सुवर्णपदक जिंकत हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; मिळाला ऑलिम्पिक प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 05:07 AM2023-10-07T05:07:23+5:302023-10-07T05:07:48+5:30
आशियाई क्रीडा : भारतीय आज झळकावणार पहिले वहिले ‘शतक’ ; कबड्डीत भारताने पाकिस्तानला लोळवले
हांगझाउ (चीन) : यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीयांनी विक्रमी कामगिरी केली. भारताच्या पुरुष हॉकी संघाने गतविजेत्या जपानचा ५-१ असा धुव्वा उडवत दिमाखात सुवर्णपदक पटकावले. त्याचसोबत भारतीय पुरुषांनी या वर्चस्वासह पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळवला.
दखल घेण्याची बाब म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारतीय संघाने ९५ पदके जिंकण्याचा पराक्रम केला असून शनिवारी भारतीय संघ पदकांचे शतकही झळकावणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
भारताने शुक्रवारी पुरुष हॉकीतील सुवर्णपदकासह एकूण ९ पदकांची कमाई केली. ब्रीजमध्ये पुरुष संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिरंदाजी पुरुष रिकर्व्ह संघाने रौप्यपदकावर समाधान मानले, तर महिलांनी कांस्यपदकाची कमाई केली.
कुस्तीमध्ये अमन सेहरावत, सोनम मलिक, किरण यांनी आपापल्या गटात कांस्य जिंकले. बजरंग पुनिया याला पदकाविना परतावे लागल्याचा धक्का भारताला बसला. चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी बॅडमिंटनमध्ये यांनी पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली.
शनिवार ठरणार ऐतिहासिक
भारतीय संघाने आतापर्यंत २२ सुवर्ण, ३४ रौप्य आणि ३९ कांस्य अशी एकूण ९५ पदके पटकावली आहेत. यंदाच्या सत्रात भारतीय संघाने ‘अब की बार, मेडल टॅली सौ पार’ अशा मोहिमेअंतर्गत आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रवेश केला होता. आतापर्यंतच्या स्पर्धा इतिहासात भारताला कधीही शंभर पदके जिंकता आली नव्हती, परंतु आता भारत या शतकाच्या उंबरठ्यावर असून शनिवारी भारताचे ऐतिहासिक ‘शतक’ झळकेल. शनिवारी भारताला एकूण ७ पदके निश्चित मिळतील.
अमरावतीचा शेळके चमकला
पुरुष तिरंदाजी रिकर्व्ह संघाला अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यामध्ये अमरावतीचा तिरंदाज तुषार शेळके चमकला. त्याने पहिल्या फेरीपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत भारताला अंतिम फेरीत गाठून देण्यात मोलाची कामगिरी केली. त्याच्यासह अतानू दास आणि धिरज बोम्मादेवरा यांचा समावेश होता.
आज होणारी पदक कमाई
तिरंदाजी (३ पदके), क्रिकेट (१ पदक),
कबड्डी (२ पदके), बॅडमिंटन (१ पदक)
पाकिस्तानचा उडवला धुव्वा
भारतीय पुरुष कबड्डी संघाने आपली ताकद दाखवून देताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६१-१४ असा फडशा पाडत दिमाखात अंतिम फेरी गाठली. महिलांमध्ये भारताने सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठताना नेपाळचा ६१-१७ असा धुव्वा उडवला.