झारखंडचा ऐतिहासिक विजय

By admin | Published: December 27, 2016 04:03 AM2016-12-27T04:03:02+5:302016-12-27T04:03:02+5:30

फिरकी गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर युवा आक्रमक फलंदाज इशान किशनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर झारखंडने हरियाणाला ५ विकेट्सने नमवले. विशेष म्हणजे यासह झारखंडने

Historical Victory of Jharkhand | झारखंडचा ऐतिहासिक विजय

झारखंडचा ऐतिहासिक विजय

Next

वडोदरा : फिरकी गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर युवा आक्रमक फलंदाज इशान किशनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर झारखंडने हरियाणाला ५ विकेट्सने नमवले. विशेष म्हणजे यासह झारखंडने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
दखल घेण्याची बाब म्हणजे भारताचा एकदिवसीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नजरेखाली झारखंडने ही कामगिरी केली आहे. पहिल्या डावात ८७ धावांची आघाडी घेतलेल्या झारखंडने हरियाणाचा दुसरा डाव २६२ धावांत गुंडाळला. यामुळे झारखंडला १७६ धावांचे लक्ष्य मिळाले. झारखंडने चौथ्याच दिवशी पाच फलंदाजांच्या मोबदल्यात निर्धारीत धावा काढताना दिमाखदार विजय मिळवला. याआधी २०१२-१३ मध्ये पंजाब आणि २०१५-१६ मध्ये मुंबईविरुद्ध झारखंडचे आव्हान उपांत्यपुर्व फेरीत संपुष्टात आले होते.
युवा यष्टीरक्षक फलंदाज इशानने आक्रमक फटकेबाजी करताना ६१ चेंडूत ९ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी मारताना ८६ धावांचा तडाखा दिला. इशानच्या या खेळीमुळे झारखंडने सहजपणे दिलेले आव्हान गाठले. त्याने आनंद सिंगसह ९५ धावांची दमदार सलामी देत संघाला मजबूत सुरुवात करुन दिली. इशान बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्य २ बाद १३९ अशी झाली होती. यानंतर, पहिल्या डावातील शतकवीर विराट सिंग (२१), इशांक जग्गी (८) आणि सुमित कुमार (१८) देखील बाद झाले. परंतु, तोपर्यंत झारखंडचा विजय अवाक्यात आला होता. हरियाणाकडून युजवेंद्र चहल आणि संजय पहल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तत्पूर्वी, २ बाद १४६ धावांवरुन खेळण्यास सुरुवात केलेल्या हरियाणाने ठराविक अंतराने आपले फलंदाज गमावले. चैतन्य बिष्नोई याने ५२ धावांची झुंजार खेळी केली. तर, तळाच्या फळीतील संजय पहलने २९ आणि हर्षल पटेलने २५ धावा काढल्या. शाहबाज नदीम (४/७८) आणि समर कद्री (३/७५) यांनी हरियाणाला गुंडाळण्यात महत्वाची भूमिका बजावली.

संक्षिप्त धावफलक
हरियाणा (पहिला डाव) : ९५.३ षटकात सर्वबाद २५८ धावा.
झारखंड (पहिला डाव) : १२० षटकात सर्वबाद ३४५ धावा.
हरियाणा (दुसरा डाव) : ९७.१ षटकात सर्वबाद २६२ धावा. (चैतन्य बिष्नोई ५२, शुभम रोहिला ४३, शिवम चौहान ४३; शाहबाज नदीम ४/७८, समर कद्री ३/७५)
झारखंड (दुसरा डाव) : ३०.२ षटकात ५ बाद १७८ धावा (इशान किशन ८६; संजय पहल २/३६, युझवेंद्र चहल २/४३)

Web Title: Historical Victory of Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.