'सुवर्णकन्या' हिमानं गावात केलेला पराक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'जिंकलंस पोरी!'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 02:10 PM2018-07-14T14:10:22+5:302018-07-14T14:20:20+5:30
अॅथलेटिक्समध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या हिमाने आपल्या गावासाठीही अशीच एक दमदार कामगिरी केली
नवी दिल्ली - जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचणारी हिमा दास देशातील तरुणाईची रोल मॉडल बनली आहे. अॅथलेटिक्समध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या हिमाने आपल्या गावासाठीही अशीच एक दमदार कामगिरी केली आहे. आसामच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या हिमाने इतिहास रचण्याआधी दारूबंदीसाठी स्वत: पुढाकार घेतला होता. तसेच गावात दारूबंदी व्हावी म्हणून तिने गावातील दारूची दुकाने तोडून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
हिमाने जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हिमा ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. अंतिम फेरीत हिमाने 400 मी. अंतर 51.46 सेकंदांमध्ये पार करत अव्वल क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. हिमाने आपल्या गावासाठीही समाजसेवा केली आहे. तसेच गावातील वाईट प्रथांविरोधात आवाज उठवून या आधीच सामाजिक जबाबदारीचं भान दाखवून दिलं आहे.
हिमाच्या शेजाऱ्यांनी तिच्या दमदार कामगिरीचं कौतुक केलं आहे. 'चुकीच्या गोष्टींविरोधात बोलण्यास ती जराही घाबरत नाही. ती काहीही करू शकते. ती आमची रोल मॉडल आहे. आम्ही तिला 'ढिंग एक्सप्रेस' म्हणतो' असं तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं. गावात अनेक दारूची दुकानं होती. मात्र गावकऱ्यांनी व्यसनापासून दूर राहावं म्हणून तिने दारूचे अड्डेच जमीनदोस्त केल्याचंही गावकऱ्यांनी सांगितलं. हिमाचे वडील रंजीत दास यांना तिच्या धाडसाचं नेहमीच कौतुक वाटायचं. 'हिमा पहाडा सारखी आहे. तिला ट्रेनने बाहेर पाठवताना मला खूप भीती वाटायची. पण तिच आम्हाला धीर द्यायची. तिच्या या धाडसामुळे आम्हाला प्रेरणा मिळायची', असंही तिच्या वडिलांनी सांगितलं.