हॉकी : जर्मनीकडून भारत पराभूत
By admin | Published: June 7, 2017 12:46 AM2017-06-07T00:46:08+5:302017-06-07T00:46:08+5:30
गेल्या लढतीत बेल्जियमचा पराभव करणाऱ्या भारतीय हॉकी संघाला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले.
डसेलडोर्फ : गेल्या लढतीत बेल्जियमचा पराभव करणाऱ्या भारतीय हॉकी संघाला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. तीन देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला मंगळवारी यजमान जर्मनीविरुद्ध ०-२ ने पराभव स्वीकारावा लागला.
जर्मनीने यापूर्वीच्या लढतीत बेल्जियमचा २-१ ने पराभव केला होता, तर भारताला २-२ ने बरोबरीत रोखले होते. पहिल्या लढतीत जर्मनीला बेल्जियमविरुद्ध २-५ ने पराभव स्वीकारावा लागला होता. जर्मनीच्या खात्यावर ७ गुण आहेत, तर भारताच्या खात्यावर ४ गुणांची नोंद आहे.
भारताला पहिल्या लढतीत बेल्जियमने पराभूत केले, तर जर्मनीविरुद्धची दुसरी लढत बरोबरीत संपली. गेल्या लढतीत भारताने बेल्जियमचा पराभव केला.
भारताने आजच्या लढतीत चांगली सुरुवात करताना दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. युवा ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगला गोल नोंदविता आला नाही. सोमवारी बेल्जियमविरुद्ध ३-२ ने विजयात त्याने दोन गोल नोंदवले होते.
पहिल्या क्वार्टरमध्ये रिओ आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जर्मनी संघाने आक्रमक खेळ केला. सातव्या मिनिटाला थियेस ओले प्रिंजने जर्मनीचे खाते उघडले. पहिल्या क्वार्टरच्या अखेरच्या क्षणी जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण भारतीय गोलकीपर आकाश चिकटेने अप्रतिम बचाव करीत त्यांचे गोल नोंदवण्याचे प्रयत्न हाणून पाडले. भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये संयमी खेळ करीत प्रतिस्पर्धी संघाला विशेष संधी दिली नाही.
भारताला २९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यावर गोलची नोंद झाली नाही. तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोलची नोंद झाली नाही. त्यानंतर जर्मनीने आक्रमक पवित्रा स्वीकारला. अखेरच्या क्षणाला भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविण्याची संधी होती. पण हरमनप्रीतच्या ड्रॅग फ्लिकवर जर्मनीच्या गोलकीपरने चांगला बचाव केला. भारताने अतिरिक्त फॉरवर्ड खेळविण्यासाठी गोलकीपर हटविण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा काही लाभ झाला नाही. जर्मनीने ६० व्या मिनिटाला टीम हर्जब्रशने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर २-० ने विजय निश्चित केला. (वृत्तसंस्था)