अफगाणिस्तानच्या आशा जिवंत

By admin | Published: March 11, 2016 03:43 AM2016-03-11T03:43:11+5:302016-03-11T03:43:11+5:30

मोहम्मद नबीची सुरेख फिरकी गोलंदाजी आणि मोहम्मद शेहजाद याची शानदार खेळी या बळावर अफगाणिस्तान संघाने विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरी सामन्यात हाँगकाँगचा ६ गडी व १२ चेंडू राखून पराभव केला

The hope of Afghanistan alive | अफगाणिस्तानच्या आशा जिवंत

अफगाणिस्तानच्या आशा जिवंत

Next

जयंत कुलकर्णी,  नागपूर
मोहम्मद नबीची सुरेख फिरकी गोलंदाजी आणि मोहम्मद शेहजाद याची शानदार खेळी या बळावर अफगाणिस्तान संघाने विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरी सामन्यात हाँगकाँगचा ६ गडी व १२ चेंडू राखून पराभव केला. या विजयाबरोबरच क्रिकेटमध्ये आपली नवीन ओळख करू पाहणाऱ्या अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडचा गुरुवारी पराभव करणाऱ्या झिम्बाब्वे या दोन संघांत विश्वचषक ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेतील पात्र ठरण्यासाठी चुरस असणार आहे. हाँगकाँगने विजयासाठी दिलेले ११७ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तान संघाने १८ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. त्यांच्याकडून मोहम्मद शेहजाद याने ४0 चेंडूंत २ षटकार व ४ चौकारांसह ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. नूर अली जरदान याने ३७ चेंडूंत ३५ धावा केल्या. हाँगकाँगकडून कॅम्पबेलने २ गडी बाद केले.
विजयाचा पाठलाग करताना मोहम्मद शेहजाद आणि नूर अली जरदान यांनी अफगाणिस्तान संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. त्यांच्या तडाख्यामुळे अफगाणिस्तानने त्यांचे अर्धशतक ४0 चेंडूंत धावफलकावर लगावले. या दोघांनी गोलंदाजांना लयच मिळू दिली नाही. विशेषत: मोहम्मद शेहजाद याने नदीम अहमद याला मिडविकेट, तर अंशुमन रथ याला लाँगआॅनवर सणसणीत षटकार ठोकताना त्यांचा समाचार घेतला. शेहजाद व नूर अली यांनी ६४ चेंडूंत ७0 धावांची सलामी देताना अफगाणिस्तानच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. कॅम्पबेलला उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात अखेर मोहम्मद शेहजाद अंशुमन रथच्या हाती लाँगआॅफला झेल देऊन परतला. त्यानंतर आठ धावांच्या अंतरातच हाँगकाँगच्या गोलंदाजांनी जम बसलेल्या नूर अली जरदानसह मोहमद नबी (१७) आणि शफीकउल्लाह यांना (0३) तंबूत धाडताना १ बाद ९५ वरून त्यांची ४ बाद १0३ अशी स्थिती करताना सामन्यात चुरस वाढवली; परंतु नजीबबुलाह जरदान याने हसीब अमजदला एकाच षटकात ३ चौकार मारताना अफगाणिस्तान संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, आॅफस्पिनर मोहम्मद नबी याच्या सुरेख फिरकी गोलंदाजीच्या बळावर अफगाणिस्तान संघाने २0 षटकांत ६ बाद ११६ धावांवर रोखले.
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियम येथील लढतीमध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी हाँगकाँगला डोके वर काढण्याची उसंतच दिली नाही. हाँगकाँगकडून अंशुमन रथने ३१ चेंडंूत चौकारासह २८ धावा केल्या. रेयॉन कॅम्पबेलने २४ चेंडूंत ५ चौकारांसह २७ धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी याने २0 धावांत ४ गडी बाद केले. त्याला राशीद खान आणि गुलबदिन नईब यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. हाँगकाँगने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांना दौलत झरदानला दोन चौकार मारणाऱ्या रेयन कॅम्पबेल याने जॅमी अ‍ॅटकिन्सन याच्या साथीने ५.४ षटकांत ४0 धावांची सलामी दिली; परंतु अफगाणिस्तान मोहम्मद नबी, राशीद खान व गुलाबदिन या त्रिकुटाने पुढील २२ धावांत ४ फलंदाजांना तंबूत धडताना हाँगकाँगची बिनबाद ४0 वरून ४ बाद ६२ अशी स्थिती केली. या स्थितीतून हाँगकाँग संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. मोहम्मद नबी याने सर्वांत प्रथम त्याच्या पहिल्याच षटकात जम बसलेला रेयान कॅम्पबेल त्रिफळाबाद करीत आणि नंतर बाबर हयात याला समीउल्लाह शेनवारी याच्या हाती झेल देण्यास भाग पाडताना हाँगकाँगला दुहेरी धक्का दिला.
त्यानंतर समीउल्लाह शेनवारीच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक शेहजादकडून जीवदान मिळाल्याचा फायदाही अ‍ॅटकिन्सन याला घेता आला नाही आणि तो रशीद खानच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला. संक्षिप्त धावफलक :
हाँगकाँग : २0 षटकांत ६ बाद ११६. (अंशुमन रथ २८, रेयॉन कॅम्पबेल २७, मोहम्मद नबी ४/२0, राशीद खान १/२३, गुलबदिन नईब १/१३).
अफगाणिस्तान : १८ षटकात ४ बाद ११९. (मोहमद शेहजाद ४१, नूर अली जरदान ३५, मोहमद नबी १७, एन. जरदान नाबाद १७. रेयॉन कॅम्पबेल २/२८).

Web Title: The hope of Afghanistan alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.