौशलने कर्णधार विराट कोहलीला (३) बाद केले आणि नंतर १५ धावांच्या अंतराने सलामीवीर शिखर धवनचा (२८) स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेऊन संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. अर्धा संघ ६० धावांमध्ये बाद झालेला असतानाच भारताच्या पराभवाची चाहूल लागली.
यानंतर वृद्धिमान साहा (२), हरभजन सिंग (१) आणि आर. आश्विन (३) हेराथचे शिकार ठरल्याने भारताची ८ बाद ८१ धावा अशी केविलवाणी अवस्था झालेली. या वेळी सर्वांच्या नजरा होत्या त्या दुसऱ्या टोकावरून झुंजारपणे खेळणाऱ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीकडे. त्याने संघाकडून सर्वाधिक ३६ धावांची झुंजार खेळी केली. मात्र इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्याने त्याची झुंज अपयशीच ठरली. हेराथनेच ४७ व्या षटकात रहाणेला झेलबाद करून भारताचा पराभव स्पष्ट केला. यानंतर ५० व्या षटकात कौशलने अमित मिश्राला बाद करून लंकेच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. पहिल्या डावात संघ १८३ धावांत बाद झाल्यानंतर १९२ धावांची पिछाडी भरून काढताना चंडीमलने आक्रमक व निर्णायक नाबाद १६२ धावांची खेळी करीत संघाला केवळ मजबूत स्थितीत न आणता विजयी केले. हेराथने यानंतर आपल्या फिरकीच्या जोरावर भारतीय फलंदाजांना नाचवत तब्बल ७ बळी घेऊन संघाला शानदार विजय मिळवून दिला. कौशलनेदेखील ३ महत्त्वपूर्ण बळी घेत हेराथला चांगली साथ दिली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना कोलंबो येथे २० ते २४ आॅगस्टदरम्यान खेळविण्यात येईल.

संगकाराला दिला निरोप...
१५ वर्षांपूर्वी गाले क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यातूनच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या महान क्रिकेटपटू कुमार संगकाराला लंकेच्या खेळाडूंनी आणि क्रिकेटचाहत्यांनी भावपूर्ण निरोप दिला. पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६३ धावांनी बाजी मारली असली तरी या सामन्यात संगकाराला मात्र विशेष चमक दाखवता आली नाही.
पहिल्या डावात संगकारा ५ व दुसऱ्या डावात ४० धावांवर बाद झाला. संघाच्या विजयानंतर संगकाराच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही स्पष्ट करणारा होता. सामना संपल्यानंतर संगकाराने सर्वप्रथम विजयाचे शिल्पकार दिनेश चंडीमल आणि रंगाना हेराथ यांना मिठी मारल्यानंतर त्याने कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला मिठी मारली. तसेच वेगवान गोलंदाज धम्मिका प्रसाद आणि इतर खेळाडूंनी संगकाराला खांद्यावर उचलून मैदानाची फेरी मारली. या वेळी क्रिकेटचाहत्यांनी उभे राहून या दिग्गज खेळाडूचे अभिनंदन केले. दरम्यान, या वेळी स्टेडियमच्या व्हीआयपी बॉक्समध्ये संगकाराचा परिवार उपस्थित होता.

धावफलक :
श्रीलंका : पहिला डाव - सर्व बाद १८३ आणि दुसरा डाव - सर्व बाद ३६७.
भारत : पहिला डाव - सर्व बाद ३७५ दुसरा डाव : लोकेश राहुल पायचित गो. हेराथ ५, शिखर धवन झे. व गो. कौशल २८, ईशांत शर्मा पायचित गो. हेराथ १०, रोहित शर्मा त्रि. गो. हेराथ ४, विराट कोहली झे. सिल्वा गो. कौशल ३, अजिंक्य रहाणे झे. मॅथ्यूज गो. हेराथ ३६, वृद्धिमान साहा यष्टिचित चंडीमल गो. हेराथ २, हरभजन सिंग झे. सिल्वा गो. हेराथ १, आर. आश्विन झे. प्रसाद गो. हेराथ ३, अमित मिश्रा झे. करुणारत्ने गो. कौशल १५, वरुण अ‍ॅरॉन नाबाद १. अवांतर : ४. एकूण : सर्व बाद ११२. गोलंदाजी : धम्मिका प्रसाद ४-२-४-०; रंगाना हेराथ २१-६-४८-७; थरिंदू कौशल १७.५-१-४७-३; नुवान प्रदीप ६-३-८-०; अँजेलो मॅथ्यूज १-०-३-०.

(वृत्तसंस्था)

Web Title: Herath, Team India's 'Hey Ram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.