हॉकी : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 11:38 PM2019-10-16T23:38:37+5:302019-10-16T23:41:24+5:30
भारताकडून शिवानंद लाक्रा (२६ आणि २९ व्या मिनिटाला) याने दोन गोल केले.
जोहोर बारू (मलेशिया) : भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाने बुधवारी ऑस्ट्रेलियाचा ५-१ ने पराभव करीत नवव्या सुलतान आॅफ जोहोर कप हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली.
भारताकडून शिवानंद लाक्रा (२६ आणि २९ व्या मिनिटाला) याने दोन गोल केले, तर दिलप्रीतसिंग (४४), गुरसाहिबजीत सिंग (४८) आणि मनदीप मोर (५०) यांनी प्रत्येकी एक गोल केला. ऑस्ट्रेलियाच्या चुकीमुळे भारताला पहिल्याच मिनिटाला गोल नोंदविण्याची संधी मिळाली होती. पण रॉबर्ट मॅक्मिलन याने तत्परता दाखवून साहिबजीतचा प्रयत्न हाणून पाडला.
यानंतर दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये बराच वेळ मिडफिल्डमध्ये खेळ झाला. ऑस्ट्रेलियाला आठव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यावर गोल होऊ शकला नाही. भारताने गोलरक्षक प्रशांत चौहान याला मैदानात आणले. याचवेळी ऑस्ट्रेलियाने हल्ला चढविला. मायकेल फ्रान्सिसने चेंडू गोलजाळीच्या दिशेने वळविण्याचा प्रयत्न केला होता, पण चौहान याने हा हल्ला शिताफीने परतवून लावला. काही मिनिटानंतर भारतालाही पेनल्टी कॉर्नर मिळाला होता; पण गुरसाहिबजीतला त्यावर गोल नोंदविण्यात अपयश आले.
भारताने यानंतर लाक्राच्या गोलमुळे आघाडी मिळवली. दिलप्रीतच्या शानदार पासपुढे ऑस्ट्रेलिया बचाव तोकडा पडला. याचा लाभ घेत लाक्राने चेंडू अलगद गोलजाळीत ढकलला. दिलप्रीत आणि लाक्रा यांच्या जोडीने यानंतरही अनेकदा हल्ले चढविले. त्यात लाक्राला दुसरा गोल नोंदविण्यात यश आल्याने मध्यंतराला भारताकडे २-० अशी आघाडी होती.
भारताने अखेरच्या दोन क्वॉर्टरमध्ये आॅसीला दडपणात आणून आणखी ३ गोल केले. ऑस्ट्रेलियाला यादरम्यान खाते उघडण्यात यश आले. भारताला अखेरचा राऊंड रॉबिन सामना शुक्रवारी ग्रेट ब्रिटनविरुद्ध खेळायचा आहे.