"हिंद मेरे जिंद", सचिनचं आयुष्य उलगडणारं गाणं रिलीज
By Admin | Published: April 26, 2017 08:36 AM2017-04-26T08:36:55+5:302017-04-26T08:39:25+5:30
ए आर रहमान यांनी हे गाणं गायलं असून ट्रेलरप्रमाणे या गाण्यातही सचिनचा बालपणापासून ते सर्वोत्कृष्ट क्रिकेटरपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - क्रिकेटचा देव मानल्या जाणा-या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या आयुष्यावरील आधारित "सचिन अ बिलियन ड्रीम" चित्रपटाबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता वाढू लागली आहे. काही दिवसांपुर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. नुकतंच चित्रपटातील एक गाणंही रिलीज करण्यात आलं आहे. ए आर रहमान यांनी हे गाणं गायलं असून ट्रेलरप्रमाणे या गाण्यातही सचिनचा बालपणापासून ते सर्वोत्कृष्ट क्रिकेटरपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. "हिंद मेरे जिंद" असे या गाण्याचे बोल असून क्रिकेटचं वेड गाण्यातून दिसत आहे.
ट्रेलरमधील सचिनची काही वाक्यं अक्षरश: मनाचा ठाव घेणारी आहेत. क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी मंदिरात जाण्यासारखं होतं. असं म्हणत सचिननं ट्रेलरमध्ये आपली क्रिकेटविषयी असणारी भावना व्यक्त केली आहे. या सिनेमात खुद्द सचिन तेंडुलकरनं भूमिका साकारली आहे. हा सिनेमा वास्तवावर बेतलेला असल्यानं याचा ट्रेलरही तसाच करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांची काही जुनी दृश्यही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.
चित्रपटापूर्वी सचिन "प्लेइंग इट माय वे" या आत्मचरित्राच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचला होता. त्याच्या आयुष्यातील अगदी महत्त्वाच्या गोष्टी पुस्तकाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर देखील चित्रपटाबद्दल तमाम भारतीयांमध्ये उत्सुकता दिसून येते. नुकतेच सचिनने 100 एमबी हे अॅप लाँच केले आहे. या अॅपच्या माध्यामातून सचिन आपल्या चाहत्याशी कनेक्ट राहत आहे.
जेम्स अर्सकाईन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित "सचिन अ बिलियन ड्रीम" या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून हा चित्रपट 26 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता मयुरेश पेम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा भाऊ नितीन तेंडुलकरची भूमिका साकारत आहे.