आशा सोडली होती, पण अनपेक्षित भेट मिळाली : फैज फझल

By admin | Published: May 23, 2016 08:41 PM2016-05-23T20:41:49+5:302016-05-23T20:41:49+5:30

वयाच्या ३० व्या वर्षी टीम इंडियात स्थान मिळेल अशी अपेक्षा नव्हतीच. मी तर भारताकडून खेळायला मिळेल याची आशा देखील सोडली होती. सोमवारी अनपेक्षित वृत्त कानावर पडताच आनंदाला उधाण आले

Hope was given, but unexpected visit was received: Faiz Fazal | आशा सोडली होती, पण अनपेक्षित भेट मिळाली : फैज फझल

आशा सोडली होती, पण अनपेक्षित भेट मिळाली : फैज फझल

Next

नवी दिल्ली : वयाच्या ३० व्या वर्षी टीम इंडियात स्थान मिळेल अशी अपेक्षा नव्हतीच. मी तर भारताकडून खेळायला मिळेल याची आशा देखील सोडली होती. सोमवारी अनपेक्षित वृत्त कानावर पडताच आनंदाला उधाण आले. झोपेतच असताना गोड बातमी मिळाल्याने सर्व काही मिळाल्याचे समाधान होत असल्याची प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघात निवड झालेला विदर्भाचा डावखुरा फलंदाज फैज फझल याने व्यक्त केली.
फैज सध्या इंग्लंडमध्ये डरहममध्ये नॉर्थ इस्टर्न प्रीमियर लीगमध्ये क्लब क्रिकेट खेळत आहे. त्याने दूरध्वनीवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,‘काही वर्षांपूर्वी मी रणजी मोसमात ७०० वर धावा ठोकल्या होत्या. त्यावेळी भारतीय संघात स्थान मिळेल आणि आनंदाची वार्ता येईल, अशी अपेक्षा होती. पण तसे घडले नाही. त्यावेळी निराशा झाली. पुढे मी भारताकडून खेळायला मिळेल ही अपेक्षा करणे सोडले. अपेक्षा सोडली तर निराश होण्याचे कारणच नसते. आज माझ्या वडिलांनी मला फोनवर आनंदाची गोड बातमी देताच सभोवतालचे जग सुंदर वाटायला लागले. ’
रेल्वेकडूनही काही वेळ रणजी करंडक सामने खेळलेला फैज म्हणाला,‘प्रत्येक खेळाडूला भारताकडून खेळण्याची इच्छा असते. पण सर्वांनाच संधी मिळेल असे नाही. मला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद वाटतो. देशात स्थानिक क्रिकेटमध्ये अनेक प्रतिस्पर्धी खेळाडू आहेत. अनेकांनी शंभरावर प्रथमश्रेणी सामने देखील खेळले आहेत. पण भारतीय संघात कधीही त्यांना निवडण्यात आले नाही. मला उशिरा का होईना संधी तर मिळाली. आता खेळण्याची संधी मिळाली तर कामगिरी करावीच लागेल. शेवटी यशासारखा दुसरा आनंद नाही.’(वृत्तसंस्था)

