हॉकीतही भारताचे पदकाचे स्वप्न भंगले
By Admin | Published: August 15, 2016 05:41 AM2016-08-15T05:41:27+5:302016-08-15T05:41:27+5:30
भारतीय पुरुष हॉकी संघाचे आॅलिम्पिकमध्ये ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पदक पटकावण्याचे स्वप्न रविवारी भंगले.
रिओ : भारतीय पुरुष हॉकी संघाचे आॅलिम्पिकमध्ये ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पदक पटकावण्याचे स्वप्न रविवारी भंगले. रिओ आॅलिम्पिकमध्ये रविवारी भारताला उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमविरुद्ध १-३ गोलने पराभव स्वीकारावा लागला.
भारताने या लढतीत चांगली सुरुवात केली. १५ व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने गोल नोंदवित भारताचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत भारतीय संघ १-० ने आघाडीवर होता, पण बेल्जियमने दुसऱ्या हाफमध्ये शानदार पुनरागमन करीत १७ मिनिटांच्या अंतरात तीन गोल नोंदवित भारताच्या आशेवर पाणी फेरले.
भारताने आॅलिम्पिकमध्ये अखेरचे पदक मॉस्कोमध्ये १९८० मध्ये मिळवले होते. त्यावेळी भारत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. भारताने यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रौप्यपदक पटकावत आशा पल्लवीत केल्या होत्या. बेल्जियमने चौथ्या क्वार्टरमध्ये चमकदार कामगिरी करीत भारताला कुठलीही संधी दिली नाही. बेल्जियमतर्फे डोकियरने ३४ व ४५ व्या मिनिटाला गोल नोंदवित संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली तर टॉम बूनने ५० व्या मिनिटाला बेल्जियमतर्फे तिसरा गोल नोंदवला. या पराभवामुळे भारतीय संघ आता पाच ते आठ या स्थानांसाठी खेळेल.