हिमांता बिस्वा शर्मा बॅडमिंटन महासंघाचे अंतरिम अध्यक्ष
By admin | Published: April 24, 2017 12:53 AM2017-04-24T00:53:26+5:302017-04-24T00:53:26+5:30
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आसाम बॅडमिंटन संघाचे अध्यक्ष हिमांता बिस्वा शर्मा यांची रविवारी येथे झालेल्या भारतीय
लखनौ : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आसाम बॅडमिंटन संघाचे अध्यक्ष हिमांता बिस्वा शर्मा यांची रविवारी येथे झालेल्या भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत अंतरिम अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
महासंघाचे सरचिटणीस आणि अधिकृत प्रवक्ता अनुप नारंग यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, की हिमांता बिस्वा शर्मा यांना २०१८ मध्ये होणाऱ्या निवडणुकीपर्यंत अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अध्यक्ष अखिलेश दास यांचे हृदयविकाराने निधन झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
महासंघाच्या घटनेनुसार कार्यकारी परिषदेच्या सदस्यालाच पदाधिकारी होता येणार असल्याने शर्मा यांना पहिल्यांदा विशेष निमंत्रित म्हणून कार्यकारी परिषदेत सहभागी करून घेण्यात आले; त्यानंतर त्यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रक्रियेनंतर ते अंतरिम अध्यक्ष होण्यास पात्र ठरले. शर्मा २० जून २०१८ पर्यंत पदभार सांभाळतील. त्यानंतर निवडणूक होणार आहे. आसामच्या जालुकबाडी क्षेत्राचे काँग्रेस आमदार राहिलेले शर्मा आॅगस्ट २०१५ मध्ये भाजपामध्ये सहभागी झाले. सध्या ते आसामचे आरोग्य आणि शिक्षणमंत्री आहेत. अखिलेश दास गुप्ता यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेश बॅडमिंटन संघाचे अध्यक्ष बनलेले त्यांचे पुत्र विराज सागर दास यांनाही संचालन संस्थेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.(वृत्तसंस्था)