टीम इंडियासाठी हिंदी बोलणारा कोच हवा - बीसीसीआय
By admin | Published: June 1, 2016 11:13 PM2016-06-01T23:13:23+5:302016-06-01T23:21:28+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी जाहीरात काढली आहे. यामध्ये प्रशिक्षकाला हिंदी भाषा बोलता येणे गरजेचे असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी जाहीरात काढली आहे. यामध्ये प्रशिक्षकाला हिंदी भाषा बोलता येणे गरजेचे असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
यासंदर्भात बीसीसीआयने बुधवारी संध्याकाळी जाहीरात आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. विशेष म्हणजे यावेळी बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज करताना नऊ प्रमुख अटी देखील टाकल्या आहेत. त्यातील प्रमुख अट अशी आहे की, अर्जदाराने आयसीसी सदस्य राष्ट्रीय संघ, प्रथम श्रेणी क्रिकेट संघ किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही संघाचे यशस्वी प्रशिक्षकपद भूषविले असले पाहिजे. तसेच, इंग्रजी भाषेसह हिंदी आणि इतर भाषा बोलता येणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यासाठी येत्या 10 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन बीसीसीआयने केले आहे.
टीम इंडियाचे मार्गदर्शन रवि शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा करार मार्च महिन्यात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला. दरम्यान, बांगर यांना आगामी झिम्बाब्वे दौ-यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले आहे.