होल्डन, बार्टलेटची नाबाद शतके

By admin | Published: February 14, 2017 12:12 AM2017-02-14T00:12:05+5:302017-02-14T00:12:05+5:30

कर्णधार मॅक्स होल्डन व जॉर्ज बार्टलेटच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने १९ वर्षांखालील युवकांच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर

Holland, Bartlett's unbeaten centuries | होल्डन, बार्टलेटची नाबाद शतके

होल्डन, बार्टलेटची नाबाद शतके

Next

नागपूर : कर्णधार मॅक्स होल्डन व जॉर्ज बार्टलेटच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने १९ वर्षांखालील युवकांच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर १ बाद ३११ अशी भक्कम धावसंख्या उभारली. भारतीय युवा संघाचा मारा निष्फळ ठरला. मॅक्स होल्डन १३५ धावा (२५९ चेंडू, १७ चौकार) आणि जॉर्ज बार्टलेट १३२ धावा (२०३ चेंडू, १८ चौकार, २ षट्कार) करून खेळपट्टीवर कायम आहेत.
जामठा येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवरील सामन्यात इंग्लंडचा कर्णधार मॅक्स होल्डनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर हॅरी ब्रुक आणि मॅक्स होल्डनने ५७ धावांची भागीदारी केल्यानंतर मध्यमगती गोलंदाज कनिश सेठच्या चेंडूवर ब्रुकला (२१) यष्टिरक्षक लोकेश्वरने झेलबाद केले. हा अपवाद वगळता भारतीयांची दिवसभर निराशाच झाली. होल्डनने उपाहारानंतर अर्धशतक पूर्ण केले. भारताचा कर्णधार जाँटी सिद्धूसह सात गोलंदाजांनी मारा केला, पण यश मात्र कोणत्याच गोलंदाजाला मिळवता आले नाही.
बार्टलेटही अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरला. उपाहार ते चहापान या दोन तासांत दोघांनी शतकी भागीदारी केली. सलामीवीर होल्डनने लवकरच १९२ चेंडूंत १३ चौकारांसह शतक गाठले. होल्डननंतर बार्टलेट शतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरला. त्याने १६७ चेंडूचा सामना करीत १४ चौकार व एका षट्कारासह शतक गाठले. नंतर दोघांनीही ३३६ चेंडंूत दुसऱ्या गड्यासाठी २५४ धावांची भागीदारी करीत ३०० धावा फळ्यावर लावल्या. (क्रीडा प्रतिनिधी)
धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : हॅरी ब्रुक झे. लोकेश्वर गो. कनिश सेठ २१, मॅक्स होल्डन खेळत आहे १३५, जॉर्ज बार्टलेट खेळत आहे १३२. अवांतर-२३, एकूण- ८७ षटकांत १ बाद ३११. गडी बाद होण्याचा क्रम : १-५७. गोलंदाजी : कनिश सेठ १७-४-५०-१, रिषभ भगत १९-२-५१-०, विनीत पन्वर ११-०-५६-०, सिजोमन जोसेफ १३-१-५४-०, डॅरिल फेरारिओ १४-३-५०-०, सौरभ सिंग ८-१-२३-०, जाँटी सिद्धू ५-०-१७-०.

Web Title: Holland, Bartlett's unbeaten centuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.