......................................................................
सारे काही अविश्वसनीय : याकुब फझल
फैजच्या रूपाने तिसरा वैदर्भीय क्रिकेटपटू भारतीय संघात!
नागपूर : माजी वेगवान गोलंदाज प्रशांत वैद्य आणि उमेश यादव यांच्या पाठोपाठ सलामीचा डावखुरा शैलीदार फलंदाज फैज याकुब फझल हा भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविणारा विदर्भाचा तिसरा खेळाडू ठरला. पुढील महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघातून फैज वन डे तसेच टी-२० सामने खेळणार आहे.
मुलाची संघात निवड झाल्यामुळे वडील याकुब फझल यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहात होता. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले,‘भारतीय संघाकडून खेळणे अभिनामाची बाब आहे. फैजने हा बुहमान मिळविला. मी जेव्हा त्याला निवडीची बातमी सांगितली तेव्हा इंग्लंडमध्ये तो झोपेतच होता. तो खडबडून उठला. काही क्षण त्याला माझ्या बातमीवर विश्वासही बसला नव्हता. मी त्याला वारंवार वृत्त सांगितले तेव्हा कुठे खात्री पटली. फैजने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ म्हणावे लागेल.’
फैजच्या क्रिकेटमधील सुरुवातीच्या दिवसांना उजाळा देत याकुब म्हणाले,‘मुलाच्या जडणघडणीत मी सावलीप्रमाणे त्याच्यासोबत राहिलो. क्लब, स्कूल आणि रणजी सर्वच सामन्यांना मी सकाळपासून हजेरी लावत होतो. त्याच्या यशापयशाचा मी साक्षीदार असल्याने फैजइतकाच मी देखील आनंदी आहे. फैजचे आजोबा, आई, बहीण आणि फैजची पत्नी या सर्वांना याचे श्रेय जाते.(क्रीडा प्रतिनिधी)
......................................................................
फैजला लोकमतनेदिले प्रोत्साहन !
लोकमत वृत्तपत्र समूहाद्वारे काही वर्षांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या जवाहरलाल दर्डा चषक १९ वर्षांखालील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत फैजने नागपूर जिल्हा संघाचे अनेकदा प्रतिनिधित्व केले होते. फैजच्या आकर्षक फलंदाजीच्या बळावर नागपूर संघाने या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते, हे विशेष.
......................................................................

अल्पपरिचय
शांतिनगरनजीकच्या मेहंदीबाग कॉलनीत वास्तव्य करणाऱ्या फैज फझलचा जन्म ७ सप्टेंबर १९८५ ला झाला. २००३-०४ यामोसमात रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या डावखुऱ्या शैलीदार फलंदाजाच्या नावावर पहिल्याच सामन्यात जम्मू काश्मीरविरुद्ध १५१ धावा ठोकण्याच्या आगळावेगळ्या विक्रमाची नोंद आहे. त्यावेळी फैज अवघा १८ वर्षांचा होता. फैजची प्रथमश्रेणीत दहा, रणजी करंडक स्पर्धेत दहा शतके असून इराणी करंडक स्पर्धेत एक शतक आहे. वन डे क्रिकेटमध्ये देखील विजय हजारे करंडकात फैजने चार शतके ठोकली तर देवधर करंडक स्पर्धेत एका शतकाची नोंद केली. फैजने नंतर रणजी करंडकात विदर्भ संघाचे नेतृत्व देखील केले.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या यजमानपदाखाली झालेल्या १४ वर्षे गटाच्या क्रिकेटमध्ये विदर्भ संघाचे नेतृत्व करीत फैजने १९९९-२००० मध्ये सामना करंडक जिंकून दिला होता. कूच बिहार करंडक स्पर्धेतही फैजने १९ वर्षे गटाच्या विदर्भ संघाचे नेतृत्व केले आहे.
फैजने आयपीएलमध्ये २०१०-११आणि २०११-१२ या दोन सत्रात राजसर््थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले. त्याने यादरम्यान १२ सामन्यात ९७.१३ च्या सरासरीने १८३ धावांची नोंद केली असून किंग्स पंजाबविरुद्ध सर्वाधिक ४५ धावांची खेळी प्रमुख ठरली.
गत मोसमात मध्य विभाग संघातून दुलीप करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या फैजने क्रमश: ४७ आणि ७४ धावा केल्या. देवधर करंडक स्पर्धेत भारतीय अ संघातून खेळताना स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतकी खेळीत करीत सामनावीराचा पुरस्कार पटकविला होता.
नुकत्याच झालेल्या इराणी करंडक स्पर्धेत शेष भारताकडून खेळणाऱ्या फैजने १२७ धावांची खेळी केली हे विशेष.
सध्या तो इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेट खेळत आहे. १४ मे रोजी फैजने हेटॉन लॉयन्सकडून खेळताना नॉर्थअम्बरलॅन्डविरुद्ध शतक झळकविले होते.(क्रीडा प्रतिनिधी) 

Web Title: Hope was given, but unexpected visit was received: Faiz Fazal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.