भारताच्या संतोषने घडविला इतिहास
By admin | Published: January 20, 2015 12:16 AM2015-01-20T00:16:04+5:302015-01-20T00:16:04+5:30
डोंगरदऱ्यातील अरुंद वाटांतून मार्ग काढत... वाळवंटी वादळाशी टक्कर देत... भारताच्या चुंचुगुप्पो शिवशंकर संतोषने डकार रॅली पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
मुंबई : डोंगरदऱ्यातील अरुंद वाटांतून मार्ग काढत... वाळवंटी वादळाशी टक्कर देत... भारताच्या चुंचुगुप्पो शिवशंकर संतोषने डकार रॅली पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अर्जेंटिना, चिली आणि बोलिविआ असा ९ हजार किलोमीटरचा आव्हानात्मक प्रवास पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय बाईक रेसरचा बहुमान त्याच्या शिरपेचात रोवला गेला आहे. या स्पर्धेत त्याने ३६वा क्रमांक पटकावला असला तरी त्याची ही कामगिरी इतर भारतीयांसाठी प्रेरणादायीच आहे. स्पॅनिशचा मार्क कोमा याने येथे बाजी मारून पाचवे डकार रॅलीचे जेतेपद नावावर केले, तर पोर्तुगालच्या पाऊलो गोन्साल्विस आणि आॅस्ट्रेलियाच्या टॉबी प्राईस यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.
पहिल्यांदाच या रॅलीत सहभागी होणाऱ्या संतोषने टू व्हीलर प्रकारात ३६वे स्थान पटकावले. रॅलीतील टेरमास दी रिओ हाँडो ते रोसारीओ या प्रवासात संतोषने ३०वे स्थान पटकावले होते. एकूण १३ टप्पे त्याने ६० तास ३९ मिनिटे आणि २० सेकंदांत पूर्ण केले. ३५व्या स्थानावर आलेल्या अर्जेंटिनाच्या जेविएर गोमेज याच्याहून ४० मिनिटांनंतर तो शर्यत पूर्ण करू शकला. २०१२मध्ये ‘रेड दी हिमालया’ स्पर्धा जिंकणाऱ्या संतोषने २०१४मध्ये राजस्थानमध्ये पार पडलेल्या ‘डेझर्ट स्टॉर्म$’ स्पर्धेतही बाजी मारली. संतोष म्हणाला, प्रत्येक दिवस हा अडथळ्यांशी झुंज देणारा होता.
१६८ रायडर्सने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यातील ७९ जणांनाच स्पर्धा पूर्ण करण्यात यश मिळाले. अनेकांनी दुखापती आणि दुर्घटनेमुळे स्पर्धेतून माघार घेतली. यामध्ये २०१४चा उपविजेता जॉर्डी विलाडोम्स आणि जुआन पेड्रेरो यांचाही समावेश होता. जॉन बेरेडा याने १३पैकी तीन टप्पे जिंकण्याचा विक्रम केला, परंतु त्याला अखेर १७व्या स्थानावर समाधान मानावे लागले. लैला सांज हिने ९वे स्थान पटकावून महिला रायडरमध्ये सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. (प्रतिनिधी)
चिलीचा टप्पा खडतर
लहानपणी डकार रॅली टीव्हीवर पाहताना मला विजेत्या स्पर्धकांचे आकर्षण वाटायचे. अशा स्पर्धेत सहभागी होताना पुढे काय होईल हे सुरुवातीलाच सांगू शकत नाही. चिली येथील टप्पा सर्वाधिक खडतर होता. अर्जेंटीना येथील उष्ण वातावरणाने हालत खराब झाली, परंतु या रॅलीचा आनंद मी लुटला. या यशाने भारतीय खेळाडूंसाठी या स्पर्धेचे दरवाजे खुले झाल्याचे संतोष म्हणाला.