ऐतिहासिक मालिका विजय

By Admin | Published: January 30, 2016 02:16 AM2016-01-30T02:16:49+5:302016-01-30T02:16:49+5:30

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलियाचा दुसऱ्या टी-२० लढतीत शुक्रवारी २७ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या

Historical Series Victory | ऐतिहासिक मालिका विजय

ऐतिहासिक मालिका विजय

googlenewsNext

मेलबर्न : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलियाचा दुसऱ्या टी-२० लढतीत शुक्रवारी २७ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत ऐतिहासिक विजयी आघाडी संपादन केली. द्विपक्षीय मालिकेत भारताने आॅस्ट्रेलियावर साजरा केलेला हा पहिलाच मालिका विजय ठरला.
वन डे मालिकेत सुरुवातीचे चार सामने गमविणाऱ्या भारतीय संघाने अखेरचा सामना जिंकल्यानंतर सलग दोन टी-२० सामने देखील जिंकले. भारताने ३ बाद १८४ धावा नोंदविल्यानंतर आॅस्ट्रेलियाला २० षटकांत ८ बाद १५७ धावांत रोखले. कर्णधार अ‍ॅरोन फिंच(७४)याचा अपवाद वगळता यजमान संघाचा कुठलाही फलंदाज स्थिरावू शकला नाही. त्याआधी फॉर्ममध्ये असलेले रोहित आणि विराट यांनी आक्रमक खेळाची झलक दाखविली. रोहितने ४७ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह ६० आणि विराटने ३३ चेंडूत सात चौकार व एका षटकारासह नाबाद ५९ धावा ठोकल्या. एमसीजीवर कुठल्याही संघाने नोंदविलेली ही सर्वोच्च खेळी ठरली. धवनने ३२ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. पहिल्या तीन षटकांत केवळ १२ धावा निघाल्या होत्या. पण पुढच्या तीन षटकांत ५० धावा झाल्या. ११ व्या षटकांपर्यंत भारताने १०० धावांची नोंद केली. धवन बाद झाल्यानंतर रोहितने टी-२० तील आठवे अर्धशतक पूर्ण केले. विराटने त्याच्यासोबत ४६ धावांची भागीदारी केली. १६ व्या षटकांत रोहित दुसरी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. धोनी १४ धावा काढून नाबाद राहिला. दरम्यान कोहलीने स्वत:चे ११ वे टी-२० अर्धशतक नोंदविले. मालिकेतील हे सलग दुसरे अर्धशतक होते. अखेरच्या चार षटकांत भारताने ४१ धावा खेचल्या.
आॅस्ट्रेलियाची सुरुवातदेखील झकास झाली. फिंच-मार्श यांनी ९.३ षटकांत ९४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र कुठलीही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. अश्विनने मार्शला (२३) झेलबाद केले. ख्रिस लिन (२) याला पंड्याने बाद केले. आॅस्ट्रेलियाला सर्वांत मोठा धक्का युवराजने दिला. त्याने १२व्या षटकांत ग्लेन मॅक्सवेल (१) याला चकविताच धोनीने यष्टिचित केले.
युवीला दोन्ही सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही पण त्याने आज दोन षटकांत सात धावा देत महत्त्वाचा गडी बाद केला. शेन वॉटसन १५ धावा काढून जडेजाच्या चेंडूवर बाद झाला. फिंच (७४) पुढच्या षटकांत धावबाद झाला. तळाच्या फलंदाजांना जसप्रित बुमराह याने तंबूची वाट दाखविली. बुमराह आुिण जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तिसरा आणि अखेरचा सामना ३१ जानेवारी रोजी सिडनीत खेळला जाईल. (वृत्तसंस्था)

चांगल्या सुरुवातीनंतरही पराभव पदरी पडणे निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने नोंदविली. वॉटसन म्हणाला,‘आम्ही विजयी मार्गावर होतो. पण भारतीय फिरकी आमच्या पराभवास कारणीभूत ठरला. खेळपट्टीवर चेंडू वळण घेत नसतानाही भारतीयांचा फिरकी मारा अप्रतिम होता.


आॅस्ट्रेलियातील खेळपट्ट्या मला आवडतात. येथे वेगवान चेंडू उसळी घेऊन येतात. मी हे आव्हान स्वीकारण्यास नेहमी सज्ज असतो. संघाच्या विजयात मोलाचे योगदान देऊ शकलो याचा आनंद आहे. आमच्या फिरकी गोलंदाजांमुळेच मालिका विजय शक्य होऊ शकला.
- विराट कोहली

धावफलक
भारत : रोहित शर्मा धावचित (मॅक्सवेल/वेड) ६०, शिखर धवन झे. लियॉन गो. मॅक्सवेल ४२, विराट कोहली नाबाद ५९, महेंद्रसिंग धोनी झे. वॉटसन गो. टाये १४, सुरेश रैना नाबाद ०. अवांतर : ९, एकूण २० षटकांत ३ बाद १८४. गोलंदाजी : शेन वॉटसन ३-०-१७-०, जॉन हेस्टिंग्स ३-०-३५-०, स्कॉट बोलॅन्ड ४-०-३०-०, जेम्स फॉल्कनर ३-०-३५-०, अँड्र्यू टाये ४-०-२८-१, नाथन लियॉन १-०-१५-०, ग्लेन मॅक्सवेल २-०-१७-१.

आॅस्ट्रेलिया : अ‍ॅरोन फिंच धावचित (जडेजा/धोनी) ७४, शॉन मार्श झे. पांड्या गो. अश्विन २३, क्रिस लिन झे. धोनी गो. पांड्या २, ग्लेन मॅक्सवेल यष्टीचित धोनी गो. युवराज सिंग १, शेन वॉटसन झे. आणि गो. जडेजा १५, मॅथ्यू वेड नाबाद १६, जेम्स् फॉल्कनर यष्टीचित धोनी गो. जडेजा १०, जॉन हेस्टिंग्स त्रि. गो. बुमराह ४, अँड्र्यू टाये त्रि. गो. बुमराह ४. अवांतर : ८, एकूण २० षटकांत ८ बाद १५७. गोलंदाजी : आशिष नेहरा ४-०-३४-०, जयप्रीत बुमराह ४-०-३७-२, रवींद्र जडेजा ४-०-३२-२, रविचंद्रन अश्विन ४-०-२७-१, हार्दिक पांड्या २-०-१७-१, युवराज सिंग २-०-७-१.

Web Title: Historical Series Victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.