हॉकी संघाची भारतीयांना दिवाळी भेट

By admin | Published: October 31, 2016 06:23 AM2016-10-31T06:23:43+5:302016-10-31T06:23:43+5:30

टीम इंडियाने गतविजेता आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान ३-२ असे परतावून दिमाखात आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली.

Hockey team visits Diwali to Indians | हॉकी संघाची भारतीयांना दिवाळी भेट

हॉकी संघाची भारतीयांना दिवाळी भेट

Next


कुआंटन : अत्यंत चुरशीच्या व रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात संभाव्य विजेत्या टीम इंडियाने गतविजेता आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान ३-२ असे परतावून दिमाखात आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा स्पर्धेत बाजी मारताना भारताने यंदाच्या स्पर्धेत अपराजित राहण्याची कामगिरी केली.
देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना भारताच्या पुरुष हॉकी संघाने भारतीयांचा आनंद द्विगुणित करताना पारंपरिक पाकिस्तानला लोळवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची दिवाळी भेट दिली. भारत-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यात एक वेळ २-२ अशी बरोबरी होती. मात्र, अखेरच्या सात मिनिटांमध्ये भारतीयांनी निर्णायक कामगिरी करताना कमालीचे आक्रमण करून पाकिस्तानच्या आव्हानातली हवा काढली. निकिन थिमैया याने अखेरच्या काही मिनिटांमध्ये निर्णायक गोल करून भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना भारतीयांनी आपल्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दखल घेण्याची बाब म्हणजे याआधी २०११ साली या स्पर्धेत बाजी मारतानाही भारताने पाकिस्तानचाच सफाया केला होता. याच कामगिरीची पुन्हा एकदा टीम इंडियाने पुनरावृत्ती केली आहे.
स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताचे या निर्णायक सामन्यात ड्रॅग फ्लिकर रूपिंदर पाल सिंगने नेतृत्व केले. त्यानेच भारताचे खाते उघडताना पेनल्टी कॉर्नर यशस्वी ठरवताना संघाला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर आफान युसूफने जबरदस्त मैदानी गोल करून भारताला २-० असे आघाडीवर नेले. ५ मिनिटांंमध्ये २ गोल करून भारतीयांनी पाकिस्तानला प्रचंड दबावाखाली ठेवले.
यानंतर पाक संघानेही जोरदार प्रतिकार केला. या वेळी मिळालेली पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना अलीम बिलालने पाकिस्तानचा पहिला गोल नोंदवला. यानंतर भारताने बचावात्मक पवित्रा घेत मध्यंतराला २-१ अशी आघाडी कायम राखली.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीयांच्या आक्रमकतेमध्ये थोडी ढिलाई दिसली आणि याचा पुरेपूर फायदा उचलत अली शानने दमदार गोल करून पाकिस्तानला २-२ अशी बरोबरी साधून दिली. या वेळी जबरदस्त चुरस निर्माण झालेली असताना चौथ्या आणि निर्णायक क्वार्टरमध्ये निकिन तिमैयाने सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना पाकिस्तानच्या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली. पाकच्या बचावपटूंना चकवताना त्याने निर्णायक गोल
करून भारताचा विजयी गोल साकारला. (वृत्तसंस्था)
स्पर्धेचा अंतिम सामना आणि तोही पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा... अशा प्रचंड दबावाच्या सामन्यात भारताला आपला हुकमी खेळाडू गोलरक्षक आर. श्रीजेशविना खेळावे लागले. मात्र, याचे कोणतेही दडपण न घेता भारतीयांनी संपूर्ण सामन्यावर नियंत्रण राखले. श्रीजेशच्या जागी संघात निवड झालेल्या आकाश चिकते याने चमकदार खेळ केला.
सामन्याच्या सुरुवातीलाच मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेण्यात अपयश आल्यानंतर भारतीयांनी नियोजनबद्ध खेळ आणि योग्य ताळमेळच्या जोरावर पाकिस्तानच्या क्षेत्रात मुसंडी मारून तीन गोल नोंदवले.
स्पर्धेत सहावे मानांकन लाभलेल्या भारतीय संघाकडे सुरुवातीपासूनच संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. त्यातच संघात प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती असूनही युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करताना अभिमानाने तिरंगा फडकवला. रूपिंदर पाल सिंग (१८वे मिनिट), आफान युसुफ (२३) आणि निकिन थिमैया (५१) यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताच्या विजेतेपदामध्ये निर्णायक कामगिरी केली.

खेळाडूंना रोख पारितोषिक
विजेत्या संघातील खेळाडूंना हॉकी इंडियाने २ लाख रुपयांचे रोख पारितोषिक प्रत्येक खेळाडूसह मुख्य प्रशिक्षक अल्टोमन्स यांना घोषित केले. याचबरोबर संघाचा सपोर्ट स्टार यांना सुद्धा १ लाख रुपयाचे पारितोषिक जारी करण्यात आले.

Web Title: Hockey team visits Diwali to Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.