यजमानांची सुवर्णमय कामगिरी कायम

By Admin | Published: February 8, 2016 03:43 AM2016-02-08T03:43:34+5:302016-02-08T03:43:34+5:30

यजमान भारताने १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही सुवर्णमय कामगिरी कायम राखली. भारताने जलतरण, कुस्ती आणि भारोत्तोलन या क्रीडाप्रकारांमध्ये वर्चस्व कायम राखताना जास्तीत

The hosts also won the gold medal | यजमानांची सुवर्णमय कामगिरी कायम

यजमानांची सुवर्णमय कामगिरी कायम

googlenewsNext

गुवाहाटी : यजमान भारताने १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही सुवर्णमय कामगिरी कायम राखली. भारताने जलतरण, कुस्ती आणि भारोत्तोलन या क्रीडाप्रकारांमध्ये वर्चस्व कायम राखताना जास्तीत जास्त सुवर्णपदकांवर नाव कोरले. भारताने २८ सुवर्ण, १२ रौप्य आणि ३ कांस्यपदकांसह एकूण ४३ पदकांची कमाई करताना अव्वल स्थान कायम राखले. श्रीलंका ८ सुवर्ण, १७ रौप्य आणि १२ कांस्यपदकांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारताने रविवारी सर्वाधिक पदकांची कमाई जलतरणामध्ये केली. भारताने जलतरणामध्ये १० पदके पटकावली. त्यात चार सुवर्ण, पाच रौप्य व एक कांस्यपदकांचा समावेश आहे.
मल्लांनी चार सुवर्ण, एक रौप्य, तर भारोत्तोलकांनी तीन सुवर्णपदके पटकावली. शनिवारी तीन सुवर्णपदकांसह एकूण ११ पदके पटकावणाऱ्या भारतीय जलतरणपटूंनी रविवारीही वर्चस्व गाजवले. जलतरणामध्ये रविवारी सात स्पर्धा झाल्या, त्यात पाच नवे विक्रम नोंदवले गेले.
भारताच्या संदीप सेजवालने नवा विक्रम नोंदवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताचा स्टार वीरधवल खाडेला पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये श्रीलंकेच्या मॅथ्यू अभयसिंघेविरुद्ध पिछाडीवर पडला. अभयसिंघेने या स्पर्धेत सर्वाधिक
तीन सुवर्णपदकांची कमाई
केली आहे. अभयसिंघेने २३.३३ सेकंदाच्या विक्रमी वेळेसह सुवर्णपदक पटकावले. तो सॅग स्पर्धेतील
सर्वांत वेगवान जलतरणपटू
ठरला आहे. खाडेने ढाका येथे नोंदवलेला २३.७५ सेकंद वेळेचा विक्रम अभयसिंघेने मोडला. खाडेला २३.५४ सेकंद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारताला आणखी दोन सुवर्ण
१भारताने भारोत्तोलन क्रीडा प्रकारात वर्चस्व कायम राखताना रविवारी आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. महिलांच्या ५८ किलो वजन गटात सरस्वती रावतने तर पुरुषांच्या ६९ किलो वजन गटात साम्बो लापुंगने सुवर्णपदकाचा मान मिळवला. भारोत्तोलनामध्ये भारताने आतापर्यंत पाच सुवर्णपदकांची कमाई केली आहे. रावतने (१८७ किलो )स्नॅचमध्ये ८० तर क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १०७ किलो वजन पेलले. बांगलादेशची फुलापती चाकम (१४४ किलो) रौप्य तर श्रीलंकेची मोहिदीन उमेरिया (१४२ किलो) कांस्य पदकाची मानकरी ठरली.
२लापुंगने पुरुषांच्या ६९ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. स्नॅचमध्ये पाच किलोने पिछाडीवर असलेल्या लापुंगने क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये श्रीलंकेचा प्रतिस्पर्धी एम. दिसानायकेच्या तुलनेत पाच किलो वजन अधिक पेलले. त्यामुळे उभय भारोत्तोलक एकूण २८१ किलो वजनासह बरोबरीत होते. लापुंगला सुवर्ण जाहीर करण्यात आले. कारण त्याचे वजन ६८.८ किलो तर प्रतिस्पर्धी श्रीलंकन खेळाडूचे वजन ६९ किलो होते. भारताने शनिवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एकूण तीन सुवर्णपदकांची कमाई केली होती.
शिलाँग : यजमान भारतीय तिरंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करताना रविवारी रिकर्व व कम्पाऊंड त्याप्रमाणे मिश्र दुहेरी प्रकारामध्ये अंतिम फेरी गाठली. त्यामुळे भारतीय तिरंदाज या स्पर्धेत सर्वंच प्रकारातील एकूण १० सुवर्णपदके मिळवण्याच्या शर्यतीत कायम आहेत. शनिवारी भारताने चार सुवर्ण व चार रौप्यपदके निश्चित केली होती. त्यात वैयक्तिक स्पर्धांची अंतिम लढत भारतीय खेळाडूंदरम्यान होणार होती.
