फायनल गाठण्याची आशा
By admin | Published: January 16, 2015 04:18 AM2015-01-16T04:18:34+5:302015-01-16T04:18:34+5:30
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर वन-डेमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज असलेला भारतीय वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुढच्या महिन्यात प्रारंभ होत
मेलबर्न : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर वन-डेमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज असलेला भारतीय वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुढच्या महिन्यात प्रारंभ होत असलेल्या विश्वकप स्पर्धेत टीम इंडिया जेतेपद राखण्यासाठी गत कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
संघाच्या नव्या वन-डे किटच्या अनावरणप्रसंगी बोलताना धोनी म्हणाला, ‘‘आम्ही २०११ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहोत. पण वातावरणातील बदल महत्त्वाची भूमिका बजावणार असून, आम्हाला त्यानुसार खेळावे लागेल. क्रिकेटच्या कुठल्याही स्वरूपासाठी मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) जागतिक क्रिकेटच्या आयोजनासाठी असलेल्या सर्वश्रेष्ठ स्थळांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत वन-डे क्रिकेटमध्ये आम्ही केलेल्या कामगिरीपेक्षा आम्ही चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य निश्चित केले असून, १९ मार्च रोजी होणाऱ्या विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आम्ही पुन्हा खेळू, अशी आशा आहे.’’
आॅस्ट्रेलियात पुढील दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीमध्ये वन-डे क्रिकेटची धूम राहणार आहे. यजमान आॅस्ट्रेलियासह भारत व इंग्लंडचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेनंतर पुढील महिन्यात विश्वकप स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. तिरंगी मालिकेत भारताची पहिली लढत एमसीजीवर आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. टीम इंडियाच्या विश्वकप स्पर्धेच्या मोहिमेला १५ फेब्रुवारीपासून अॅडलेडमध्ये प्रारंभ होणार आहे.
येथे ‘ब’ गटात भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. धोनीने
अलीकडेच संपलेल्या भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेत एमसीजीवर अनिर्णीत संपलेल्या तिसऱ्या लढतीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पण आता धोनी वन-डे टीमचा कर्णधार म्हणून मैदानावर परतणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या लढतीत विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले.
आपल्या नेहमीच्या शैलीत धोनी म्हणाला, ‘‘मी विश्रांती घेतली. कुठल्याही खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे अभिमानाची बाब आहे. क्रिकेटमध्ये भारतात चुरस असून काहीच खेळाडूंना हा पोशाख (टीम इंडियाची जर्सी) परिधान करण्याची संधी मिळते. त्यामुळे येथे पुन्हा एकदा ही जर्सी परिधान करताना आनंद वाटतो.’’
आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत शानदार कामगिरी करणारा कोहली तिरंगी मालिका व त्यानंतर विश्वकप स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.
भारतीय संघ बुधवारी येथे दाखल झाला असून, कसोटी मालिकेनंतर पाच दिवसांच्या विश्रांतीचा आनंद घेत संघ आता सरावासाठी सज्ज झाला आहे. तिरंगी मालिका व विश्वकप स्पर्धेसाठी संघात समावेश असलेल्या सर्व खेळाडूंसह रवींद्र जडेजाही येथे दाखल झाला आहे. त्याने क्षेत्ररक्षणाचा सराव केला. जडेजाच्या फिटनेसबाबत अद्याप निश्चित सांगणे घाईचे ठरेल. दरम्यान, सिडनीमध्ये आॅस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीने तिरंगी मालिकेचा प्रारंभ होणार आहे. (वृत्तसंस्था)