आशा चमकदार कामगिरीची
By admin | Published: July 25, 2016 01:47 AM2016-07-25T01:47:46+5:302016-07-25T01:47:46+5:30
नौकानयन या खेळात भारताच्या दत्तू भोकनळ याने रिओचे तिकीट पक्के केले. जलतरणात भारताला दोन वाईल्ड कार्ड मिळाले.
नौकानयन या खेळात भारताच्या दत्तू भोकनळ याने रिओचे तिकीट पक्के केले. जलतरणात भारताला दोन वाईल्ड कार्ड मिळाले. त्या वाईल्ड कार्डच्या जोरावर भारताने साजन प्रकाश आणि शिवानी कटारिया यांची रिओ स्पर्धेसाठी निवड केली आहे.
नौकानयन या खेळात भारताच्या दत्तू भोकनळ याने आॅलिम्पिक पात्रता मिळवत सगळ््यांनाच चकित केले. अनेक भारतीयांना माहीत नसलेला पुरुष एकेरी स्कल्स हा खेळाचा प्रकारही त्यानिमित्तानेभारतीयांना माहीत झाला. फिसा आशियाई ओसनिया आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत दोन किलोमीटरचे अंतर फक्त ७ मिनिटे ७.४९ सेकंदांत पूर्ण करीत दत्तूने रौप्यपदक पटकावले आणि सोबतच आॅलिम्पिक पात्रतादेखील मिळवली.
जिद्द, मेहनत या जोरावर नाशिकजवळच्या तळेगाव रोही येथील दत्तूने रिओ स्पर्धेचे तिकीट पक्के केले आहे. पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत दत्तू भोकनळ याने अव्वल पाच खेळाडूंना चांगलीच झुंज दिली. कोरियाच्या डोंगयोंग किम याने अखेरच्या टप्प्यात बाजी मारली. किमने सात मिनिटे ५.१३ सेकंदाची वेळ नोंदवली. भोकनळ याने २०१२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय रोर्इंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदकेदेखील पटकावली.
रोर्इंग या खेळासाठी भारतात चांगले वातावरण आहे. हा खेळ आपल्या देशात रुजू शकतो. मात्र बहुसंख्य भारतीयांना याबाबत माहितीच नाही. दत्तूचे गाव तळेगाव रोही हा भाग तसा दुष्काळी मात्र लष्कारात भरती झाल्यावर दत्तूला या खेळाची माहिती मिळाली. सुरुवातीला पाण्यात उतरायला घाबरणारा दत्तू भोकनळ पुण्याजवळच्या नाशिक फाटा परिसरात असणाऱ्या मुळा-मुठा नदीच्या पात्रात नौकानयन करायला शिकला. द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त इस्माईल बेग यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तू सराव करू लागला. हळुहळू त्याने स्पर्धांत भाग घ्यायला सुरुवात केली. राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण बीजिंग येथे झालेल्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आणि कोरियात जाऊन तर रिओ आॅलिम्पिकचे तिकीटही मिळवले.
दत्तूने पात्रता फेरीत सात मिनिटे ७.४९ सेकंदाची वेळ नोंदवली असली तर त्याला आॅलिम्पिकमध्ये पदकाच्या आशा राखण्यासाठी ६ मिनिटे ३६ सेकंदांपर्यंत कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. दत्तू रिओत अव्वल दहामध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा रोर्इंग महासंघाने व्यक्त केली आहे.
- आकाश नेवे, जळगाव
जलतरण पात्रता स्पर्धेत भारताचा एकही खेळाडू रिओ आॅलिम्पिकचे तिकीट पक्के करू शकला नाही. त्यामुळे भारताची रिओचा प्रवेश हा वाईल्ड कार्ड एन्ट्रीवर अवलंबून राहिला. भारताला दोन वाईल्ड कार्ड मिळालेदेखील. त्यानुसार स्विमिंग फेडरेशनने २०० मीटर बटरफ्लायसाठी साजन प्रकाश आणि २०० मीटर फ्रीस्टाईलसाठी शिवानी कटारिया यांची निवड केली. हे दोघे रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
केरळच्या साजन प्रकाश याने फेब्रुवारी २०१५ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ६ सुवर्ण आणि तीन रौप्यपदकांची कमाई केली आहे. तसेच तो २०० मीटर बटरफ्लाय आणि १५०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये राष्ट्रीय विक्रमदेखील नोंदवला आहे.
साजन प्रकाशसह पाच भारतीय खेळाडू हाँगकाँगमध्ये झालेल्या रिओ आॅलिम्पिक पात्रता फेरीत सहभागी झाले होते. मात्र पात्रतेसाठी आवश्यक असलेले पात्रता निकष पूर्ण करण्यात या खेळाडूंना अपयश आले. संदीप शेजवळ, वीरधवल खाडे, सुप्रियो मोंडल आणि सौरभ सांजवेकर हे या स्पर्धेत सहभागी झाले होते. पात्रतेसाठी अ निकष पूर्ण करणे गरजेचे असताना या खेळाडूंना ब निकषावरच समाधान मानावे लागले होते.
गुडगावची शिवानी कटारिया हिची निवड स्विमिंग फेडरेशनने २०० मीटर फ्रीस्टाईलसाठी केली आहे. नुकत्याच झालेल्या सॅग जलतरण स्पर्धेत तिने २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये २ मिनिटे १२.१३ सेकंदाचा विक्रम प्रस्थापित केला. शिवानी सध्या फुकेतमध्ये जलतरणाचा सराव करीत आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये उत्तम खेळ करण्याचे तिचे लक्ष्य आहे.
असे असले तरी तिचे दीर्घकालीन लक्ष्य २०२० च्या टोकिओ आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे आहे. जलतरणाच्या सरावासाठी तिने आपले शिक्षणही अर्धवट सोडले आहे.