होल्डरचा पंच! अटीतटीच्या लढतीत भारत पराभूत
By admin | Published: July 3, 2017 02:50 AM2017-07-03T02:50:18+5:302017-07-03T02:50:18+5:30
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारताला वेस्ट इंडिजकडून 11 धावांनी पराभव पत्करावा लागला.
ऑनलाइन लोकमत
नॉर्थ साऊंड (अँटिग्वा), दि. 3 - शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारताला वेस्ट इंडिजकडून 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे दिग्गज वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यासमोर ढेपाळले. पाच बळी टिपणारा कर्णधार जेसन होल्डर वेस्ट इंडिजच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयाबरोबरच वेस्ट इंडिजने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आपली पिछाडी 1-2 अशी कमी केली.
वेस्ट इंडिजने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन 5, विराट कोहली 3 आणि दिनेश कार्तिक 2 हे झटपट माघारी परतल्याने तेराव्या षटकात भारताची अवस्था 3 बाद 47 अशी झाली होती.
मात्र सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी चौथ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. मात्र रहाणे (60) आणि धोनी ( 54) यांचा अपवाद वगळता भारताच्या इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. धोनीने शेवटपर्यंत खिंड लढवून भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण 49 व्या षटकात धोनी बाद झाल्यावर भारताचे सामन्यातील आव्हान संपुष्टात आले.
तत्पूर्वी चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर उमेश यादवसह इतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजला 9 बाद 189 धावांत रोखले. उमेश यादव (३६ धावांत ३ बळी), हार्दिक पांड्या (४० धावांत ३ बळी) आणि कुलदीप यादव (३१ धावांत २ बळी) यांच्या सुरेख गोलंदाजीसमोर यजमान संघाचा एकही फलंदाज टिकून खेळू शकला नाही.
त्यांच्याकडून सलामीवीर एव्हिन लुईस आणि काइल होप यांनी सर्वाधिक प्रत्येकी ३५ धावा केल्या, तर शाई होप (२५) आणि रोस्टन चेज (२४) यांनी चांगली सुरुवात केल्यानंतर त्यांना त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. काइल आणि लुईस यांनी संघाला संथ; परंतु चांगली सुरुवात करून दिली. अखेर हार्दिक पांड्या याने होपला स्वीपर कव्हरला केदार जाधवकडे झेल देण्यास भाग पाडत ही जोडी फोडली. त्यानंतर कुलदीप यादवने लुईसला विराटकरवी झेलबाद करीत भारताला दुसरे यश मिळवून दिले.
गेल्या सामन्याप्रमाणेच कुलदीपने याही सामन्यात रोस्टन चेजला त्रिफळाबाद केले. पांड्याने शाई होप याला धोनीकरवी झेलबाद करीत वेस्ट इंडीजला चौथा धक्का दिला. कर्णधार जेसन होल्डरदेखील १० चेंडूंत ११ धावा केल्यानंतर उमेशच्या गोलंदाजीवर धोनीच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. त्यामुळे वेस्ट इंडीजची ५ बाद १५४ अशी स्थिती झाली. या पडझडीतून वेस्ट इंडीजचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. वेस्ट इंडीजला अखेरच्या १० षटकांत अवघ्या ३५ धावाच केल्या.