हायव्होल्टेज लढत आज

By admin | Published: February 27, 2016 04:06 AM2016-02-27T04:06:04+5:302016-02-27T04:06:04+5:30

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान आशिया कप टी-२० स्पर्धेत शनिवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा रंगतदार खेळ बघण्याची संधी

Highway Fighting Today | हायव्होल्टेज लढत आज

हायव्होल्टेज लढत आज

Next

मीरपूर : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान आशिया कप टी-२० स्पर्धेत शनिवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. ‘सख्खे शेजारी, पण पक्के...’ अशी ओळख असलेल्या या संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या लढतीत सर्वांची नजर वादग्रस्त वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरवर राहील.
आयसीसी विश्व टी-२० चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या फेरीत पुढील महिन्यात उभय संघांदरम्यान लढत होणार आहे. त्या लढतीची झलक शनिवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत अनुभवाला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट लढतींना मोठा इतिहास लाभला आहे. उभय संघांदरम्यानच्या लढतींचा शेजारी राष्ट्रांच्या राजकारणावरही प्रभाव जाणवतो. शनिवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत वादग्रस्त गोलंदाज आमिरला अंतिम संघात स्थान मिळते किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे पाच वर्षांच्या बंदीला सामोरा गेल्यानंतर आमिरने न्यूझीलंड दौऱ्यात राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. आमिर भारतीय फलंदाजांविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहे. विराट कोहलीने यापूर्वीच आमिरच्या पुनरागमनाचे स्वागत केले आहे, पण कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह अन्य भारतीय खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळलेल्या या खेळाडूबाबत काय विचार करतात, याची कल्पना नाही. भारतात बीसीसीआयने एस. श्रीसंत, अंकित चव्हाण यांच्यासारख्या खेळाडूंवर आजीवन बंदी घातली आहे. त्यामुळे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये त्यांना पुनरागमनची संधी नाही.
आमिरने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली तर पाक क्रिकेट चाहत्यांच्या हृदयातही त्याला स्थान मिळेल. तयारीचा विचार करता उभय संघ गेल्या महिनाभरापासून बरेच टी-२० क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे उभय संघांची तयारी चांगली झाली आहे. भारताने विश्व टी-२० स्पर्धेची चांगली तयारी करताना यंदा सातपैकी सहा सामने जिंकले आहेत. दुसऱ्या बाजूचा विचार करता पाकिस्तानचे खेळाडू पाकिस्तान सुपर लीग खेळून येथे दाखल झाले आहे.
जागतिक पातळीवर भारताला पाकविरुद्ध पराभव स्वीकारावा लागलेला नाही. धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला योग्यवेळी सूर गवसलेला आहे.

जर संघव्यवस्थापनाचा पाठिंबा आहे, याची कल्पना असेल तर त्या खेळाडूला नैसर्गिक खेळ करता येतो. आमचा संघ मजबूत असून कुठल्याही प्रतिस्पर्ध्याचे आव्हान पेलण्यास सक्षम आहे. पाकिस्तानची गोलंदाजीची बाजू मजबूत असली तर आमची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. केवळ मोहम्मद आमिरच नाहीतर अन्य गोलंदाजांविरुद्धही चांगली कामगिरी करण्यास प्रयत्नशील राहील. -रोहित शर्मा, भारतीय सलामीवीर

आमचे वेगवान गोलंदाज पहिल्या सहा षटकांमध्ये भारताच्या आघाडीच्या फळीविरुद्ध वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहेत. भारताची आघाडीची फळी मजबूत आहे. फिरकीपटूंविरुद्ध भारतीय फलंदाज चांगले खेळतात, असा अनुभव आहे, पण माझ्यासह पीएसएलमध्ये चमकदार कामगिरी करणारा मोहम्मद नवाज भारतीय फलंदाजांचे आव्हान पेलण्यास सक्षम आहे.
- शाहिद आफ्रिदी, पाकिस्तानचा कर्णधार

प्रतिस्पर्धी संघ : भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आशिष नेहरा, जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, पार्थिव पटेल, भुवनेश्वर कुमार आणि हरभजन सिंग. पाकिस्तान : शाहिद आफ्रिदी (कर्णधार), मोहम्मद हफीज, शारजील खान, उमर अकमल, शोएब मलिक, खर्रम मंजूर, मोहम्मद नवाज, सरफराज अहमद, मोहम्मद आमिर, मोहम्मद हरफान, मोहम्मद समी, वहाब रियाज, अनार अली, इफ्तिखार अहमद आणि इमाद वसीम.

वेळ : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ पासून.

Web Title: Highway Fighting Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.