रिकर्व्ह गटाच्या अंतिम लढतीत पुरुष व महिला संघांना सुवर्णपदकासाठी श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. कम्पाऊंड गटाच्या अंतिम लढतीत भारतीय पुरुष संघाला भूतानच्या तर महिला विभागात बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मिश्र रिकर्व्ह इव्हेंटच्या अंतिम लढतीत तरुणदीप राय व दीपिका कुमारी यांना तर कम्पाऊंडच्या अंतिम फेरीत अभिषेक वर्मा व पूर्वाशा शेंदे यांना बांगलादेशच्या खेळाडूंच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
भारतीय महिला बॅडमिंटनपटूंनी रविवारी दक्षिण आशियाई स्पर्धेत शानदार सुरुवात करताना नेपाळचा ३-० ने पराभव केला. भारताची ध्वजवाहक पी. व्ही. सिंधूने सारा देवीची २१-२, २१-८ ने, युवा रुतविका शिवानी गड्डेने नंगसाल तमांगचा २१-६, २१-२ ने तर सिंधू व पोनप्पा जोडीने सारा व नंगसाल जोडीचा २१-१०, २१-८ ने पराभव करीत भारताचा विजय निश्चित केला.
दरम्यान, भारतीय पुरुष संघाने अफगाणिस्तानचा ३-० ने पराभव केला. अजय जयराम व एस. एच. प्रणय एकेरीमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यानंतर अक्षय देवाळकर व प्रणय चोपडा जोडीने सरशी साधत विजयावर शिक्कामोर्तब केले.
जयरामने सईद मोहम्मद कबीर मीरजादचा २१-४, २१-४ ने तर प्रणयने अहमद फहिम यारीचा २१-८, २१-११ ने पराभव केला. अक्षय व प्रणय जोडीने फहिम व इम्रान जोडीवर २१-९, २१-९ ने सहज मात केली.
भारत पराभूत
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय स्क्वॉश संघासाठी आजचा दिवस निराशाजनक ठरला. भारताचा अव्वल खेळाडू सौरव घोषाल व हरिंदर पालसिंग संधू यांना वैयक्तिक पुरुष गटातील उपांत्य लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या खेळाडूंविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. अव्वल मानांकित घोषालला फरहान जमानविरुद्ध ४-११, ५-११, १२-१०, ५-११ ने पराभव स्वीकारावा लागला तर संधूला संघर्षपूर्ण लढतीत स्नायूच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. नासिर इक्बालविरुद्धच्या लढतीत संधूने चौथ्या गेममध्ये माघार घेतली. त्या वेळी संधू ७-११, १४-१२, ७-११, ६-६ ने पिछाडीवर होता. महिला विभागात ज्योत्स्ना चिनप्पाने पाकिस्तानच्या सादिया गुलविरुद्ध ११-९, ११-७, ११-५ ने विजय मिळवला.
भारताला एक सुवर्ण व एक कांस्य
शिलाँग : वाय. सपन देवी आणि अंजुल नामदेव यांनी रविवारी दक्षिण आशियाई स्पर्धेत वुशूमध्ये भारताला अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदकाची कमाई करून दिली. सपना देवीने दोन अन्य पदक विजेत्यांच्या तुलनेत मोठ्या फरकाने विजय मिळवला. सपनाने लतिकोरमध्ये आसाम रायफल्सच्या रायजिंग सन क्रीडा परिसरात महिला ताओलू-चांगक्वान स्पर्धेत ९.४५ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. नेपाळची सुष्मिता तमांग (८.७२) रौप्य, तर पाकिस्तानची नाजिया परवेज (६.३०) कांस्यपदकाची मानकरी ठरली.
पुरुष विभागात ताओलू चांगक्वान स्पर्धेत नामदेवला ८.६६ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नेपाळचा पीएलएच लक्ष्मण ८.८६ गुणांसह सुवर्ण, तर विजय सिंजाली ८.८० गुणांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला.भारतीय महिला व पुरुष संघ विजयी
गुवाहाटी : भारतीय महिला हॉकी संघाने एकतर्फी लढतीत रविवारी नेपाळचा २४-० ने धुव्वा उडवित १२ व्या दक्षिण अशियाई क्रीडा स्पर्धेत शानदार सुरुवात केली. भारतातर्फे सौंदर्या येंदाला (१५, ५२, ६२ आणि ६४ वा मिनिट) आणि पूनम बार्ला (७ , ४२, ४३ व ५१ वा मिनिट) यांनी प्रत्येकी चार गोल नोंदवले. राणी (दुसरा, ४६ व ४८ वा मिनिट), जसप्रीत कौर (चौथा, ३५, ५६ वा मिनिट), नेहा गोयल (१४, २२ व ७९ वा मिनिट) आणि दीपिका (५३, ६२ आणि ६७ वा मिनिट) यांनी प्रत्येकी तीन तर गुरजित कौर (२१ व ४१ वा मिनिट) आणि प्रीती दुबे (२३ व २९ वा मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदवले. पुरुष संघाने बांगलादेशला ४-१ गोलने पराभूत केले. भारताकडून प्रदान सोमन्ना, गगन प्रित सिंग, निलम संजीव, मोहम्मद उमर यांनी प्रत्येकी १ गोल केला.

Web Title: The hosts also won the gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.