Video: अखेरच्या 10 सेकंदांमध्ये हिमा दासची मुसंडी; थरारक शर्यतीत 'अशी' मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 09:54 AM2018-07-13T09:54:06+5:302018-07-13T09:55:56+5:30
निर्णायक क्षणी वेग वाढवत पाचव्या क्रमांकावरुन थेट पहिल्या क्रमांकावर
नवी दिल्ली : जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील वयोगटातील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करत हिमा दासनं इतिहास रचला आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हिमा ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. मात्र या सुवर्णपदाकासाठी तिला कठोर संघर्ष करावा लागला. शर्यतीला सुरुवात होताच हिमा मागे पडली होती. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये तिनं निकराची झुंज दिली आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं.
चौथ्या लेनमधून धावणारी हिमा दास शेवटच्या वळणानंतर रोमानियाच्या आंद्रिया मिकलोसच्या मागे होती. मात्र यानंतरच्या काही क्षणांमध्ये हिमा दासनं वेग वाढवला. अखेरच्या काही क्षणांमध्ये हिमाचा वेग इतका जास्त होता की, तिनं पाचव्या क्रमांकावरुन थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. 18 वर्षांच्या हिमानं 51.46 सेकंदात शर्यत पूर्ण केली. रोमानियाच्या आंद्रिया मिकलोसनं या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं. तिनं 52.07 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर अमेरिकेची टेलर मेनसन (52.28 सेकंद) तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
Hima Das!!!!!
— Nikhil Naz (@NikhilNaz) July 12, 2018
Here's India's first gold at a global track event.#IAAFTampere2018pic.twitter.com/9KWqMcmKZY
हिमा शर्यतीतील निम्म्यापेक्षा अधिक वेळ 4 स्पर्धकांच्या मागे होती. मात्र जसजशी अंतिम रेषा जवळ येऊ लागली, तसातसा हिमानं वेग वाढवत नेला. शर्यतीच्या अंतिम टप्प्यात तिनं सर्व प्रतिस्पर्धी खेळाडूंना मागे टाकलं. हिमानं शेवटच्या 100 मीटरमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली. यामुळेच तिला सुवर्ण पदक जिंकण्यात यश आलं. मात्र स्वत:चा 51.13 सेकंदांचा विक्रम मोडण्यात ती अपयशी ठरली.