'हारना नहीं है हिमा'... जग जिंकण्यासाठी 'सुवर्णकन्ये'ला वाढवावा लागेल वेग, गाठावी लागेल 'ती' वेळ!
By स्वदेश घाणेकर | Published: July 23, 2019 04:54 PM2019-07-23T16:54:25+5:302019-07-23T16:56:58+5:30
आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशाच्या दुःखातून भारतीय चाहत्यांना हिमा दासनं बाहेर काढलं. मागील 20 दिवसांत हिमानं तब्बल पाच सुवर्णपदकांची कमाई करून सुवर्णपंचमी साजरी केली.
मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशाच्या दुःखातून भारतीय चाहत्यांना हिमा दासनं बाहेर काढलं. मागील 20 दिवसांत हिमानं तब्बल पाच सुवर्णपदकांची कमाई करून सुवर्णपंचमी साजरी केली. तिच्या या यशानं पुन्हा एकदा मैदानी खेळाकडची ओढ वाढू लागली आहे. भारताला 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या हिमानं मागील दोन वर्षांत फिनिक्स भरारीनं अनेकांना जगण्याचं, लढण्याचं बळ दिलं. युरोपातील विविध स्पर्धांमध्ये तिनं गाजवलेलं वर्चस्व हे प्रेरणादायी आहे. त्यामुळे हिमाकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. आशियाई आणि युरोपातील या स्पर्धांमध्ये सुवर्णभरारी घेतल्यानंतर हिमाकडून आता जागतिक आणि ऑलिम्पिक पदकाचीही अपेक्षा होत आहे. तिची सध्याची कामगिरी आणि जिंकण्याची भूक पाहता, क्रीडाप्रेमींच हेही स्वप्न ती पूर्ण करेल, असा विश्वास आहे. पण, हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणे किती कठीण आहे, याचे भानही राखायला हवं.
हिमानं पोजनान अॅथलेटिक्स ग्रां. प्री. स्पर्धेत ( 2 जुलै ) 23.65 सेकंद, कुटनो अॅथलेटिक्स मीट स्पर्धेत ( 7 जुलै) 23.97 सेकंद, झेक प्रजासत्ताक येथे क्लांदो अॅथलेटिक्स ( 13 जुलै ) स्पर्धेत 23.43 सेकंद आणि झेक प्रजासत्ताक येथीलच टबोर अॅथलेटिक्स मीट ( 18 जुलै) मध्ये 23.25 सेकंदांसह 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. यापैकी एकाही स्पर्धेत हिमाला तिच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीच्या म्हणजेच 23.10 सेकंदाच्या वेळेच्या आसपासही जाता आले नाही. झेक प्रजासत्ताक येथील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. (20 जुलै ) येथे 400 मीटर शर्यतीत 52.09 सेकंदांसह सुवर्णपदक जिंकले. 400 मीटर शर्यतीतही तिची सर्वोत्तम कामगिरी ही 50.79 सेकंद ( 2018च्या आशियाई स्पर्धेत तिनं ही वेळ नोंदवली होती. तेथे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.) आहे. त्यामुळे झेक प्रजासत्ताक येथील वेळ आणि सर्वोत्तम वेळ यात किती तफावत आहे हे दिसून येईलच.
हिमाचे पुढील लक्ष्य हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे. ती म्हणाली,''या पाच सुवर्णपदकांनी ती हुरळून गेलेली नाही. कारण ही पाच सुवर्णपदके म्हणजे सराव होता, आता मला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकायची आहे.'' जागतिक स्पर्धेची पात्रता निश्चित करण्यासाठी हिमाला 200 मीटर शर्यतीत 23.02 सेकंद आणि 400 मीटर शर्यतीत 51.80 सेकंदाची पात्रता वेळ नोंदवावी लागणार आहे. 7 सप्टेंबर 2018 ते 6 सप्टेंबर 2019 या कालावधीत होणाऱ्या स्पर्धांमध्ये ही वेळ नोंदवून जागतिक स्पर्धेच तिकीट निश्चित करता येणार आहे आणि हिमाकडे आता महिन्याभराचा कालावधी आहे.
IAAF Releases 2019 World Championships Standards
Athletics at the 2020 Summer Olympics – Qualification
शिवाय ऑलिम्पिकसाठीचीही पात्रता वेळ ही 200 मीटरसाठी 22.80 सेकंद, तर 400 मीटरसाठी 51.35 सेकंद अशी आहे. 26 जून 2020 पर्यंत ऑलिम्पिक पात्रता निश्चित करण्याची अखेरची वेळ आहे. त्यामुळे हिमाला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. हिमाची सध्याची कामगिरी ही कौतुकास्पद आहेच, पण ती ऑलिम्पिक आणि जागतिक दर्जाच्या स्पर्धांमध्ये पदक पटकावून देण्यासाठी पुरेशी नाही. तिने सध्याच्या घडीला जिंकलेली सुवर्णपदकाचे महत्त्व कमी करायचे नाही, परंतु ऑलिम्पिकसाठी तिला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तिच्याकडून अपेक्षा ठेवा, पण त्याचे दडपण तिच्यावर लादू नका.