कर न भरल्यामुळे होळकर स्टेडियमला टाळे ठोकले
By admin | Published: March 30, 2017 10:37 PM2017-03-30T22:37:24+5:302017-03-30T22:37:24+5:30
किंग्ज इलेव्हन पंजाबचे घरचे मैदान होळकर स्टेडियमला संपत्ती कर जमा न केल्यामुळे आज सील करण्यात आले आहे
ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि. 30 - आयपीएल सुरू होण्यास आता अवघा एक आठवडा बाकी आहे; परंतु किंग्ज इलेव्हन पंजाबचे घरचे मैदान होळकर स्टेडियमला संपत्ती कर जमा न केल्यामुळे आज सील करण्यात आले आहे. येथे 8 एप्रिल रोजी पहिला सामना होणार आहे.
इंदूर महानगरपालिकने 29 लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती कर आणि अन्य स्थानिक कर न भरल्यामुळे मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याचे कार्यालय व होळकर स्टेडियमच्या दोन मुख्य प्रवेशद्वार मध्य प्रदेश नगरपालिका अधिनियम 1956 नुसार गुरुवारी सील केले.
विशेष म्हणजे पुढील महिन्यात याच स्टेडियमवर होणाऱ्या तीन आयपीएल सामन्यांआधी हे पाऊल उचलण्यात आले. महानगरपालिकेचे उपायुक्त प्रतापसिंह सोळंकी म्हणाले, ‘एमपीसीएवर आर्थिक वर्ष 2016-17 दरम्यानचे 29 लाख 9 हजार 605 रुपये संपत्ती कर आणि अन्य स्थानिक कर भरण्याचे बाकी होती.
सोळंकी यांनी सांगितले की, ‘होळकर स्टेडियमच्या 1 लाख 61 हजार वर्गफूट परिसरात पसरलेल्या क्रिकेट मैदानाविषयी एमपीसीएकडून महानगरपालिकेच्या खात्यात संपत्ती कर जमा केला जात नसल्याचे महानगरपालिकेच्या पथकाला तपासादरम्यान आढळले होते.’दरम्यान, सीईओ रोहित पंडित यांनी म्हटले की, ‘एमपीसीए 2010-11 मध्ये सात लाख 40 हजार रुपये संपत्ती कर भरला आहे; परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अचानक चार दिवसआधी नवीन कर निर्धारण कराची रक्कम 29 लाख रुपयांपर्यंत पोहोचवली.’