हॉकी विश्वचषक! गतविजेत्या भारताचे पदकाचे स्वप्न भंगले; अर्जेंटिना दुसऱ्यांदा विजेता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 07:40 AM2021-12-06T07:40:10+5:302021-12-06T07:40:26+5:30
फ्रान्सचा कर्णधार टिमोथी क्लेमेंटने केलेल्या हॅट्ट्रिकमुळे भारताच्या पदक जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या.
भुवनेश्वर : लौटारो डोमेनेच्या हॅट्ट्रिक गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने सहावेळच्या विजेत्या जर्मनीला ४-२ असे पराभूत करत रविवारी कलिंग स्टेडिअममध्ये दुसरे एफआयएच ज्युनियर पुरुष हॉकी विश्व कप विजेतेपद पटकावले. डोमनेने १०व्या,२५ व्या आणि ५० व्या मिनिटाला तीन पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये बदलले. तर फ्रेंको अगोस्टिनीने ६० व्या मिनिटाला अंतिम हूटरच्या काही सेकंद आधी मैदानी गोल करत अर्जेंटिनाला दुसरे विजेतेपद मिळवून दिले. त्या आधी कांस्य पदकाच्या लढतीत भारताला फ्रान्सकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
फ्रान्सचा कर्णधार टिमोथी क्लेमेंटने केलेल्या हॅट्ट्रिकमुळे भारताच्या पदक जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. क्लेमेंटने २६, ३४ आणि ४७व्या मिनिटाला मिळालेल्या तिनही पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामन्यात भक्कम आघाडी घेतली. भारताकडून सुदीप चिरमाकोला ४२व्या मिनिटाला केवळ एकमेव गोल करता आला. उपांत्यपूर्व सामन्यात बेल्जियमवर मिळवलेल्या विजयानंतर भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या दोन्ही महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली. विशेष म्हणजे या विश्वचषकात सुरुवातीच्या सामन्यातही फ्रान्सने भारताला ४-५ ने पराभूत केले होते. त्यामुळे या सामन्यात पराभवाची सव्याज परतफेड करण्याची नामी संधी भारताकडे होती. मात्र ही संधी साधण्यात भारत अपयशी ठरला. या सामन्यात फ्रान्सकडून शिस्तबद्ध खेळ पहायला मिळाला.
भारताकडून झालेल्या चुकांचा फायदा उठवत फ्रान्सने तब्बल १४ पेनॉल्टी कॉर्नर पटकावले. त्यातुलनेत भारताला केवळ तीनच पेनल्टी कॉर्नर मिळवता आले. भारतीय संघाला या सामन्यात काही चांगला संधी मिळाल्या होत्या; पण त्या संधींना गोलमध्ये बदलण्यात ते अपयशी ठरले. विशेष म्हणजे फ्रान्सने संपूर्ण सामन्यात भारतीय बचापटूंवर दबाव ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.