को‘होली’ है !

By Admin | Published: March 20, 2016 04:34 AM2016-03-20T04:34:33+5:302016-03-20T04:34:33+5:30

कोणत्याच वर्ल्डकपमध्ये भारताविरोधात न जिंकू शकणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकवर ६ गडी

Is 'hockey'! | को‘होली’ है !

को‘होली’ है !

पाकिस्तानचा धुव्वा : भारताचा सहा गड्यांनी विजय

कोलकाता : कोणत्याच वर्ल्डकपमध्ये भारताविरोधात न जिंकू शकणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकवर ६ गडी राखून विजय मिळविला.
ऐतिहासिक ईडन गार्डनवर दिग्गजांच्या उपस्थितीत सायंकाळी हजारो चाहत्यांच्या साक्षीने रंगलेल्या प्रत्येकी १८ षटकांच्या हायव्होल्टेज लढतीत भारतीय फलंदाजांनी सामना एकतर्फी ठरविला. नाणेफेक जिंकून भारताने क्षेत्ररक्षण घेतले. पाकला १८ षटकांत ५ बाद ११८ धावांत रोखल्यानंतर भारताने १५.५ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात ११९ धावा करीत सामना जिंकला. विराट कोहलीने ३७ चेंडूत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५५ धावा ठोकल्या. कर्णधार धोनी १३ धावांवर नाबाद राहिला.
सुरुवातीला झालेली पडझड युवराज- विराट कोहली यांनी थोपविली. या दोघांनी ७.२ षटकांत चौथ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी करीत संघाला विजयी पथावर आणले. या मैदानावर भारताने पाकचा टी-२० त पराभव केला नव्हता. आज ही परंपरा मोडित निघाली.

अमिताभचे राष्ट्रगीत...
सुरुवातीला महानायक अमिताभ बच्चन यांनी हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने भारताचे तसेच पाकचा गायक शफाकत अमानत याने पाकचे राष्ट्रगीत गायले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विशेष उपस्थिती होती. अमिताभ यांनी आमंत्रणाबद्दल सौरव गांगुलीचे आभार मानून भारत- पाकमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी याबद्दल शुभेच्छाही दिल्या.

दिग्गजांचा गौरव...
क्रिकेटमध्ये योगदान देणाऱ्या आठ माजी दिग्गजांचा बंगाल क्रिकेट संघटनेतर्फे मुख्यमंत्री ममतादीदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, पाकचे इंतिखाब आलम, इम्रान खान, वकार युनूस, वसीम अक्रम यांच्यासह माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा देखील कॅबद्वारे विशेष सन्मान करण्यात आला.

पंतप्रधानांकडून कौतुक...
भारतीय संघाच्या विजयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

देशभरात विजयाची होळी!
भारताच्या विजयाचा आनंद देशभरात होलिकोत्सवाच्या रुपाने साजरा करण्यात आला. क्रिकेट चाहत्यांसोबत सामान्य नागरिकांनी भारताचा विजय साजरा होताच फटाके फोडून, तिरगा फडकवित आणि गुलला उधळून जल्लोष केला.

मुंबईकरांनी केला विराट विजयोत्सव...
भारताने कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६ गडी राखून धुव्वा उडवताच मुंबईकरांनी अक्षरश: दिवाळी साजरी केली. नाक्यानाक्यावर आणि चौकात फटाके वाजवून मुंबईकरांनी हा विजयोत्सव साजरा केला तसेच मिठाईही वाटून आनंद द्विगुणित केला. शनिवारचा दिवस क्रिकेटप्रेमींनी भारत-पाकिस्तानसाठी खास राखून ठेवला होता. विविध ठिकाणी मोठ्या स्क्रिनवर सामन्याच्या थेट प्रक्षेपणाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. सोशल मीडियामध्येही मॅचसंबंधी चर्चेला उधाण आले होते.

1,200
कोटींचा सट्टा
मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला असतानाच बुकींनी या सामान्यासाठी तब्बल १ हजार २०० कोटींचा सट्टा लावला होता. कोण जिंकणार? या उत्सुकतेपोटी प्रत्येकाचे श्वास रोखले गेले असतानाच दुसरीकडे जोरदार सट्टाही लावला जात होता.
सामना सुरू असताना पहिल्या डावावेळी भारतासाठी १ रुपयाला ७० पैसे असा भाव होता. तर पाकिस्तानसाठी १ रुपयाला अडीच रुपये असा भाव होता. भारताची फलंदाजी सुरू झाल्यावर दोन गडी बाद झाले असता सट्ट्याच्या दरात बदल झाले. आणि हा भाव १ रुपयांसाठी ९५ पैसे एवढा झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Is 'hockey'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.