वेल्सचा ऐतिहासिक विजय

By admin | Published: July 3, 2016 04:23 AM2016-07-03T04:23:55+5:302016-07-03T04:23:55+5:30

युरो २०१६ चषक स्पर्धेतील डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या गेराथ बॅलेच्या वेल्स संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना बेल्जियमला ३-१ ने हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Historical triumph of Wales | वेल्सचा ऐतिहासिक विजय

वेल्सचा ऐतिहासिक विजय

Next

लिली : युरो २०१६ चषक स्पर्धेतील डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या गेराथ बॅलेच्या वेल्स संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना बेल्जियमला ३-१ ने हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तेथे आता त्यांची लढत ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालशी होणार आहे. मोठ्या स्पर्धेच्या सेमीफायनलपर्यंत धडक मारण्याची वेल्सची ही पहिलीच वेळ आहे.
युरो चषकात आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वेल्स संघाने आक्रमक खेळ करीत बेल्जियमला उपांत्यपूर्व फेरीतच गारद केले. वेल्सकडून कर्णधार अ‍ॅश्ले विलियम्स, हॉल रॉबसन कानू आणि सॅम वोक्स यांनी गोल नोंदवले. बेल्जियमकडून नॅनगोलानने एकमेव गोल केला. शुक्रवारी रात्री झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी प्रारंभापासूनच आक्रमक खेळ केला. बेल्जियमला या सामन्यात विजेतेपदाचे दावेदार मानले जात असल्याने संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये बेल्जियमच्या चाहत्यांनी प्रचंड संख्येने हजेरी लावली होती. या पाठिंब्याच्या जोरावर बेल्जियम संघानेही आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत सामन्यात पहिल्या गोलची नोंद केली. १३ व्या मिनिटालाच मिळालेल्या पासवर नॅनगौलनने कोणतीही चूक न करता गोल केला. पिछाडीवर पडलेल्या वेल्सने मग आपल्याही खेळाचा वेग वाढवला. त्यांच्या या प्रयत्नाला ३१ व्या मिनिटाला यश आले. कर्णधार अ‍ॅश्ले विलियम्सचा हेडर बेल्जियमच्या गोलकिपरला चकवून गोलपोस्टच्या कोपऱ्यात विसावला. मध्यंतराला दोन्ही संघात १-१ असे बरोबरीत होते.
उत्तरार्धात, ५५ व्या मिनिटाला रॉबसनने एका सुरेख गोलची नोंद करून वेल्सला आघाडी मिळवून दिली. बॉक्समधील बचावफळीतील चार खेळाडूंना चकवून उत्कृष्ट पदलालित्य दाखवत केलेला हा गोल चाहत्यांच्या अनेक दिवस लक्षात राहील, असाच लाजवाब होता. सामना शेवटच्या टप्प्यात आला असता बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या सॅम वोक्सने ८५ व्या मिनिटाला गोल नोंदवून वेल्सचे सेमीफायनलचे तिकीट नक्की केले.
विजयानंतर अनेक खेळाडू मैदानावर जल्लोष करीत होते, तर काही जणांना या ऐतिहासिक क्षणांवर विश्वासच बसत नव्हता.

वेल्सचा संघ १९५८ मध्ये फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. परंतु तेथे त्यांचा ब्राझीलने १-० गोलने पराभव केला होता. विशेष म्हणजे हा विजयी गोल त्या वेळी पेले यांनी केला होता.
सेमीफायनलमध्ये वेल्स आणि पोर्तुगाल हे दोन संघ समोरासमोर येतील. या लढतीचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्तुगालचा रोनाल्डो आणि वेल्सचा गेराथ बॅले हे दोन मातब्बर खेळाडू रिआल माद्रिद या एकाच क्लबकडून खेळतात. त्यामुळे ही लढत रोमांचक होईल.


आपण येथे मौज करण्यासाठी आलेलो नाही, आपले काम करण्यासाठी आलो आहोत. आपण निश्चितच विजयाचे हक्कदार आहोत, असे मी खेळाडूंना सांगितले होते. माझ्या संघातील खेळाडूंनी विजय मिळवून माझे बोलणे खरे करून दाखवले.
-ख्रिस कोलमन, मॅनेजर वेल्स

आमच्या संघाने अनेक चांगल्या संधी गमावल्या. आम्हाला या स्पर्धेत दुखापती आणि निलंबनामुळे चांगल्या खेळाडूंना खेळवता आले नाही. अनुभवी जॉन वेर्टोंघन आणि थॉमस वर्मालेन यांच्यासारखे खेळाडू बेंचवर बसून होते. त्याचा फटका आम्हाला बसला.
-मार्क विल्मोटस, मॅनेजर, बेल्जियम.

Web Title: Historical triumph of Wales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.