ग्रँडस्लॅम विजयाचा दुष्काळ संपण्याची बोपन्नाला आशा
By admin | Published: January 3, 2017 12:46 AM2017-01-03T00:46:36+5:302017-01-03T00:46:36+5:30
जागतिक पुरुष टेनिस एकेरी क्रमवारीत २२व्या स्थानी असलेल्या पाब्लो क्यूवाससह नव्या मोसमात ग्रँडस्लॅम जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याची आशा भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाला आहे.
चेन्नई : जागतिक पुरुष टेनिस एकेरी क्रमवारीत २२व्या स्थानी असलेल्या पाब्लो क्यूवाससह नव्या मोसमात ग्रँडस्लॅम जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याची आशा भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाला आहे. २०१३ साली पहिल्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचलेला बोपन्ना त्यानंतर ग्रँडस्लॅम यशापासून दूर राहिला. विशेष म्हणजे, यंदाच्या सत्रात सुरुवातीला चेन्नई ओपनसाठी बोपन्नाने जीवन नेदुनचेझियानसह जोडी बनवली आहे. त्याचवेळी, ‘ग्रँडस्लॅम जिंकणे हे माझे स्वप्न असून नव्या जोडीदारासह मला याची आशा आहे,’ असे बोपन्नाने सांगितेले.
पाकिस्तानचा ऐसाम उल हक कुरेशीसह खेळताना २०१० साली बोपन्नाने अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, तर यानंतर विम्बल्डन (२०१३, २०१५) आणि अमेरिकन (२०११) ओपनची अंतिम फेरी गाठली होती. क्यूवासविषयी सांगायचे झाल्यास, त्याने लुई होर्नासह खेळताना २००८ साली फ्रेंच ओपनच्या जेतेपदावर आपले नाव कोरले होते, तर आठ अंतिम सामन्यांत खेळताना एकूण ५ एटीपी एकेरी विजेतेपद पटकावले आहेत. बोपन्नाने एकूण ३७ अंतिम सामने खेळताना त्यातील १४ दुहेरी जेतेपद पटकावली आहेत.
नव्या मोसमातील तयारीबाबत बोपन्ना म्हणाला की, ‘ग्रँडस्लॅम जिंकणे एक स्वप्न आहे. आशा आहे की, नव्या जोडीदारासह ही प्रतीक्षा संपेल. मला सुरुवातीपासूनच क्यूवासचा खेळ आवडतो. शिवाय त्याच्याविरुद्धही मी अनेकदा खेळलो आहे. तो मजबूत खेळाडू असून ताकदवर सर्व्हिस करतो.’