‘श्रीनिं’ची कानउघाडणी
By admin | Published: February 23, 2015 11:55 PM2015-02-23T23:55:59+5:302015-02-23T23:55:59+5:30
बीसीसीआयच्या कामकाजापासून सध्या दूर राहण्याचे निर्देश धुडकावून बोर्डाच्या बैठकीला हजर राहणारे निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केली.
नवी दिल्ली : बीसीसीआयच्या कामकाजापासून सध्या दूर राहण्याचे निर्देश धुडकावून बोर्डाच्या बैठकीला हजर राहणारे निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केली.
श्रीनिवासन ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत सहभागी झाले होते. कोर्टाने त्यांना फटकारताना, ‘‘श्रीनिवासन यांनी असे करायला नको होते. बीसीसीआयमध्ये त्यांची दुहेरी भूमिका असल्याचे
चौकशीदरम्यान आम्हाला याचे सबळ पुरावे आढळले आहेत.’’ श्रीनिवासन यांचे वकील कपिल सिब्बल यांना २७ फेब्रुवारीपर्यंत श्रीनिवासन यांची बाजू सादर करण्यास सांगण्यात आले.
१८ फेब्रुवारी रोजी क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ८ फेब्रुवारी रोजी बोर्डाच्या चेन्नईत झालेल्या बैठकीचे श्रीनिवासन यांनी अध्यक्षपद सांभाळले, हा कोर्टाचा अपमान असल्याचे याचिकेत नमूद केले. याआधारे वर्मा यांनी श्रीनिवासन यांच्यासह अंतरिम अध्यक्ष शिवलाल यादव, तसेच सचिव संजय पटेल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याचिकेत वर्मा यांनी मीडियात प्रकाशित झालेल्या वृत्ताचा हवाला दिला. चेन्नई सुपर किंग्ज किंवा बीसीसीआय यापैकी एकाची निवड करावी, असे आदेशात नमूद करीत कोर्टाने श्रीनिवासन यांना बोर्डाच्या कामकाजापासून दूर राहण्यास सांगितले होते. (वृत्तसंस्था)