इतिहासाचे आकडे भारताच्या बाजूने
By Admin | Published: February 9, 2017 02:28 AM2017-02-09T02:28:18+5:302017-02-09T02:28:18+5:30
भारतीय संघ आतापर्यंत बांगलादेशविरुद्ध ८ कसोटी सामने आणि पाच कसोटी मालिका खेळला आहे.
बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - गुरुवारचा दिवस क्रिकेटमधील एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. त्याला कारणही तसेच आहे, कसोटी संघाचा दर्जा लाभलेला क्रिकेटमधील दहावा संघ असलेला बांगलादेश आजपासून सुरू होत असलेल्या हैदराबाद कसोटीमधून भारतीय भूमीवरील आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे. क्रिकेटमध्ये अजूनही दुस-या फळीतील संघात गणल्या जाणा-या बांगलादेशने बीसीसीआय आणि जगमोहन दालमियांच्या कृपाप्रसादाने १६ वर्षापूर्वीच कसोटी दर्जा मिळवला होता. पण भारताविरुद्धच्या लढतीनेच कसोटी क्रिकेटमधील वाटचालीची सुरुवात करणा-या बांगलादेशला भारतात कसोटी सामना खेळण्याची संधी मिळायला मात्र १६ वर्षे जावी लागली. मात्र भारतीय संघ बांगलादेशमध्ये जाऊन पाच कसोटी मालिका खेळलाय.
इतिहासाचा मागोवा घेतल्यास कसोटी क्रिकेटमध्ये भारताने बांगलादेशवर नेहमीच हुकूमत राखल्याचे दिसून येते. भारतीय संघ आतापर्यंत बांगलादेशविरुद्ध ८ कसोटी सामने आणि पाच कसोटी मालिका खेळला आहे. त्यापैकी सहा कसोटी आणि चार मालिकांमध्ये भारताने विजय मिळवलाय.
भारत बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी मालिका २००० साली खेळला होता. कसोटी दर्जा मिळाल्यानंतरचा बांगलादेशचा तो पहिलाच सामना होता. १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान ढाक्यातील वंगबंधू नॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या त्या सामन्यात सुनील जोशीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशला ९ गडी राखून मात दिली होती. उल्लेखनीय म्हणजे भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीचा हा कसोटी कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता.
२००४ साली भारतीय संघ दुस-यांदा बांगलादेश दौ-यावर गेला. त्या दौ-यातही गांगुलीकडेच संघाचे नेतृत्व होते. या मालिकेतही भारताने २-० अशा फरकाने विजय मिळवत बांगलादेशवर निर्विवाद वर्चस्व राखले होते. त्यावेळच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी सचिन तेंडुलकरच्या विक्रमी शतकाने गाजली होती. सचिनने त्या सामन्यात द्विशतक फटकावताना सुनील गावसकरांच्या ३४ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. तसेच त्या सामन्यातील नाबाद २४८ ही त्याची सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या ठरली होती. सचिनची विक्रमी खेळी आणि इरफान पठाणच्या ११ बळींच्या जोरावर भारताने तो सामना डावाने जिंकला होता. त्या मालिकेतील दुस-या कसोटीत राहुल द्रविडच्या शतकाच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभी केली होती. पण मोहम्मद अश्रफूलने घणाघाती शतक फटकावत भारतीय संघाच्या तोंडचे पाणी पळवले होते. अशावेळी तेव्हाचा उगवता गोलंदाज इरफान पठाणने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने ती कसोटी जिंकली.
त्यानंतर भारतीय संघ बांगलादेश दौ-यावर गेला तो २००७ साली. त्या दौ-याआधी झालेल्या विश्वचषकात भारताला बांगलादेशकडून धक्कादायकरित्या पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या या बांगलादेश दौ-याकडे क्रिकेट जगताचे विशेष लक्ष लागले होते. त्यावेळी खेळलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिली होती. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीच्या शतकांनी भारताचा पहिला डाव गाजवला होता. पण दुस-या डावात बांगलादेशी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना घाम फोडला होता. दुस-या कसोटीत मात्र भारतीय फलंदाजांनी बांगलादेशची यथेच्छ पिटाई केली. दिनेश कार्तिक, वासिम जाफर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर अशा चार फलंदाजांनी फटकावलेल्या शतकांच्या जोरावर भारतीय संघाने ही कसोटी डावाने जिंकत मालिकेवर १-० ने कब्जा केला.
२०१० च्या दौ-यात मात्र बांगलादेशने भारताला कडवी झुंज दिली होती. त्या दौ-यातील दोन कसोटी सामन्यांत अनुक्रमे वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंग धोनीने संघाचे नेतृत्व केले होते. पैकी पहिल्या कसोटीत सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीरच्या शतकांच्या जोरावर भारताने पहिली कसोटी ११३ धावांनी जिंकली. तर दुस-या कसोटीत पुन्हा एकदा सचिन आणि राहुल द्रविडच्या शतकांच्या जोरावर भारताने बांगलादेशवर दहा गडी राखून मात करत कसोटी मालिका २-० ने खिशात टाकली.
त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी २०१५ साली भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळला. त्यावेळी संघाचे नेतृत्व विराट कोहलीने केले. पण पावसाच्या व्यत्ययामुळे ही एकमेव कसोटी अनिर्णित राहिली. शिखर धवनने केलेली १७३ धावांची खेळी या सामन्याचे वैशिष्ट्य ठरली होती.
आता गेल्या वर्ष सव्वा वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंड अशा एकापेक्षा एक बलाढ्य संघांना गारद करणा-या आणि कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या विराट कोहलीच्या भारतीय संघासमोर घरच्या मैदानावर होत असलेल्या एकमेव कसोटीत बांगलादेशचे आव्हान आहे.
गेल्या १८ सामन्यांपासून अपराजित असलेल्या भारताकडे विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यासारखे फलंदाज आणि आर. अश्विन, रवींद्र जडेजासारखे गोलंदाज आहेत. कुठल्याही संघाला हादरवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे आधीचा इतिहास आणि सध्याची भारतीय संघाची कामगिरी पाहता भारतासाठी बांगलादेशचे आव्हान परतवून लावणे फारसे जड जाणार नाही. मात्र बांगलादेशकडेही शकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, तमीम इक्बाल, तस्किन अहमदसारखे खेळाडू आहेत. तसेच एखाद्या लढतीत अनपेक्षित कामगिरी करण्याची क्षमताही या संघाकडे आहे. त्यामुळे भारतीय संघाला या कसोटीत थोडे सावध राहावे लागेल.