टी-२० त सर्वोच्च धावसंख्येची नोंद चौथ्यांदा!
By admin | Published: September 8, 2016 04:23 AM2016-09-08T04:23:43+5:302016-09-08T04:23:43+5:30
ग्लेन मॅक्सवेल पल्लीकल येथे एका डावात सर्वोच्च खेळी करण्याच्या विक्रमापासून थोड्या फरकाने दूर राहिला, पण आॅस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध २६३ धावा ठोकून तिसऱ्यांदा सर्वोच्च धावांची नोंद केली.
नवी दिल्ली : ग्लेन मॅक्सवेल पल्लीकल येथे एका डावात सर्वोच्च खेळी करण्याच्या विक्रमापासून थोड्या फरकाने दूर राहिला, पण आॅस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध २६३ धावा ठोकून तिसऱ्यांदा सर्वोच्च धावांची नोंद केली. २००५ मध्ये टी-२० ला सुरुवात झाल्यापासून सर्वोच्च धावांची नोंद होण्याची ही केवळ चौथी वेळ ठरली. विशेष असे, की हा विक्रम केवळ दोन संघांच्या नावावर आहे. ते संघ आहेत, आॅस्ट्रेलिया आणि श्रीलंका!
१७ फेब्रुवारी २००५ ला पहिला टी-२० सामना आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात झाला. आॅस्ट्रेलियाने पाच बाद २१४ धावा उभारल्याने सलामीच्या सामन्यात २०० चा आकडा गाठला गेला. तत्कालीन कर्णधार रिकी पाँटिंगने नाबाद ९८ धावांचे योगदान दिले होते. ९ जानेवारी २००७ मध्ये आॅस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध पाच बाद २२१ धावा करीत मागच्या विक्रमात सुधारणा केली होती. त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या आयसीसी टी-२० विश्व चॅम्पियनशिपमध्ये ख्रिस गेल याने द. आफ्रिकेविरुद्ध नाबाद ११७ धावा ठोकून टी-२० तील पहिल्या शतकाची नोंद केली.
आॅस्ट्रेलियाच्या नावावर एका डावात सर्वोच्च धावांचा विक्रम फार काळ टिकला नाही. द. आफ्रिकेत झालेल्या पहिल्या आयसीसी टी-२० विश्व चॅम्पियनशिपदरम्यान श्रीलंकेने १४ सप्टेंबर २००७ मध्ये केनियाविरुद्ध जोहान्सबर्ग येथे ६ बाद २६० धावा करीत विक्रम स्वत:च्या नावे केला. तेव्हापासून पुढील नऊ वर्षांत एकही संघ २५० चा आकडा गाठू शकला नव्हता. आॅस्ट्रेलियाने ६ सप्टेंबर २०१६ ला २५० धावांचाच नव्हे, तर श्रीलंकेचा २६० धावांचा विक्रमही मागे टाकला. आतापर्यंत ५६५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले. त्यात ५१ वेळा संघांनी २०० च्यावर धावांची नोंद केली. याशिवाय केवळ सहा वेळा २४० च्यावर धावा नोंदल्या गेल्या. त्यातील तीन प्रसंग गेल्या दोन आठवड्यात घडले हे विशेष.
वेस्ट इंडिजने २७ आॅगस्ट २०१६ ला भारताविरुद्ध अमेरिकेत ६ बाद २४५ धावा केल्या होत्या. भारताने पाठलाग करताना ४ बाद २४४ पर्यंत मजल गाठली, पण एका धावेने पराभव पत्करला. आॅस्ट्रेलियाचा त्याआधी सर्वोच्च विक्रम ६ बाद २४८ धावांचा होता. त्यांनी ही खेळी २९ आॅगस्ट २०१३ ला इंग्लंडविरुद्ध केली होती. द. आफ्रिकेने ६ बाद २४१ धावा इंग्लंडविरुद्ध सेंच्युरियन येथे २००९ मध्ये ठोकल्या होत्या. सर्वाधिक दहा वेळा २०० वर धावा करण्याचा मान द. आफ्रिका संघाला जातो. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने नऊ वेळा, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी सहा वेळा, भारत आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी पाच वेळा, न्यूझीलंडने चार वेळा, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी प्रत्येकी दोन वेळा, तसेच झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघांनी प्रत्येकी एकदा २०० वर धावांची नोंद केली आहे. (वृत्तसंस्था)
टी-२०त सर्वोच्च १५६ धावांच्या खेळीचा विक्रम आॅस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिंचच्या नावावर आहे. मॅक्सवेलला काल हा विक्रम मागे टाकण्याची संधी होती. पण तो १४५ धावा काढून नाबाद राहिला. फिंचने २०१३ मध्ये साऊदम्पटन येथे इंग्लंडविरुद्ध खेळी करताना न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलमचा १२३ (बांगलादेशविरुद्ध पल्लीकल येथे) धावांचा विक्रम मागे टाकला. मॅक्युलमआधी ख्रिस गेल आणि द. आफ्रिकेचा ख्रिस लेव्ही यांनी प्रत्येकी ११७ धावा करीत वैयक्तिक धावसंख्या नोंदविण्यात दोघेही संयुक्तपणे अव्वल स्थानावर होते.