हिमाचल सरकारला नको भारत-पाक लढत
By admin | Published: March 2, 2016 02:55 AM2016-03-02T02:55:34+5:302016-03-02T02:55:34+5:30
भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान बहुप्रतीक्षित विश्व टी-२० लढतीबाबत अनिश्चितता कायम आहे. हिमाचल प्रदेश सरकारने या लढतीसाठी सुरक्षा प्रदान करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान बहुप्रतीक्षित विश्व टी-२० लढतीबाबत अनिश्चितता कायम आहे. हिमाचल प्रदेश सरकारने या लढतीसाठी सुरक्षा प्रदान करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे बीसीसीआय अडचणीत असून, बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी राज्यात ‘राजकारण’ व्हायला नको, असे म्हटले आहे.
पूर्वघोषित कार्यक्रमानुसार
भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान ही लढत १९ मार्च रोजी धर्मशाला
येथे खेळली जाणार आहे; पण त्याबाबत आता साशंकता आहे. कारण, हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी गृह मंत्रालयाला
पत्र लिहिले असून, त्यात राज्य
सरकार या लढतीसाठी सुरक्षाव्यवस्था प्रदान करू शकत नाही, असे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर कडवी प्रतिक्रिया देताना लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे खासदार ठाकूर म्हणाले, की राज्याला महिनाभरपूर्वी कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती, त्या वेळी राज्य सरकारने अशी कुठली सबब पुढे केली नव्हती.
ठाकूर पुढे म्हणाले, ‘‘आम्ही सुरक्षा प्रदान करू शकत नाही, असे वक्तव्य करू भारतात-पाक संघाच्या सुरक्षेला धोका असल्याचा पाकिस्तानच्या दाव्याला बळकटी मिळेल. हा भारताच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असून, तुम्ही त्यावरून राजकारण करीत आहात.’’
दोन प्रस्तावित सामने रद्द करा किंवा स्थळ बदला, असे हिमाचल प्रदेश काँग्रेसने सोमवारी बीसीसीआयला कळविले होते.
काँग्रेस पक्षाने दावा केला, की कांगडामध्ये मोठ्या संख्येने सैनिक राहतात. त्यात कॅप्टन विक्रम बत्रा व कॅप्टन सौरभ कालिया यांच्यासारख्या कारगिल युद्धातील हिरोंचा समावेश आहे. त्यात पाकिस्तान संघाचे यजमानपद भूषविले, तर शहिदांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे.
विश्वकप स्पर्धेच्या आयोजन स्थळांचा निर्णय वर्षभरापूर्वी करण्यात आला होता. सामन्यांचे यजमानपद ६ महिन्यांपूर्वी बहाल करण्यात आले. जगभरातील चाहत्यांनी त्यासाठी बुकिंग केले. अखेरच्या क्षणी अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार राजकारण करीत आहे. आसाममध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान पाकिस्तानच्या शेकडो खेळाडूंना सुरक्षा प्रदान करण्यात आली; मग हिमाचल सरकारला सुरक्षा प्रदान करण्यात काय अडचण आहे?- अनुराग ठाकूर
शहिदांचा आदर,
सामना नको : वीरभद्र सिंह
नवी दिल्ली : आमच्या राज्यात अनेक जवान पाकविरोधात सीमेवर लढत असताना शहीद होत आहेत. त्यांच्या हौतात्म्याचा आम्ही सन्मान करतो. इतर कोणत्याही सामन्याला आमचा विरोध नाही, असे रोखठोक पत्र हिमालच प्रदेशाचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी केंद्रीय गृह खात्याला दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाला येथील स्टेडियमच्या मैदानावर टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील १९ मार्च रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान लढत होणार आहे. या लढतीला आता राजकीय वळण मिळत असल्यामुळे लढतीवर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. या पत्रात असे नमूद केले आहे, की भारत-पाक सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे पाकविरुद्धचा हा सामना येथे खेळवू नये, असे ठाम मत मुख्यमंत्र्यांनी मांडले आहे. जनतेच्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
>. पाक संघाची सुरक्षा भारताची जबाबदारी : शहरयार
लाहोर : आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध १९ मार्च रोजी धर्मशाला येथे खेळल्या जाणाऱ्या लढतीबाबत विरोधी सूर उमटत असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी स्पर्धेत पाकिस्तान संघाच्या सुरक्षेची जबाबदारी भारत सरकारची असल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यासाठी भारत सरकारने कडक पावले उचलायला पाहिजेत, असेही शहरयार यांनी म्हटले आहे.