श्रीलंकेचा ऐतिहासिक विजय

By admin | Published: July 31, 2016 05:40 AM2016-07-31T05:40:37+5:302016-07-31T05:40:37+5:30

लक्षण संदाकन याने तीन बळी घेताच श्रीलंकेने आॅस्ट्रेलियावरील १७ वर्षांचा कसोटी विजयाचा दुष्काळ संपविला.

Historical triumph of Sri Lanka | श्रीलंकेचा ऐतिहासिक विजय

श्रीलंकेचा ऐतिहासिक विजय

Next


पल्लिकल : फिरकीपटू रंगाना हेराथने अर्धा संघ गारद केल्यानंतर पदार्पण करणारा लक्षण संदाकन याने तीन बळी घेताच श्रीलंकेने आॅस्ट्रेलियावरील १७ वर्षांचा कसोटी विजयाचा दुष्काळ संपविला. शनिवारी पहिल्या कसोटीच्या
पाचव्या आणि अखेरच्या दिवशी यजमान संघाने पाहुण्यांवर १०६ धावांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
लंकेसाठी हा केवळ कसोटी विजय नव्हता. तब्बल १७ वर्षांनंतर त्यांना हा विजय साकार करता आला. याआधी सप्टेंबर १९९९ मध्ये कॅण्डी कसोटीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध लंकेने विजय मिळविला होता. या विजयासह लंकेने आॅस्ट्रेलियावर केवळ दुसऱ्या विजयाची नोंद केली. दहा सामने लंकेने गमाविले, तर दोन सामने अनिर्णीत राहिले.
पावसाच्या व्यत्ययात लंकेने आॅस्ट्रेलियापुढे २६६ धावांचे विजयी लक्ष्य ठेवले होते. यजमान संघ दुसऱ्या डावात ८८.३ षटकांत १६१ धावांत गारद झाला. लंकेच्या माऱ्यापुढे आॅस्ट्रेलियाचे फलंदाज नांगी टाकताना दिसले. कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने ५५ धावांची खेळी करीत एकाकी झुंज दिली.
लंकेच्या खेळाडूंनी सर्व आघाड्यांवर सरस कामगिरी बजावली. आॅस्ट्रेलियाला गुंडाळण्याचे काम ३८ वर्षांचा अनुभवी रंगाना हेराथ याने केले. त्याने ३३.३ षटकांत ५४ धावांत पाच गडी टिपले. उपाहारानंतर त्याने स्टोव्ह ओकिफे याची दांडी गुल करीत सामना संपविला. या विजयासह लंकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी संपादन केली आहे.
आॅस्ट्रेलियाचा भारतीय उपखंडात हा सलग सातवा पराभव होता. २०१३ मध्ये आॅस्ट्रेलियाने भारतात चार कसोटी सामने गमाविले होते. त्यानंतर आॅस्ट्रेलिया संघ यूएईत २०१४-१५ मध्ये पाकिस्तानकडून ०-२ ने पराभूत झाला. या संघाने २०११ मध्ये गाले येथे लंकेविरुद्ध शेवटचा कसोटी विजय नोंदविला होता.
अखेरच्या दिवशी ३ बाद ८३ वरून सुरुवात करणाऱ्या पाहुण्या संघाने अ‍ॅडम व्होक्सचा लवकरच बळी दिला. मिशेल मार्शने स्मिथला साथ देत ३७ चेंडूंत तीन चौकारांसह २५ धावा केल्या. हेराथच्या चेंडूवर तो पायचित झाला.
स्मिथलादेखील त्यानेच पायचित करीत तंबूची वाट दाखविली. यष्टिरक्षक पीटर नेव्हल हा ९, मिशेल स्टार्क शून्य, नाथन लियोन ८ आणि ओकिफे ४ धावा काढून परतले. पहिल्या डावात आॅस्ट्रेलियाचे ४९ धावांत चार गडी बाद करणाऱ्या हेराथने सामन्यात एकूण नऊ गडी बाद केले.
लंकेच्या दुसऱ्या डावात करिअरमधील पहिले शतक झळकाविणारा कुशल मेंडिस (१७६ धावा) याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. उभय संघांत दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून गाले येथे सुरू होईल. (वृत्तसंस्था)
>खराब फलंदाजीमुळे पराभव : स्मिथ
आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने पराभवाचे खापर ढिसाळ फलंदाजीवर फोडले. तो म्हणाला, फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावले नाहीत हा आमचा दोष आहे. कुशाल मेंडिस याने देखील १७६ धावा ठोकून सामना आमच्याकडून हिसकून घेतला.’
विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला : मॅथ्यूज
आॅस्ट्रेलियावर १७ वर्षानंतर ऐतिहासिक कसोटी विजय मिळाल्याचे श्रेय सांघिक कामगिरीला असल्याची प्रतिक्रिया श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने शनिवारी व्यक्त केली. विजयानंतर आंनद व्यक्त करीत मॅथ्यूज म्हणाला,‘ गेले काही महिने लंका क्रिकेटसाठी खराब ठरले. या विजयामुळे कमालीचे चैतन्य आले आहे. विजयाचे वर्णन करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत. आम्ही सांघिक सराव केला आणि सामन्यात सांघिक कामगिरी बजावली.

Web Title: Historical triumph of Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.